नवी दिल्ली, 01 जून: सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षाबाबत (CBSE Board 12th Exam 2021) केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक घोषणा करणार होते. परंतू बारावीच्या परीक्षांबाबत या निर्णयाची घोषणा आज होण्याची शक्यता नाही, अशी माहिती माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 23 मे रोजी याविषयी एक उच्च स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर झालेल्या या बैठकीनंतर शिक्षणमंत्री आज बारावीच्या परीक्षांबाबत महत्त्वाची घोषणा करणार होते. पण कोरोनानंतर उद्भवणाऱ्या समस्यांमुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आज बारावीच्या परीक्षांबाबत कोणतीही घोषणा होईल अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतिम निर्णय ऐकण्यासाठी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक (Union Education Minister Dr Ramesh Pokhriyal Nishank) यांना एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आलं आहे. कोव्हिडनंतर होणाऱ्या आरोग्या संदर्भातील तक्रारींमुळे (Post COVID-19 Complications) त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती एम्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. एप्रिल महिन्यात निशंक यांना कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान बारावीच्या परीक्षांसदर्भात अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. मात्र शिक्षणमंत्र्यांचीच तब्येत बिघडल्यामुळे याबाबत निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता कमी आहे.गेल्या दीड वर्षापासून देशभर थैमान घातलेल्या कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांत ओसरलं असलं, तरी त्याचा धोका संपलेला नाही. त्यामुळेच अन्य क्षेत्रांबरोबरच शिक्षण क्षेत्राच्या वेळापत्रकालाही त्याचा फटका बसला आहे.
हे वाचा-केंद्रीय शिक्षणमंत्री एम्समध्ये भरती, कोरोनातून बरे झाल्यानंतर खालावली प्रकृती
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) आणि कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ICSE) या मंडळांतर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षा यंदा घ्यायच्या की नाहीत, याबद्दलचा अंतिम निर्णय केंद्र सरकार दोन दिवसांत घेणार आहे. देशाचे अॅटर्नी जनरल के. वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर ही माहिती दिली. दरम्यान या परीक्षांसदर्भात निशंक आज लाखो विद्यार्थ्यांना संबोधित करतील अशी अपेक्षा होती. आधीच्या निवेदनात केंद्रीय मंत्री निशंक यांनी असे म्हटले होते की 1 जून रोजी ते विद्यार्थ्यांसंबंधित प्रश्नांची उत्तरं देणार आहेत.
या प्रकरणी पुढची सुनावणी तीन जूनला होणार आहे. दरम्यान, या परीक्षा 24 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत घेण्याचं नियोजन तयार असून, त्याला पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही, असं वृत्त दैनिक भास्करने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेण्याला (Exam) अनेक पातळ्यांवरून विरोध होत आहे. तसंच, काहीजण परीक्षा घेण्याच्या बाजूनेही आहेत. सद्यस्थितीत ऑफलाइन (Offline Exam) स्वरूपात परीक्षा न घेता ती रद्द करावी, अशी मागणी करणारी जनहितयाचिका (PIL) 'सीबीएसई'च्या 521 विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.
हे वाचा- CBSE Exam : कधी आणि कशा होणार बारावीच्या परीक्षा?
यूथ बार असोसिएशनच्या अॅड. तानवी दुबे यांनीही या संदर्भात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. तसंच, अॅड. ममता शर्मा यांनीही याच मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर 28 मे आणि 31 मे रोजी सुनावणी झाली असून, पुढची सुनावणी 3 जून रोजी होणार आहे. याबद्दल निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य सरकारला असून, जो काही निर्णय सरकार घेईल, त्याचं ठोस कारण सरकारकडे असायला हवं, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, दोन दिवसांत सरकार याबद्दलचा निर्णय जाहीर करील, अशी ग्वाही अॅटर्नी जनरल के. वेणुगोपाल यांनी कोर्टात दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam, Coronavirus, Exam