मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! JEE देता येणार मातृभाषेतूनही

मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! JEE देता येणार मातृभाषेतूनही

देशातल्या आघाडीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी JEE Main ही प्रवेश परीक्षा इथून पुढे प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा घेतली जाईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : देशातल्या आघाडीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी JEE Main ही प्रवेश परीक्षा इथून पुढे प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा घेतली जाईल, अशी मोठी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal) यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) मध्ये मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यानुसारच हा निर्णय असल्याचं पोखरियाल यांनी जाहीर केलं.

रमेश पोखरियाल निशांक यांनी गुरुवारी ही घोषणा केली. Joint Admission Board (JAB) तर्फे IIT मधल्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर JEE ही परीक्षा घेण्यात येते.

आयआयटी आणि इतर मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी IIT JEE ही परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी विद्यार्थी दहावीच्या आधीपासूनच तयारी करत असतात. पण मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेतून उत्तरं लिहिणं जास्त सोयीचं असतं. राज्य पातळीवरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेतून उत्तरं लिहिण्याची मुभा असावी, असं पोखरियाल यांनी सांगितलं.

पोखरियाल यांनी यासंबंधि ट्वीट करून माहिती दिली आहे. देशातल्या 22 प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यायचं आमचं धोरण आहे. कुठलीही एक भाषा लादायचा यामागे उद्देश नाही. इंग्रजी नको असं आमचं म्हणणं नाही. पण भाषा निवडीचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना हवं आणि भाषा ही त्यांच्या ज्ञानसंपादनात किंवा शिक्षणात अडथळा ठरता कामा नये, असा या धोरणामागचा उद्देश असल्याचं पोखरियाल यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PISA परीक्षांमधले टॉप स्कोअर करणारे देश मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देणारे असल्याचा मुद्दा लक्षात आणून दिला होता. JAB चा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे, असा सरकारचा दावा आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 22, 2020, 5:56 PM IST

ताज्या बातम्या