मराठी बातम्या /बातम्या /करिअर /पर्रीकर ते केजरीवाल 'या' नेत्यांकडे आहे IIT ची पदवी

पर्रीकर ते केजरीवाल 'या' नेत्यांकडे आहे IIT ची पदवी

मनोहर पर्रीकर, अरविंद केजरीवाल

मनोहर पर्रीकर, अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. केजरीवाल यांच्याप्रमाणेच भारतातील इतर काही नेत्यांनी देखील आयआयटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

    नवी दिल्ली, 31 मार्च :   इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी ही संस्था  भारतातील सर्वांत प्रतिष्ठित शिक्षण संस्थांपैकी एक आहे. सायन्स आणि इंजिनीअरिंग ब्रँचमधील टॉपर विद्यार्थ्यांची पहिली पसंती याच संस्थेला मिळते. सायन्स आणि टेक्नॉलॉजीमधील शैक्षणिक उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून जागतिक स्तरावर आयआयटीची ओळख आहे. या ठिकाणी प्रवेश मिळवणं ही खूप प्रतिष्ठेची बाब मानली जाते. या ठिकाणी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना जगभरात कोठेही सर्वोत्तम पगाराची नोकरी मिळते, असं म्हटलं जातं.

    मात्र, आयआयटीचे काही माजी विद्यार्थी असे आहेत ज्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्णवेळ नोकरी न करता किंवा काही वर्षं नोकरी केल्यानंतर राजकारणाचा रस्ता धरला आहे. आपल्या देशाच्या राजकारणामधील काही आघाडीचे नेते आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

      अरविंद केजरीवाल 

    दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी 1989 मध्ये आयआयटी खरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतलेली आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी भारतीय महसूल सेवा विभागात अधिकारी म्हणूनही काम केलेलं आहे. 2012 मध्ये केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली. ते दिल्लीचे दुसऱ्या क्रमांकाचे तरुण मुख्यमंत्री आहेत.

    मनोहर पर्रीकर 

    गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते मनोहर पर्रीकर हे आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी होते. चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री राहिलेल्या मानोहर पर्रीकर यांनी 1978 मध्ये आयआयटी बॉम्बेतून मेटलर्जी इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतली आहे . भाजप नेते असलेले पर्रीकर हे आयआयटीचे पहिले माजी विद्यार्थी होते जे एखाद्या राज्याचे आमदार आणि मुख्यमंत्री बनले. दीर्घ आजाराशी झुंज दिल्यानंतर 17 मार्च 2019 रोजी वयाच्या 63व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

    जयराम रमेश

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश हेदेखील आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी 1975 मध्ये आयआयटी बॉम्बेमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवलेली आहे. ते 1998 मध्ये काँग्रेसमध्ये सामील झालेले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. यूपीए सरकारच्या काळात ते केंद्रीय मंत्रीदेखील होते. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत.

    अजित सिंह 

    राष्ट्रीय लोकदलाचे (आरएलडी) संस्थापक आणि प्रमुख दिवंगत अजित सिंह हेसुद्धा आयआयटीमध्ये शिकले आहेत. त्यांनी आयआयटी खरगपूर येथून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली आहे. ते माजी पंतप्रधान चरण सिंह यांचे पुत्र होते. ते लोकदलाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी अनेकवेळा केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केलं आहे. अजित सिंह यांनी 1996 मध्ये आरएलडीची स्थापना केली. 2011 मध्ये आरएलडी पक्ष यूपीएमध्ये सामील झाला. अजित सिंह 2011 ते 2014 पर्यंत नागरी विमान वाहतूक मंत्री होते.

    जयंत सिन्हा

    भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा हे आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. ते ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांचे पुत्र आहेत. ते सध्या मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आहेत. 2014 ते 2016 दरम्यान त्यांनी अर्थ राज्यमंत्री म्हणूनही काम केलेलं आहे. ते लोकसभेत झारखंडमधील हजारीबागचं प्रतिनिधित्व करतात.

    First published:
    top videos

      Tags: Arvind kejriwal, Politics