नवी दिल्ली, 4 जून : केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं (CBSE syllabus change) इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आता डेटा सायन्स (Data Science) आणि कोडिंग (Computer Coding) यांचाही समावेश केला आहे. विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञानदृष्ट्या विकास करणे हा या अभ्यासक्रमांच्या समावेशा मागचा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एक ट्वीट करून ही माहिती दिली.
नवीन शिक्षण धोरणांतर्गत डेटा सायन्स आणि कोडिंग विषय शालेय अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) सहकार्याने सीबीएसईनं 2021 मध्ये हे उद्दिष्ट साध्य केलं आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे. नवीन पिढी नव्या युगाची कौशल्ये शिकून सक्षम होईल, असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
आधुनिक काळातील प्रगत तंत्रज्ञानाशी भावी पिढीची आधीच ओळख व्हावी या उद्देशानं शालेय अभ्यासक्रमात या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. कोडिंगमुळे मुलांची तर्क सुसंगत विचार करण्याची क्षमता वाढेल. तसंच त्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयाबाबतही माहिती मिळेल. तर डेटा सायन्समुळे डेटा कसा एकत्रित केला जातो, त्याचे विश्लेषण कसं केलं जातं याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे संगणकीय कौशल्य, सर्जनशीलता, प्रॉब्लेम सोडवण्याचे कौशल्य आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्यही यामुळे वाढणार आहे.
लहान मुलांना कोरोना लस देण्यासाठी धडपड; अवघ्या काही तासांतच 3 मोठ्या अपडेट
सीबीएसईचे अध्यक्ष मनोज आहुजा यांच्या मते, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक ज्ञानसंपन्न करण्याच्या दृष्टीनं हे दोन्ही विषय खूप उपयुक्त ठरतील. विद्यार्थी भविष्यात सहजपणे तंत्रज्ञानासंदर्भातील कौशल्ये शिकू शकतील. मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं हा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं या दोन्ही विषयांची पुस्तके तयार करण्यात आली आहेत.
सीबीएसईनं याबाबत आपल्या सर्व शाळांना सूचना दिल्या असून, नव्या सत्रापासून या विषयांना सुरुवात होणार आहे. सहावी ते आठवीच्या शालेय वेळापत्रकात कोडिंगसाठी 12 तास असतील. तर डेटा सायन्ससाठीही 8 ते 12 तास वेळ देण्यात येणार असून, 11 वी आणि 12 वीच्या वर्गांसाठीही डेटा सायन्सचा समावेश कौशल्य विकास अंतर्गत करण्यात येणार आहे.
12वी परीक्षा रद्द झाल्यावर पुढे काय? जाणून घ्या 5 प्रश्नांची उत्तरं
मायक्रोसॉफ्ट इंडियाचे (Microsoft India) कार्यकारी संचालक नवतेज बाल यांच्या मते, शालेय अभ्यासक्रमात या दोन विषयांचा समावेश केल्यानं आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांसाठी ते खूप उपयुक्त ठरेल. आगामी काळातील हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. याद्वारे विद्यार्थी अभ्यासाबरोबरच तंत्रज्ञानातही प्रगती करतील. भविष्यात ही मुलं नवीन दुनिया घडवतील. ही दोन कौशल्ये त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.