अद्वैत मेहता, प्रतिनिधी, पुणे
यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाचं 125 वं वर्ष साजरे करण्यावरून पुण्यात जोरदार वाद पेटलाय. मुळात यंदा 126 वं वर्ष असताना 125 वं म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष का याला आक्षेप घेतला गेलाय आणि या आक्षेपाच्या अंतरंगात वादाचं मूळ दडलंय. कारण भाऊ रंगारी यांनी 126 वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्याचा प्रचार,प्रसार केला म्हणून रंगारी हे जनक आणि टिळक हे प्रचार, प्रसारक असा दावा भाऊ रंगारी ट्रस्टचच्या विश्वस्तांनी घेतलाय म्हणूनच हे 125वं नाही तर 126 वं वर्ष आहे असाही दावा केला गेलाय.
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी वाद नको म्हणून बोधचिन्हातून लोकमान्यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला पण यामुळं वाद शमण्याऐवजी चिघळला. लोकमान्य टिळक आणि भाऊ रंगारी या दोघांचाही फोटो असावा, टिळकांना विरोध नाही अशी भूमिका भाऊ रंगारी ट्रस्टनं घेत महापौर याच टिळकांची अवहेलना करत आहेत. राजकारण आणत आहेत म्हणून निशाणा साधला.
दुसरीकडे शिवसेनेसह पुणेकरामंधेही महापौरांच्या भूमिकेबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत चौफेर टीका सुरू झाल्यानं मुक्ता टिळक यांना सारवासारव करावी लागली. जाहिराती आणि फ्लेक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या फोटोंचा समावेश आहे,लोगो मधून फोटो वगळला हा गैरसमज आहे अशी मखलाशी करावी लागली. दीपक टिळक यांनी ब्रिटिशांविरोधात सार्वजनिक गणेशउत्सवाद्वारे लोकांची एकजूट करण्यामागे टिळकांचं योगदान होतं आणि हे सर्व जाणतात त्यामुळे हा वाद दुर्दैवी, कारण आहे. सांगत जनक कोण या वादात पडायचं नाही पण टिळकांनी अनेकांना सोबत घेऊन गणेश उत्सव व्यापक केला. बोधचिन्हाचा मुद्दा छोटा असला तरी टिळकांचा फोटो हटवणे चूक असल्याचं सांगितलं.
खरं तर इतक्या वर्षानंतर हा वाद कशासाठी हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण कागदपत्रे, केसरीतील अग्रलेख, रंगारी यांचं मृत्यूपत्र यातून नवीन पुराव्यांचा आधार घेत आम्ही हा दावा करत आहोत असं म्हणणं भाऊ रंगारी मंडळाच्या विश्वस्त, कार्यकर्त्यांचं आहे. यामागे ब्राम्हण-ब्राम्हणेतर वादाचं राजकारण आहे अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे पण उघड कुणी बोलत नाही. समाजमाध्यमात या विषयावर जोरदार वाद,चर्चा रंगले असताना कोर्टातही हे प्रकरण पोहोचलंय. यंदा गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय शिवाय तो शासन स्तरावर होतोय त्यामुळे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे,मुख्यमंत्री फडणवीस या वादावर काय भूमिका घेतात याकडेही पुण्यातील गणेश मंडळांचे लक्ष लागलंय.
अनेक सुजाण नागरिकांना या वादापेक्षा पुणे पालिका उत्सवावर 2 कोटींचा करत असलेला खर्च, गणेश उत्सवाला येत असलेलं बाजारू स्वरूप, वाढतं ध्वनी प्रदूषण, 24 तासांपेक्षा जास्त वेळ चालणारी विसर्जन मिरवणूक,त्यात दारू पिऊन रोम्बा सोम्बा डान्स करणारे काही घटक, वर्गणीच्या नावे खंडणी मागणारे असामाजिक घटक याबद्दल चिंता वाटतेय पण डीडे डाॅल्बी, ढोल ताशांच्या दणदणाटामध्ये ,गरमागरम राजकीय वाद चर्चांमध्ये नागरिकांना विचारतो कोण?
पुण्यातला गणेश उत्सव वैभवशाली आहे. पारंपरिक पद्धतीने सामाजिक,राजकीय देखाव्याद्वारे प्रबोधन करत, लोकोपयोगी सामाजिक पर्यावरण पूरक उपक्रम राबवत आनंद आणि ऊर्जा निर्माण करणारा लोकोत्सव म्हणून त्याचं आगळं स्थान आहे. या निमित्ताने अनेक छोट्या मोठ्या कलाकारांना व्यासपीठ मिळतं. शाडूच्या मूर्ती बनवण्यापासून, नदीत विसर्जन न करता हौदात विसर्जन करण्याकडे वाढलेला कल यामुळे चांगले पायंडे पडत आहेत, जागृती होतेय.
उत्सवाची ही दुसरी सकारात्मक बाजू महत्वाची असली तरी जातीय तेढ न वाढवता चर्चेतून समन्वयाने वाद सोडवले पाहिजेत हेही महत्वाचं आहे. मुळात लोकांना एकत्र आणणारा उत्सव लोकांमध्ये फूट पाडणारा ठरू नये याची जबाबदार सर्वांची आहे. 125 वर्ष पूर्ण होत असताना उत्सवातील बाजारूपणा, नकारात्मक गोष्टी दूर करत वर्षभर ऊर्जा पुरवणारा हा 10 दिवसांचा उत्सव कोणतंही विघ्न न येता पार पडावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं आवश्यक आहे.कोणतंही गालबोट न लागता उत्सव पार पडू दे हीच प्रार्थना सुखकर्त्याकडे, बुद्धीची देवता असलेल्या गणेशाकडे करूया...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा