Home /News /career /

केवळ दहावी पास आहात? चिंता नको! ग्रामीण डाकसेवकांच्या 4200 पेक्षा जास्त जागांसाठी भरती सुरू

केवळ दहावी पास आहात? चिंता नको! ग्रामीण डाकसेवकांच्या 4200 पेक्षा जास्त जागांसाठी भरती सुरू

निवड केवळ गुणवत्तेच्या (Merit) आधारावर केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत 20 जानेवारी 2021 ही आहे.

     नवी दिल्ली 22 डिसेंबर: कोरोनामुळे (Corona Pandemic) सध्या अनेकांच्या नोकऱ्या (Job Loss) गेल्या आहेत. तसंच, खूप मोठं क्वालिफिकेशन आणि तितकाच मोठा पगार असलेल्यांच्याही नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नव्या नोकऱ्या मिळणं आणि त्यातही कमी शिक्षण असलेल्यांना त्या मिळणं ही सध्याच्या काळातली दुरापास्त गोष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, केवळ दहावी पास असलेल्यांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय टपाल खात्यात (India Post Department) ग्रामीण डाकसेवकांच्या (GDS) 4200हून अधिक पदांवर भरती (Recruitment) होणार असल्याची अधिसूचना 21 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आली आहे. 'आज तक'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. टपाल खात्याचं कर्नाटक (Karnataka) परिक्षेत्र आणि गुजरात (Gujarat) परिक्षेत्र या भागांमध्ये ग्रामीण डाकसेवकांच्या 4299 पदांसाठी भरती असल्याचं अधिसूचनेत (Notification) स्पष्ट करण्यात आलं आहे. गुजरात परिक्षेत्रात 1826, तर कर्नाटक परिक्षेत्रात 2443 पदांसाठी भरती होणार आहे. या पदाकरिता पात्र ठरण्यासाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त संस्था/बोर्डातून किमान दहावी उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे. तसंच, उमेदवार कमीत कमी 18 वर्षं पूर्ण केलेला आणि जास्तीत जास्त 40 वर्षांचा असावा, असंही पात्रतेच्या निकषांत (Eligibility) स्पष्ट करण्यात आलं आहे. या पदासाठी अर्ज करण्याकरिता खुला (Open Category) प्रवर्ग, तसंच ओबीसी (OBC) प्रवर्गातल्या पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. एससी-एसटी (SC/ST) प्रवर्ग, तसंच महिला उमेदवारांना हे शुल्क भरावं लागणार नाही. या पदावर निवड होण्यासाठी लेखी परीक्षा होणार नसल्याचंही टपाल खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ही निवड केवळ गुणवत्तेच्या (Merit) आधारावर केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत 20 जानेवारी 2021 ही असून, अर्ज करण्यासाठी उमेदवारांना http://www.appost.in या वेबसाइटवर जावं लागेल. अर्ज करण्यासाठी वरील वेबसाइटवर जाऊन संबंधितांना आधी एकदा नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. आपली संबंधित कागदपत्रं अर्ज करताना अपलोड करायची आहेत, तसंच आपण कोणत्या पोस्टात काम करू इच्छितो याचं प्राधान्यक्रमही त्यात द्यायचे आहेत. अर्ज करताना शुल्क ऑनलाइन, तसंच ऑफलाइन या दोन्ही पद्धतींनी भरता येण्याची सोय ठेवण्यात आली आहे. ऑफलाइन पद्धतीने शुल्क भरायचं असल्यास ते कोणत्याही हेड पोस्ट ऑफिसमध्ये भरता येणार आहे. शुल्क स्वीकारणाऱ्या पोस्ट ऑफिसेसची यादी वरील वेबसाइटवर देण्यात आली आहे. या पदांवर निवड झाल्यास उमेदवारांना कामाचं स्वरूप, कामाचा वेळ आणि पद यानुसार किमान 10 हजार ते जास्तीत जास्त 14 हजार 500 रुपये यादरम्यान मासिक वेतन मिळणार आहे. याविषयीच्या अधिक माहितीसाठी http://www.appost.in/gdsonline/Home.aspx या लिंकवर जाऊन अधिसूचना पाहता येऊ शकेल.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Post office

    पुढील बातम्या