नवी दिल्ली, 31 मार्च : महिला सबलीकरणाबाबत आपल्या देशात आता बदल घडत आहेत. सध्याच्या विद्यार्थिनी आपले हक्क आणि शिक्षणाबाबत खूप जागरूक झाल्या आहेत. राजस्थानमधील जैसलमेर येथील मुलींच्या सरकारी शाळेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. तिथे शाळा प्रशासन आणि विद्यार्थिनींमधील वाद इतका वाढला आहे की, जैसलमेरच्या डीएम टीना डाबी यांना स्वतः हस्तक्षेपासाठी पुढे यावं लागलं आहे. जैसलमेर मुख्यालयापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुल्लाना येथे मुलींचं सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालय आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे त्रस्त झालेल्या या सरकारी शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेलाच कुलूप लावलं आहे. विद्यार्थिनींनी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाचा तीव्र निषेध केला. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली.
शाळेत आहेत दोनच शिक्षक
विद्यार्थिनींनी शाळेला टाळं ठोकल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली. शिक्षण विभागानं तत्काळ दोन शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश काढले. त्यानंतर विद्यार्थिनींनी संप मागे घेतला. मात्र, तोपर्यंत हे प्रकरणाने सोशल मीडियावर गाजण्यास सुरुवात झाली. वरिष्ठ माध्यमिक विद्यालय फक्त दोन शिक्षकांच्या भरवशावर कसं ठेवलं जाऊ शकतं, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय, नियुक्त केलेले दोन्ही शिक्षक पुरुष आहेत. मुलींच्या शाळेत एकही महिला शिक्षिका नाही.
युक्रेनहून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, MBBS पूर्ण करण्यासाठी मिळणार संधी
टीना डाबी यांनी बोलावली बैठक
सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी टीना डाबी यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे किंवा ज्या मुलींच्या शाळांमध्ये एकही महिला शिक्षक नाही अशा सर्व शाळांची यादी त्यांनी मागविली आहे. टीना डाबी मुलींच्या शिक्षणाबाबत अॅक्शन मोडवर आल्या आहेत. त्यामुळे, शिक्षण विभागातर्फे सर्व मुलींच्या शाळांमध्ये महिला शिक्षकांची नियुक्ती करण्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
महिलांसाठी अनेक निर्णय
जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी 'जैसन शक्ती लेडीज फर्स्ट' कार्यक्रम सुरू केला आहे. यादरम्यान महिला सक्षमीकरणासंदर्भात शहरापासून ते गावांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिवाय जिल्ह्यात होणाऱ्या इतर कार्यक्रमांसाठीही टीना डाबी खूप उत्साही असतात.
दरम्यान, राजस्थानमधील लिंग गुणोत्तर अजूनही चिंतेचा विषय आहे. शिवाय तेथील गावांमध्ये मुलींच्या शिक्षणाबाबतही मोठ्या प्रमाणात उदासीनता असल्याचं म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education