मुंबई, 20 डिसेंबर: भारत आणि चीन या दोन देशांमध्ये अनेक वर्षांपासून शत्रूत्व आहे. चीननं आतापर्यंत अनेकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा उभय देशांमध्ये लहान-मोठ्या चकमकीदेखील झडल्या आहेत. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये दोन्ही देशांतील वाद विकोपाला गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच पुन्हा दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान तवांग प्रदेशामध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर चीननं भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी जबरदस्त खेळी केली आहे. थोर भारतीय डॉक्टर द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांच्या स्मरणार्थ चीननं भारतात शाळा बांधण्याची घोषणा केली आहे. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मरणार्थ एक शाळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा चीनच्या महावाणिज्य दूतांनी नुकतीच केली. डॉ. कोटणीस यांचा जिल्हा असलेल्या सोलापूर येथे ही शाळा सुरू होणार आहे. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ही सुवर्णसंधी सोडूच नका! ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी थेट सुप्रीम कोर्टात नोकरी; 80,000 रुपये मिळेल पगार
चीनचे महावाणिज्य दूत काँग शियानहुआ हे डॉ. कोटणीस यांच्या 80व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी मुंबईमध्ये उपस्थित होते. या वेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुंबईपासून जवळपास 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलापूरमध्ये शाळा बांधण्याची घोषणा केली. पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात केलेल्या मुख्य भाषणात चीनचे राजदूत काँग म्हणाले, "आम्ही सोलापूर महानगरपालिकेसोबत ‘डॉ. कोटणीस फ्रेंडशिप स्कूल’ची स्थापना करणार आहोत. चीनच्या नऊ कंपन्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा देण्याचा मानस व्यक्त केला आहे. डॉ. कोटणीस यांच्या वागणुकीवरून आपल्याला कळतं की, चीन-भारताच्या चांगल्या संबंधांना जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे जनतेलाही याचा फायदा मिळाला पाहिजे."
चीनसाठी डॉ. कोटणीस ठरले होते देवदूत
1938 मध्ये, दुसऱ्या चीन-जपान युद्धादरम्यान वैद्यकीय मदत देण्यासाठी भारतीय डॉक्टरांची पाच सदस्यांची टीम तयार करण्यात आली होती. या टीममध्ये डॉ. कोटणीस यांचाही समावेश होता. या डॉक्टरांनी सीमेवर सेवा दिली होती. त्यांनी सुमारे 800 जखमी सैनिकांवर उपचार केले होते. भारतीय डॉक्टरांमुळे चीनचे 800 सैनिक वाचले होते. या युद्धानंतर डॉ. कोटणीस यांनी चिनी परिचारिकेशी लग्न केलं. 1942 मध्ये दोघांना एक मुलगाही झाला. मात्र, डॉ. कोटणीस यांच्यावर चीनमधील हवामानाचा वाईट परिणाम झाला आणि 1942 मध्ये वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
JEE Mains 2023: अवघ्या एक महिन्यावर आली परीक्षा; नक्की कसं असेल Exam Pattern? इथे मिळेल माहिती
अनेक दशकांपूर्वी कम्युनिस्ट नेते माओत्से तुंग यांनी, भारतीय डॉ. कोटणीस यांनी चिनी लोकांना केलेल्या मदतीबद्दल एक स्तुतीपर भाषण लिहिलं होतं. महाराष्ट्रातील सोलापूर येथील डॉ. कोटणीस मेमोरिअल हॉलमध्ये 30 ऑगस्ट रोजी हे स्तुतीपर भाषण फलकाच्या स्वरूपात लावण्यात आलं आहे. डॉ. कोटणीस यांचं आयुष्य भारत-चीन मैत्रीचं उदाहरण म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या जीवनावर 'डॉ. कोटणीस की अमर कहानी' नावाचा चित्रपटही आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.