रेल्वे भाडेवाढीविरोधात काँग्रेस तर मेट्रोविरोधात भाजप रस्त्यावर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2014 05:31 PM IST

रेल्वे भाडेवाढीविरोधात काँग्रेस तर मेट्रोविरोधात भाजप रस्त्यावर

congress_bjp_protest25 जून : रेल्वे भाडेवाढीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय. आज राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेसनं रेलरोको केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. मुंबई, नवी मुंबईपासून नागपूर, नांदेड, मनमाड, नंदुरबार अशा अनेक ठिकाणी रेल रोको करण्यात आला. तर दुसरीकडे मुंबईत भाजप मेट्रोच्या भाडेवाढीविरोधात आंदोलन करत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. कुर्ला येथील बीकेसीमधल्या एमएमआरडीएच्या ऑफिसवर मोर्चा काढण्यात आला. मेट्रोची भाडेवाढ कमी करावी अशी मागणी शेलार यांनी केली. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि राज्य सरकारमध्ये मेट्रोच्या दरावरून मॅचफिक्सिंग झाल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला. काल मंगळवारी हायकोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली असल्यामुळे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला भाडेवाढ करण्यास मुभा मिळालीय.

मुंबईत काँग्रेसचं आंदोलन

आज उत्तर मुंबई जिल्हा काँग्रसने मालाडला रेल्वे भाडेवाढीविरोधात रेल रोको केला. अब की बार मेहंगी सरकार अशी घोषणाबाजी करण्यात आली. तर ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म 5 वर गाडी अडवून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रेल्वे भाडेवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि प्रवाशांमध्ये बाचाबाचीही झाली. 27 जूनला खासदारांच्या घरासमोर घंटानाद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाशी रेल्वे स्टेशनजवळ जोरदार घोषणाबाजी करत पनवेल-अंधेरी लोकल अडवली. या रेल रोकोमुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.

विदर्भात रेल रोको

काँग्रेसच्या वतीने नागपुरातही रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर रेल्वे स्टेशनमध्ये हैदराबाद निजामुद्दीन एक्स्प्रेस अर्धा तास रोखण्यात आली होती. वर्ध्यामध्ये रेल रोकोची जोरदार तयारी करूनही कार्यकर्ते रुळावरच उतरले नाहीत त्यामुळे या आंदोलनाची जिल्ह्यात मोठी चर्चा आहे. कार्यकर्त्यांनी आंदोलनाआधीच स्वतःला अटक करवून घेतली तर काँग्रेसच्या दिग्गजांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. अकोला काँग्रेस जिल्हा समितीनं सिकंदराबाद-बिकानेर एक्स्प्रेस 20 मिनिटं रोखून धरली. या रेल रोकोमुळे प्रवाशांना ताटकळावं लागलं.

Loading...

अशोक चव्हाणांची दांडी

नांदेडमध्येही भाडेवाढीविरोधात काँग्रेसनं रेलरोको आंदोलन केलं. काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र या रेलेरोकोला दांडी मारली. काँग्रेसने तपोवन एक्स्प्रेस रोखली आणि त्यानंतर 10 मिनिटांत हे आंदोलन गुंडाळण्यात आलं. पण आपण प्रत्यक्ष सहभागी नसलो तरी आपल्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल्याचं चव्हाणांनी स्पष्टीकरण दिलं.

फोटोसेशनच्या गडबडीत काँग्रेस नगरसेविका जखमी

सोलापुरातल्या रेल रोको आंदोलनामुळे दक्षिण भारताकडे जाणार्‍या रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे हैदराबाद-चेन्नई आणि बंगळुरूकडे जाणार्‍या रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं. रेल्वे स्थानकावर फोटोसेशनच्या गडबडीत काँग्रेस नगरसेविका सुशील आंबुटे खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर जखमी झाली.

मनमाडमध्ये एक्स्प्रेस रोखली

मनमाडमध्ये बंगलोर हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस काही काळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखून धरली. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मार्ग मोकळा केला. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नंदुरबार रेल्वे स्टेशनवर नवजीवन एक्स्प्रेस अडवत भाजप सरकारविरोधात आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

निवडणुकीच्या तोंडावर आता प्रत्येकच गोष्टीचं राजकारण सुरू झालंय.. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला अशा आंदोलनांचा कितपत फायदा होईल का, हा खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2014 07:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...