मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Engineers' Day 2022: JEE देणाऱ्यांची संख्या होतेय कमी; इंजिनिअरिंगची क्रेझ कमी होत चाललीये का?

Engineers' Day 2022: JEE देणाऱ्यांची संख्या होतेय कमी; इंजिनिअरिंगची क्रेझ कमी होत चाललीये का?

Engineering ची क्रेझ कमी होत चाललीये का?

Engineering ची क्रेझ कमी होत चाललीये का?

आयआयटी प्रवेश परीक्षेला पात्र असूनही विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या पर्यायातून बाहेर पडतात आणि त्याऐवजी आपल्या आवडीच्या विषयात NIT ला जाण्यास प्राधान्य देतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 15 सप्टेंबर: गेली काही दशकं, इंजिनीअरिंगचं (Engineering Study) शिक्षण हा भारतीय तरुणांचा प्राधान्याचा पर्याय राहिला आहे. अलीकडच्या काळात मात्र हा कल बदलू लागल्याचं चित्र आहे. जेईई मेन या इंजिनीअरिंगसाठीच्या प्रवेश परीक्षेला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येने गेल्या चार वर्षांत 11 लाखांचा टप्पा ओलांडलेला नाही. एवढंच कशाला, आयआयटी या प्रतिष्ठित संस्थांच्या प्रवेश परीक्षांना अर्ज करणाऱ्यांच्या संख्येतही हळूहळू घट होत असल्याचं दिसत आहे. आयआयटी प्रवेश परीक्षेला पात्र असूनही विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या पर्यायातून बाहेर पडतात आणि त्याऐवजी आपल्या आवडीच्या विषयात NIT ला जाण्यास प्राधान्य देतात.

दर वर्षी जेईई मेन परीक्षेतल्या पहिल्या 2.5 लाख गुणवंतांची जेईई अ‍ॅडव्हान्स्ड (JEE Advanced) अर्थात आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी निवड होते. अनेक विद्यार्थ्यांना एकसारखेच मार्क्स मिळत असल्याने आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी दर वर्षी अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरतात; मात्र गेल्या सात वर्षांत या परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या 1.8 लाखापेक्षा कमी आहे.

वाढलेली, अवघड होत चाललेली स्पर्धा आणि कोचिंग इन्स्टिट्यूट्सची वाढत चाललेली फी या कारणांमुळे या परीक्षांपासून लांब राहण्याचं ठरवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जेईई मेन (JEE Main) परीक्षेला बसून जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना आघाडीच्या NIT मध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ते विद्यार्थी आयआयटीच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचं ठरवतात. कारण तिथल्या स्पर्धेमुळे त्यांना आयआयटीत प्रवेश मिळाला, तरी तो टिअर-थ्री आयआयटीत मिळतो. खासकरून कम्प्युटर सायन्स आणि संबंधित कोर्सेससाठी मद्रास, दिल्ली, मुंबई आदी टॉप आयआयटीजमध्ये स्पर्धा खूप प्रचंड असते.

 वर्ष JEE MAIN साठी झालेली नोंदणी JEE ADVANCED साठी झालेली नोंदणी -

YEARJEE MAIN REGISTRATIONSJEE ADVANCED REGISTRATIONS
201711,86,4541,72,024
201811,35,0841,55,158
20196,08,4401,61,319
20209,34,0001,50,838
202110,48,0121,41,699
202210,26,7991,60,000

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितलं, 'प्रचंड स्पर्धा हे यामागचं एक कारण असू शकतं. अर्ज करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ 2.5 लाख विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेला बसू शकतात आणि आयआयटी एंट्रन्स स्टेजला आणखी चाळणी लागते.'

'अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असणं हे यामागचं एक कारण असू शकतं. 150पैकी सुमारे 149 विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही. हे विद्यार्थी कोचिंगवर भरपूर वेळ आणि पैसा खर्च करतात. आपण मध्यम बुद्धिमत्तेचे आहोत, याची जाणीव विद्यार्थ्याला असली, तर तो जेईईच्या कोचिंगवर जास्त खर्च करू इच्छित नाही. ते राज्यातल्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तरी समाधान मानतात. नंतर पुन्हा राज्याच्याच कॉलेजमध्ये यावं लागणार असेल, तर आधीच तिथे प्रवेश घेतलेला काय वाईट, असा विचार ते करत असावेत. म्हणून ते राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा देत नसावेत,' असं सहस्रबुद्धे यांनी सांगितलं. ते अलीकडेच निवृत्त झाले आहेत.

आयआयटीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांचा म्हणजेच प्रवेश परीक्षेला अर्ज करणाऱ्यांची संख्या घटणं हे केवळ मेरीट कमी असल्याचं लक्षण नव्हे, तर त्यात रस कमी होत असल्याचंही लक्षण आहे. जेईई मेन 2022चा टॉपर पार्थ भारद्वाज याने अलीकडेच news18.com ला सांगितलं, की करिअरचा पर्याय म्हणून दशकभरापूर्वी इंजिनीअरिंग हा पर्याय जितका सुरक्षित होता, तितका तो आता राहिलेला नाही. BTech झाल्यावर पार्थ UPSC CSE ला जाण्याचं नियोजन करत आहे. 'करिअरच्या संधींचा विचार करता इंजिनीअरिंग हा आता सुरक्षित पर्याय राहिलेला नाही. 12वीला CBSE घेणाऱ्यांची संख्या 30-40 लाख असते, तर जेईई मेन देणाऱ्यांची संख्या 9 लाख असते. जेईईला बसणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. तरीही एक संशोधन असं सांगतं, की भारतातले 80 टक्के इंजिनीअर्स कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी सुटेबल (योग्य) ठरत नाहीत,' असं पार्थ म्हणाला.

प्रचंड स्पर्धा असल्यामुळे ही राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय क्रॅक करणं अगदीच दुर्मीळ असतं. कोचिंग क्लासची प्रचंड फी प्रत्येकाला परवडणारी नसते. मेरिटमधल्या काही विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या खर्चाने मोफत कोचिंग मिळतं; पण अल्प उत्पन्न गटातल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण मिळू शकत नाही.

कोचिंग सेंटर्स मात्र असा दावा करतात, की शालेय शिक्षण आणि प्रवेश परीक्षा क्रॅक करण्यासाठी लागणारं कौशल्य यामध्ये असलेली तफावत ते भरून काढतात. तज्ज्ञांचं मत असं आहे, की केवळ शालेय पातळीवरचं शिक्षण जेईई अ‍ॅडव्हान्स्डसारख्या परीक्षांसाठी कधीच पुरेसं ठरू शकत नाही. 'आयआयटी-मुंबई'चे माजी विद्यार्थी आणि Instapreps by 7 Classes चे सहसंस्थापक अनुप राज सांगतात, 'विद्यार्थी शाळेत जे काही शिकतात, त्यापेक्षा या परीक्षेचा पॅटर्न पूर्णच वेगळा असतो. आयआयटीच्या स्पर्धेत उतरू इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना खूप चांगल्या कोचिंगची गरज असते, खासकरून राज्य शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांना याची जास्त गरज असते. या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षा अवघड जातात.'

अनुप राज स्वतः मूळचे एका छोट्या शहरातले आहेत. 'या वर्षी सुमारे 10-15 टक्के विद्यार्थ्यांनी आयआयटी प्रवेश परीक्षेला अर्ज करण्याची संधी केवळ अल्प मुदतीमुळे गमावली. मोठ्या शहरांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करणं अगदी सहज शक्य असतं; मात्र छोटी शहरं किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कनेक्टिव्हिटीच्या समस्या असल्याने ते शक्य नसतं. अर्ज करण्याचा कालावधी किमान एका आठवड्याने जास्त असता, तरी सुमारे वीस ते तीस हजार विद्यार्थी या परीक्षेसाठीचा अर्ज भरू शकले असते,' असा दावा अनुप राज यांनी केला.

First published:

Tags: Career, Career opportunities, Education