जुगल कलाल, प्रतिनिधी
डूंगरपुर, 28 मार्च : आपल्या देशाला तरुणाईचा देश म्हटलं जातं. या देशात अनेक तरुण शिक्षणासोबत नोकरी करत आहेत. तर नोकरीसोबत स्पर्धा परीक्षेची तयारीही करत आहेत. राजस्थानमध्ये अशीच एक तरुणी आहे, जिची कहाणी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. आज जाणून घेऊयात, जागृती चव्हाण या तरुणीचा संघर्षमय प्रवास.
डूंगरपुर शहरात एक पंक्चरचे दुकान आहे. हे दुकान दिसायला सामान्य दिसते, पण त्या त्यामध्ये एका मोठ्या प्रयत्नांची कहाणी दडलेली आहे. पंक्चर काढण्यासाठी या दुकानात जेव्हा जेव्हा एखादे वाहन थांबते तेव्हा एक मुलगी बाहेर येते. कौशल्यपूर्वक कारचे पंक्चर काढते. त्यासाठी ठराविक रक्कम घेते आणि पुन्हा दुकानात जाऊन अभ्यास करते.
ही तरुणी डुंगरपूरची रहिवासी असून जागृती चौहान (वय 22) असे तिचे नाव आहे. जागृती सहाय्यक उपनिरीक्षक म्हणजेच ASI परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहे. तिला राजस्थान पोलिसात अधिकारी व्हायचे आहे. पण यासोबतच आपल्या परिवाराला आर्थिक मदत व्हावी म्हणून ती पंक्चरचे दुकान चालवते.
जागृती सांगते की, याशिवाय ती ट्रॅक्टरही चालवते आणि स्वतःच्या शेतात नांगरणीही करते. तिला दोन बहिणी आणि एक भाऊ आहेत. मोठी बहीण नेहा मुलांना शिकवणी वर्ग घेते. तर धाकटी जिज्ञासा आणि भाऊ कृष्णराज शिक्षण घेत आहेत. तर जागृतीची आई सूर्या गृहिणी आहे.
वडिलांना पाहून पंक्चर काढायला शिकली -
मेताली गावात राहणारी जागृती ही सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तिचे वडील आखाती देश कुवेतमध्ये काम करतात. कुवेतला जाण्यापूर्वी ते टायर पंक्चर काढायचे. तेव्हापासून जागृती वडिलांना पाहून पंक्चर काढायला शिकली. तिचे वडील कुवेतला गेल्यानंतर पंक्चरचे दुकान बंद झाले. मात्र, जागृतीने ते पुन्हा सुरू केले. आता पंक्चर काढण्याच्या कामातून जागृतीला दिवसाला 250 ते 300 रुपये मिळतात. अभ्यासासोबतच ती कुटुंबाचा छोटासा खर्चही भागवते. जागृतीचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Inspiring story, Local18, Rajasthan