• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • ‘बी फॉरेस्ट’मध्ये IIT च्या दोन विद्यार्थ्यांचा तीन वर्षांत कोटींचा टर्नओव्हर

‘बी फॉरेस्ट’मध्ये IIT च्या दोन विद्यार्थ्यांचा तीन वर्षांत कोटींचा टर्नओव्हर

beforest farming

beforest farming

IIT च्या माजी विद्यार्थ्यांनी 160 शेतकर्‍यांसह 400 एकर सामुदायिक जंगल वाढवण्यासाठी नोकरीवर सोडले पाणी.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21ऑक्टोबर :  आयआयटी (IIT) आणि शेतीचा तसा थेट संबंध येत नाही. कित्येक तरुण तर शेती करावी लागू नये यासाठी आयआयटीमध्ये जाण्याचं स्वप्न पाहतात. पण, हैदराबादच्या दोन तरुणांनी शेतीचाच वापर करून आपली स्वतःची कंपनी उभारली आहे. एवढंच नाही, तर या स्टार्टअपने (Hyderabad IIT guys start-up) गेल्या तीन वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा टर्नओव्हर (Beforest Turnover) गाठला आहे. या तरुणांच्या कंपनीमुळे तब्बल 200हून अधिक जणांना रोजगार तर मिळाला आहेच, पण निसर्गाचंही मोठ्या प्रमाणात संवर्धन होत आहे. सुनीथ रेड्डी (37) आणि शौर्य चंद्र (39) या दोघांची निसर्गाप्रती असणारी ओढच या स्टार्टअपला कारणीभूत ठरली. सुनिथ यांनी आयआयटी चेन्नईमधून (IIT Chennai) कम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे, तर शौर्य यांनी आयआयटी रुरकीमधून (IIT Roorkee) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. यानंतर शौर्य यांनी आयआयएम अहमदाबादमधून मॅनेजमेंटचेही शिक्षण पूर्ण केले आहे. या दोघांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये काम केलं. या ठिकाणी त्यांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या होत्या. मात्र, त्यांना काहीतरी नवीन आणि वेगळं करायचं होतं. यातूनच पुढे ‘बीफॉरेस्ट’चा (Beforest Start-up) जन्म झाला. या कंपनीच्या (Beforest) माध्यमातून लोकांना एकाच शेतजमिनीत फळं, भाज्या, मसाले आणि धान पिकवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. शेतीच्या या प्रकाराला परमाकल्चर (Permaculture) म्हणतात. याबाबत बोलताना शौर्य चंद्र सांगतात, “मी आणि सुनीथ 13 वर्षांपासून एकमेकांसोबत काम करत आहोत. पहिल्यापासूनच आम्हाला निसर्गाप्रती ओढ होती. यामुळेच आम्ही असं काहीतरी करायचा निर्णय घेतला, जे निसर्गाशी संबंधित असेल. यातूनच मग आम्हाला बीफॉरेस्ट सुरू करण्याची कल्पना सुचली.” ते पुढे म्हणाले, “आम्ही सुरुवातीला याबाबत रिसर्च केला. यातून आम्हाला समजलं, की अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकाच प्रकारचं पीक घेऊन म्हणावा असा फायदा होत नाही. त्यामुळे आम्ही अशा लहानलहान शेतकऱ्यांना एकत्र घेऊन ही वेगळी शेती (Beforest Farming) सुरू केली.”

  काय आहे परमाकल्चर?

  साधारणपणे शेतीमध्ये एका वेळी एकाच प्रकारचे पीक घेतले जाते. तसेच, बऱ्याच प्रमाणात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो. पण परमाकल्चरमध्ये (What is Permaculture) असं काहीही होत नाही. यात एकाच जमिनीवर एका वेळी अनेक प्रकारची पीकं घेतली जातात. तसेच, कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशक वापरले जात नाही. “परमाकल्चरचा सर्वात मोठा फायदा (Benefits of Permaculture) म्हणजे, यात एका पिकाचे बाय-प्रॉडक्ट दुसऱ्या पिकाला फायद्याचं ठरतं. त्यामुळे आपल्याला कसलेही कृत्रिम खत वा कीटकनाशक टाकण्याची गरज पडत नाही. यामुळेच मातीची सुपीकताही टिकून राहते. ज्याप्रमाणे निसर्गामध्ये झाडं स्वतःच मोठी होतात, त्याचप्रमाणे परमाकल्चरमध्ये पीकं मोठी होतात.” अशी माहिती सुनीथ यांनी दिली. दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

  बीफॉरेस्ट कसं काम करतं?

  ‘बीफॉरेस्ट’मध्ये कित्येक लोक एकत्र येऊन एक मोठी शेतजमीन (How does BeForest work) विकत घेतात. यानंतर अगदी कमी किंमतीमध्ये जास्तीत जास्त पिकांचे उत्पादन याठिकाणी घेण्यात येते. विविध प्रकारच्या पिकांमुळे ही जमीन एखाद्या खऱ्या जंगलाप्रमाणेच दिसते. एक असं जंगल जिथे जांभूळ, फणस, संत्री, चेरी, कॉटन सिल्क, काळी मिरी आणि चक्क कॉफीचीही झाडं आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं, आणि सर्वांना समान भाग मिळतो. यासोबतच, बीफॉरेस्ट स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची योग्य किंमत मिळवून देण्यात आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यातही मदत करते. सुनीथ सांगतात, “पहिल्या प्रोजेक्टमध्ये शौर्यसोबत आणखीही काही लोक सहभागी झाले होते. शेतीसाठी आम्ही हैदराबादजवळ (Hyderabad Beforest) एखाद्या गावात जमीन शोधत होतो. आम्ही या जमीनीच्या छोट्या छोट्या भागांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. पहिल्या प्रोजेक्टमधून चांगलं उत्पन्न मिळालं, मग आम्ही आमच्या कामाचा आवाका वाढवला. एका वर्षात या प्रोजेक्टमध्ये भरपूर लोक जोडले गेले, आणि कामही वाढू लागलं.” सध्या बीफॉरेस्ट हैदराबाद, मुंबई, कुर्ग आणि चिकमंगळूर अशा चार ठिकाणी सुमारे 500 एकर जमिनीवर काम करत आहे. यामध्ये सुनीथ आणि शौर्यसोबत प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगवेगळे पार्टनर आहेत.

  निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी

  कित्येक लोकांना शहराच्या धकाधकीच्या जीवनापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात रहायचं असतं. बीफॉरेस्ट अशा लोकांसाठी आपल्या शेतजमिनीजवळ इको फ्रेंडली घरंही उभारून देत आहे. शौर्य सांगतात, “आम्ही स्थानिक लोकांना सोबत घेऊन काम करत असतो. त्यामुळे ज्या पार्टनर्सना इथे येऊन रहायचं आहे ते इथल्या स्थानिक संस्कृतीला चालना देतील याचीही खबरदारी आम्ही घेतो.” बीफॉरेस्टमध्ये जमीन ही कोणा एकट्याच्या मालकीची नसून, सर्वांचा त्यावर समान हक्क असतो. त्यामुळे सर्वजण मिळून काम करतात. एक टीम सर्व शेतकऱ्यांना कोणी काय करायचे आहे याबाबत मार्गदर्शन करते. यासोबतच, एकूण पिकाचे एकमेकांमध्ये कसे वाटप होईल हेदेखील ठरवले जाते. सुनीथ सांगतात, की ‘बी हॅप्पी’ या शब्दांवरून त्यांनी कंपनीचे नाव ‘बीफॉरेस्ट’ असे ठेवले आहे. लोकांनी निसर्गाशी अधिक जोडलेले राहणे गरजेचे आहे, तसेच सर्वांनी खूश राहणेही गरजेचे आहे. एकंदरीतच निसर्ग आणि मानवामध्ये योग्य ताळमेळ राखणे गरजेचे आहे, असं त्यांचं मत आहे. बीफॉरेस्टच्या माध्यमातून ते नक्कीच शेतकऱ्यांची आणि निसर्गाचीही मदत करत आहेत.
  First published: