मराठी बातम्या /बातम्या /करिअर /रिक्षाचालक कसा बनला कॅब कंपनीचा मालक? वाचा दिलखुश कुमारचा प्रेरक प्रवास

रिक्षाचालक कसा बनला कॅब कंपनीचा मालक? वाचा दिलखुश कुमारचा प्रेरक प्रवास

दिलखुश कुमार

दिलखुश कुमार

मोठी ध्येयं ठरवून ती पूर्ण करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असेल, तर अशक्य ते शक्य होऊ शकतं. बिहारच्या सहरसा जिल्ह्यातल्या रिक्षाचालकाची ही कहाणी तशीच आहे. एक वेळ पोट भरण्यासाठी रिक्षा चालवण्याचंही काम केलेल्या दिलखुश कुमार याची आता स्वतःची कॅब कंपनी आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

    मुंबई, 31  जानेवारी- मोठी ध्येयं ठरवून ती पूर्ण करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असेल, तर अशक्य ते शक्य होऊ शकतं. बिहारच्या सहरसा जिल्ह्यातल्या रिक्षाचालकाची ही कहाणी तशीच आहे. एक वेळ पोट भरण्यासाठी रिक्षा चालवण्याचंही काम केलेल्या दिलखुश कुमार याची आता स्वतःची कॅब कंपनी आहे. या कंपनीद्वारे जवळपास 4 हजार गाड्या रस्त्यांवर धावत आहेत. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दिलखुश कुमार याने स्वतःची स्टार्टअप कंपनी स्थापन केलीय. 'नवभारत टाइम्स'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    राजधानी पाटणाच्या रस्त्यांवर धावणाऱ्या 3200 कॅब आता दिलखुश कुमारच्या कंपनीशी जोडल्या गेल्या आहेत. 2023च्या अखेरीपर्यंत 25 हजार गाड्या समाविष्ट करण्याचा त्याचा संकल्प आहे. इतकं यश मिळवणारा दिलखुश कुमार बिहारच्या सहरसा जिल्ह्यातल्या बनगाव इथला आहे. त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतलंय. वडील पवन खां बसचालक आहेत. त्यामुळे दिलखुशही वडिलांप्रमाणे ड्रायव्हर होणार असं शेजारीपाजारी म्हणायचे.

    (हे वाचा: राजस्थानातल्या शेतकरी बंधूंची यशोगाथा; पाहा झेंडूच्या शेतीतून कशी होते लाखो रुपयांची कमाई?)

    शिक्षण पूर्ण केल्यावर दिलखुशला खासगी शाळेत शिपाई व्हायचं होतं. तसे प्रयत्नही त्यानं केले; पण काम न झाल्यानं रोजगार मिळवण्यासाठी तो दिल्लीला गेला. दिल्लीमध्ये रिक्षा चालवण्याचं काम तो करू लागला; मात्र तिथे आजारी पडल्यामुळे त्यानं पुन्हा सहरसा गाठलं. काही वेगळं करण्याचा निश्चय करून 2016मध्ये स्टार्टअप योजनेअंतर्गत साडेपाच लाखांचं कर्ज त्यानं घेतलं. त्यातून AryaGo नावानं कॅब सेवा सुरू केली. या सेवेअंतर्गत 350 गाड्या रस्त्यावर धावतात. दिलखुश कुमार 29 वर्षांचा असून आता त्यानं स्वतःच्या 2 कंपन्या स्थापन केल्यात. AryaGo नावाच्या पहिल्या कंपनीनंतर त्यानं RodBez नावाची दुसरी कंपनीही सुरू केलीय. त्याच्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये आता जवळपास 4 हजारांहून अधिक गाड्या आहेत. रोडबेझ वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण्यासाठी गाड्या उपलब्ध करून देते. दिलखुश कुमार यानं स्टार्टअप योजनेअंतर्गत कर्ज घेऊन त्यातून कॅबसेवा सुरू केली. आज त्याची कंपनी अनेक प्रवाशांसाठी फायदेशीर ठरते आहे. तसंच स्वतःसोबत त्यानं अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यापुढे आणखी गाड्या स्वतःच्या कॅब सेवेत समाविष्ट करून घेण्याचा त्याच्या कंपनीचा मानस आहे.

    दिलखुशच्या नावाप्रमाणेच त्याचा प्रवासही मन प्रसन्न करणारा आहे. फारसं शिक्षणही नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर त्यानं स्वतःचं करिअर घडवलं. तिशीच्या आतच त्यानं स्वतःच्या 2 कंपन्या स्थापन केल्या आहेत. अनेक होतकरू तरुणांसाठी त्याची यशोगाथा आदर्श ठरू शकते.

    First published:

    Tags: Business, Money