मराठी बातम्या /बातम्या /करिअर /परिस्थितीपाई आई-वडिलांची आत्महत्या, पण मोठ्यानं सांभाळलं अन् तिन्ही सख्खे भाऊ झाले पोलीस, अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी बातमी!

परिस्थितीपाई आई-वडिलांची आत्महत्या, पण मोठ्यानं सांभाळलं अन् तिन्ही सख्खे भाऊ झाले पोलीस, अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी बातमी!

चौघे भावंडं

चौघे भावंडं

कृष्णा, ओंकार आणि आकार लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांनी नापिकी शेतीमुळे आत्महत्या केली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Parbhani, India

परभणी, 26 मे : एका परिवारातील मुलांच्या आई वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले होते. यानंतर या मुलांनी जगण्याचा संघर्ष करत आश्रमशाळेतून शिक्षणाची वाट निवडली. यानंतर जीवतोड मेहनत करुन सर्वांनाच प्रेरणा देईल, असं यश मिळवलं. ही कहाणी आहे, सिसोदे कुटुंबातील तिन्ही भावंडांची.

गंगाखेड तालुक्यातील माखणी गावातील या तिन्ही भावंडांची नुकतीच पोलीस भरतीत अंतिम निवड झाली आहे. या तिघांच्या संघर्षमयी प्रवासात त्यांना त्यांचा थोरला भाऊ आकाश यांचे पाठबळ मिळाले. त्यामुळे त्यांनी यशाला गवसणी घातली. कृष्णा, ओंकार, आकार या सिसोदे बंधूंच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र वयाच्या आठव्या वर्षीच हरपले. त्यानंतर दुसरीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी खानापूर फाटा येथील आश्रमशाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, ही शाळा बंद झाली.

त्यामुळे आता पुढे काय करणार, या विचारात ते होते. अशातच त्यांना परभणीतील जिजाऊ ज्ञानतीर्थ या शैक्षणिक संस्थेत मोफत शिक्षणाची संधी मिळाली. तिथे त्यांनी आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील महिला आणि बालविकास विभागाच्या वसतिगृहात काम केले. पण शिक्षणाचा ध्यास सोडला नाही.

दरम्यान, पोलीस भरतीची जाहिरात आली आणि तिन्ही भावंडांपैकी कृष्णा आणि आकार यांनी मुंबई, तर ओंकार याने परभणीत अर्ज भरला. त्यात तिन्ही भावंडांची पोलीस दलात निवड झाली. कृष्णा केशव सिसोदे (23), ओंकार केशव सिसोदे (21), आकार केशव सिसोदे (21) या तिन्ही भावंडांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आणि यारुपाने तिघांच्या संघर्षाला फळ मिळाले.

मोठा भाऊ आकाश आजही सालगडी -

कृष्णा, ओंकार आणि आकार लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांनी नापिकी शेतीमुळे आत्महत्या केली होती. त्यामुळे मोठा भाऊ आकाश यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. मिळेल ते काम करून त्यांनी भावंडांना शिक्षणासाठी मदत करून मायेची ऊब दिली. आकाश सिसोदे आजही माखणी गावात सालगडी म्हणून काम करत आहे. मोठ्या भावाने तिघांना सांभाळले, त्याच्या कष्टाचं मेहनतचीचंही आज चीज झालं. या तरुणांचा प्रवास अख्ख्या महाराष्ट्रासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

First published:
top videos

    Tags: Career, Inspiring story, Parbhani, Police, Success Story