नवी दिल्ली, 15 डिसेंबर : सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. मार्च महिन्यामध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा होणार असल्याचं या मेसेजमधून सांगण्यात येत आहे, पण याबाबत आता सीबीएसई (CBSE) ने स्पष्टीकरण दिलं आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत अजून काहीही निश्चित करण्यात आलं नसल्याचं सीबीएसईने सांगितलं आहे. तसंच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरून पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही सीबीएसईने सांगितलं आहे.
10 डिसेंबरला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यार्थ्यांशी वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी बोर्डाच्या परीक्षेत अनेक बदल होणार असल्याचे संकेत दिले. तसंच कोरोना व्हायरस आटोक्यात आला नाही, तर दहावी-बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यात न होता पुढे ढकलल्या जाऊ शकतात, असं पोखरियाल म्हणाले होते. अशा परिस्थितीमध्ये सीबीएसई प्रॅक्टिकल परीक्षा घेऊ शकते, कारण देशभरात संपूर्ण शैक्षणिक वर्षात शाळा बंद राहिल्या, असे संकेत पोखरियाल यांनी दिले.
सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेमध्येही मोठे बदल होऊ शकतात. दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न वाढण्याची, तसंच परीक्षा application based असण्याची आणि MCQ वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिक्षण मंत्र्यांनीही या बदलांबाबत त्यांच्या वेबिनारमध्ये भाष्यं केलं. तसंच विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल, असा विश्वास पोखरियाल यांनी व्यक्त केला आहे. तसंच परीक्षांच्या तारखा खूप आधी घोषित केल्या जातील. आम्ही तुमच्यासोबत आहोत. सगळे निर्णय विद्यार्थ्यांचं हित पाहून घेतले जातील, असंही पोखरियाल म्हणाले.
सीबीएसईच्या प्रसिद्धी पत्रकानुसार 'कोरोना काळात विद्यार्थी आणि पालकांच्या परिस्थितीबद्दल सीबीएसईला माहिती आहे. सगळ्यांशी सल्लामसलत करूनच कोणताही निर्णय घेतला जाईल. तसंच हा निर्णय सगळ्यांपर्यंत बोर्डाच्या वेबसाईटच्या माध्यमातून पोहोचवला जाईल.'
काहीच महिन्यांपूर्वी सीबीएसईने दहावी आणि बारावीचा 2021 सालच्या परीक्षेसाठीचा सिलॅबस कमी केला होता, कारण कोरोना लॉकडाऊनमुळे शाळाच सुरू झाल्या नव्हत्या. प्रत्येकवर्षी 30 लाख विद्यार्थी सीबीएसई बोर्डाची परीक्षा देतात. 2019 साली 31.14 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी नावं रजिस्टर केली होती.