नवी दिल्ली, 16 जानेवारी : अनेक डॉक्टर आणि इंजिनीअर आपले स्थिर करियर सोडून UPSC परीक्षेची तयारी करतात. डॉ.रेणू राज देखील त्यापैकीच एक आहेत. मात्र, नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी नोकरी सोडली नाही. नोकरी करत असताना त्यांनी परीक्षेची तयारीही केली. यानंतर डॉ.रेणू राज यांनी अल्पावधीतच यूपीएससी परीक्षेत सर्वोत्तम रँक मिळवली होती. IAS अधिकारी झालेल्या रेणू राज यांचा यशस्वी प्रवास कसा आहे, हे जाणून घ्या.
डॉ. रेणू राज या केरळ राज्यातील अलाप्पुझा येथील जिल्हाधिकारी आहेत. डॉक्टरकी करत असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. काही महिन्यांच्या तयारीतच त्यांनी पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्णही केली होती. देशातील सर्वात कार्यक्षम IAS अधिकाऱ्यांच्या यादीत डॉ. रेणू राज यांचे नाव घेतले जाते.
डॉ. रेणू राज यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण केरळमधील कोट्टायम येथील सेंट तेरेसा उच्च माध्यमिक विद्यालयातून घेतले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोट्टायम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले. डॉक्टर झाल्यानंतर 2013 मध्ये त्यांनी डॉक्टरकीसोबतच UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
डॉ. रेणू राज यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली तेव्हा त्या सर्जन म्हणून काम करत होत्या. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये नमूद केले आहे की, त्यांना शक्य तितक्या लोकांसाठी उपयोगी पडायचे आहे, अशा स्थितीत त्यांना वाटले की, डॉक्टर होऊन त्या 50 ते 100 रुग्णांना मदत करू शकते. पण नागरी सेवा अधिकारी बनून त्यांच्या एका निर्णयाचा हजारो लोकांना फायदा होईल. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - पाचव्या प्रयत्नात UPSC पास, अशी आहे करोडपती IPS मोहिता शर्मांची कहाणी
आयएएस झाल्यानंतर रेणू यांनी अनेक मुलाखती दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की, 2013 पासून त्या यूपीएससी परीक्षेसाठी दररोज 3-6 तास अभ्यास करायच्या. वैद्यकशास्त्राच्या अभ्यासाबरोबरच त्यांनी असेच वेळापत्रक बनवून सहा-सात महिने अभ्यास केला. यानंतर त्यांनी पूर्णवेळ तयारी करण्याचे ठरवले. मुख्य परीक्षेनंतर त्यांनी पुन्हा वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या अभ्यासाच्या तासांमध्ये कपात करावी लागली. पण त्यांनी त्यांच्या तयारीवर परिणाम होऊ दिला नाही.
डॉ. रेणू राज यांनी एप्रिल 2022 मध्ये केरळ राज्य वैद्यकीय सेवा महामंडळाचे एमडी श्रीराम वेंकटरामन यांच्याशी लग्न केले. दोघांनीही आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मोठ्या साधेपणाने लग्नाचे विधी पार पाडले होते. IAS श्रीराम वेंकटरामन यांनी 2012 मध्ये UPSC परीक्षा दिली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वर्षीच्या परीक्षेतही त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता. आयएएस अधिकारी डॉ. रेणू राज यांचा प्रवास हा आजच्या तरुणाईसाठी प्रेरणदायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Ias officer, Inspiring story, Success story, Upsc, Upsc exam