नवी दिल्ली : राजस्थानमध्ये जन्मलेल्या आयएएस अधिकारी स्वाती मीणा एक दबंग अधिकारी म्हणून ओळखल्या जातात; मात्र त्यांचा आयएएस होण्याचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे. आपल्या मुलीनं डॉक्टर व्हावं, अशी त्यांच्या आईची इच्छा होती; मात्र स्वाती यांनी एका प्रसंगानंतर आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी परिश्रम घेऊन स्वतःला सिद्ध केलं.
मुलीला डॉक्टर बनवण्याची इच्छा
स्वाती यांचं शिक्षण अजमेरमध्ये झालं. मुलीनं डॉक्टर व्हावं, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यांची आई पेट्रोलपंप चालवत होती. स्वाती यांनीही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की, ‘मलाही यावर काही आक्षेप नव्हता; पण मी आठवीत असताना माझ्या आईची एक चुलत बहीण अधिकारी झाली होती. ती आम्हाला भेटायला आल्यावर माझ्या वडिलांना खूप आनंद झाला होता. त्यानंतर मी वडिलांना यूपीएससीबद्दल विचारलं आणि अधिकारी होण्याचं ठरवलं.’
वडिलांचा पाठिंबा
वडिलांनी स्वाती यांना यूपीएससीची तयारी करण्यासाठी पाठिंबा दिला. त्यांनी स्वतः स्वाती यांची यूपीएससीची तयारी करून घेण्यास सुरुवात केली. त्या अनुषंगाने इंटरव्ह्यूदेखील घेतले. 2007मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत स्वाती यांनी ऑल इंडिया रँक 260 मिळवला, तेव्हा वडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. स्वाती त्या बॅचच्या सर्वांत तरुण आयएएस अधिकारी होत्या. यूपीएससी उत्तीर्ण झाल्यावर त्यांना मध्य प्रदेश केडर मिळाला.
पहिली नियुक्ती मध्य प्रदेशात
आयएएस स्वाती मीणा यांची प्रतिमा दबंग अधिकारी अशी आहे. यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना मध्य प्रदेशात मंडला इथे नियुक्ती मिळाली होती. या ठिकाणी खाणमाफियांचं राज्य होतं. स्वाती यांनी या माफियांविरोधात धडक मोहीम सुरू केली. अनेकदा तर त्यांना कठोर निर्णयदेखील घ्यावे लागले. याबाबत त्या सांगतात, ‘जेव्हा मी कलेक्टर म्हणून मंडलाला पोहोचले तेव्हा खाणमाफियांबद्दल अनेक विभागांकडून तक्रारी आल्या. त्याआधारे मी कारवाई केली.’
आव्हानात्मक कार्यकाळ
त्यांचा खांडव्यातला कार्यकाळही अत्यंत आव्हानात्मक होता. एकदा चकमकीत मारल्या गेलेल्या सिमीच्या दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कार्यक्षेत्रात आले, तेव्हा काही समाजकंटकांनी परिसराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रशासनाला सोबत घेऊन स्वाती मीणा यांनी ही आव्हानात्मक परिस्थिती हाताळली.
Career in Indian Navy: नेव्हीत खलाशी कसं व्हावं? नक्की किती मिळतो पगार? इथे मिळेल A-Z माहिती
व्हिडीओवरून वाद
स्वाती मीणा या एकदा वादातही सापडल्या होत्या. त्यांनी दसऱ्यानिमित्त पोलिस लाईनमध्ये होणाऱ्या शस्त्रपूजेदरम्यान एके-47 ने हवेत गोळीबार केला होता. या गोळीबाराचा व्हिडिओदेखील त्या वेळी व्हायरल झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.