Home /News /career /

मुंबई विद्यापीठाने परीक्षांसाठी दिली नवी डेडलाइन; First Year च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई विद्यापीठाने परीक्षांसाठी दिली नवी डेडलाइन; First Year च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या सत्र परीक्षांबाबत (Semester Examination) नवं सर्क्युलर काढून डेडलाइन वाढवली आहे.

मुंबई, 9 डिसेंबर  : मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या सत्र परीक्षांबाबत (Semester Examination) नवं सर्क्युलर काढून डेडलाइन वाढवली आहे. Coronavirus च्या प्रादुर्भावामुळे या वर्षी सगळी महाविद्यालयं ऑनलाइन सुरू आहेत. या वेळी प्रवेश प्रक्रियासुद्धा लांबली होती. पण मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी डिसेंबर अखेरपर्यंत पहिल्या वर्षीची परीक्षा घेणं बंधनकारक होतं. ही मुदत आता ताज्या सर्क्युलरनुसार वाढवण्यात आली आहे. परीक्षा घेण्याची मुदत विद्यापीठाने वाढवली आहे. या परीक्षा आता 31 डिसेंबरऐवजी 9 जानेवारी 2020 पूर्वी घ्याव्यात, असे विद्यापीठाने आपल्याशी संलग्न महाविद्यालयांना (Affiliated Colleges) पाठवलेल्या ताज्या परिपत्रकात म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठाने 18 नोव्हेंबर 2020 रोजी महाविद्यालयांना पाठवलेल्या परिपत्रकात असं म्हटलं होतं, की पदवी अभ्यासक्रमांच्या सध्याच्या बॅचेसच्या सत्र परीक्षा डिसेंबर 2020च्या अखेरीपर्यंत घेण्यात याव्यात, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढील वर्षी जानेवारीपर्यंत घेण्यात याव्यात. सात डिसेंबर 2020 रोजी मुंबई विद्यापीठाने नवे परिपत्रक जारी केले आहे. त्या परिपत्रकाच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांनी 2020-21 च्या प्रथम वर्षाच्या सत्र परीक्षा नऊ जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. कोरोना (Corona) विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर लागू करण्यात आलेले लॉकडाउन (Lockdown) यांमुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र सुरू होण्यास बराच उशीर झाला. त्यामुळे सत्रातील किमान ९० दिवस शिकवले जाण्याची अट पूर्ण होऊ शकली नाही, याबद्दल अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षकांनी खेद व्यक्त केला असल्याचे ‘जागरण जोश’ने म्हटले आहे. त्यामुळे पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा जानेवारी 2021 पर्यंत पुढे ढकलल्या जाव्यात, असे शिक्षकांनी सुचवले होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून परीक्षा पद्धतीत बदल केले जाण्याची शक्यता आहे. बहुपर्यायी प्रश्न अर्थात एमसीक्यूजचे (MCQs) प्रमाण वाढवले जाऊ शकते. सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. तसेच परीक्षांमध्ये गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आवश्यक ते सुरक्षिततेचे उपाय करण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठ नियोजन करत आहे. परीक्षांवर नजर ठेवण्यासाठी दक्षता पथकांची (Vigilance Suqads) नियुक्ती केली जाणार आहे. ही पथकं विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा (Online Exams) देत असतानाचे व्हिडिओ/फोटो यांची मागणी करतील. यंदा गुणांची फेरपडताळणी (Revaluation) केली जाणार नाही. कारण परीक्षा MCQ पद्धतीने घेतली जाणार आहे.  पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सत्रांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील, असे नोव्हेंबर महिन्यात विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले होते. सर्व प्रकारच्या पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा घेण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही विद्यापीठाने जारी केली होती. ऑक्टोबर 2020मध्ये मुंबई विद्यापीठाने अंतिम सत्राच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या होत्या. तसेच, ऑनलाइन परीक्षा देण्यात विद्यार्थ्यांना काही अडचणी आहेत का, याचा शोध घेण्यासाठी महाविद्यालयांनी सर्वेक्षण करावं, अशा सूचनाही विद्यापीठाने दिल्या आहेत.
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

पुढील बातम्या