कोरोनाकाळात परीक्षा न दिलेल्या UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी; केंद्राने सुप्रीम कोर्टात सांगितलं की...

कोरोनाकाळात परीक्षा न दिलेल्या UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी; केंद्राने सुप्रीम कोर्टात सांगितलं की...

कोरोनामुळे देशातील केंद्रीय लोक सेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे.

  • Share this:

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर : कोरोनामुळे देशातील केंद्रीय लोक सेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी सरकारकडून पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे. त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळू शकते. केंद्र सरकारने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सांगितलं की, ते या प्रस्तावावर विचार करीत आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, या प्रकरणात गांभीर्याने विचार केला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करीत UPSC च्या परीक्षेत आणखी एक संधी देण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल म्हणाले की, केंद्र सरकार या प्रकरणात विचार करीत आहे आणि ते आणखी एक संधी देण्याच्या विरोधात नाही. सरकार यावर गांभीर्याने विचार करीत आहे आणि तीन आठवड्यात यावर निर्णय घेतला जाईल. याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, कोरोना साथीच्या आजारामुळे बरेच उमेदवार परीक्षेत बसू शकले नाहीत तसेच परीक्षेची तयारी न करता पेपर द्यायला जाणारे असे अनेक उमेदवार होते. कोरोनामुळे उमेदवारांचे हाल झाले आहेत.

आणखी एक संधी द्यावी, अशी विनंती कोर्टाने केली आहे. सरकारच्या उत्तराची वाट पाहायला हवी, असेही यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. वयावरील सवलतीबाबत विचार करण्यास कोर्टाने सरकारला सांगितले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 11 जानेवारीची मुदत दिली आहे. आणखी एक संधी देण्यासाठी 24 उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

कोर्टाने परीक्षा पुढे ढकलण्यास दिला होता नकार

सर्वोच्च न्यायालयाने नागरी सेवा (प्रारंभिक) परीक्षा 2020 रद्द करण्याचा आदेश देण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर खंडपीठाने म्हटले होते की ज्या उमेदवारांना शेवटच्या संधीचा लाभ घेण्याची इच्छा आहे त्यांना अतिरिक्त संधी देण्यावर केंद्र सरकार विचार करू शकते. वय मर्यादा न वाढवता हे केले पाहिजे. त्यानंतर केंद्राचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी असे म्हटले होते की, ही सूचना संबंधित अधिकाऱ्यांसमोर ठेवू. कोरोनामुळे परीक्षा स्थगित करण्यासाठी अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

यूपीएससीने नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 साठीचे प्रवेश पत्र दोन दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. प्रवेश पत्र हे आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वर देण्यात आले आहेत. यूपीएससी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2020 मध्ये यशस्वी झालेले उमेदवार आता मुख्य परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. अनुसूची वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येईल.

Published by: Meenal Gangurde
First published: December 18, 2020, 3:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading