S M L

अरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का?

यवतमाळला होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे. ही निवड अनेक अर्थांनी विशेष आहे. मराठी साहित्य संमेलनातले रटाळ परिसंवाद, चर्चा टाळणं या चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या नेहमीच्या डुढ्ढाचार्यांऐवजी विविध माध्यमांतून लिखाण करणाऱ्या तरुणाईला व्यासपीठ देणं हे प्राध्यापिका असणाऱ्या अरुणाताईंना अवघड नाही.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2018 08:45 PM IST

अरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का?

केतकी जोशी

'महाराष्ट्राला मोठी ज्ञानपंरपरा आहे...ही परंपरा पुढे नेणारी प्रतिनिधी म्हणून मी हे पद स्वीकारले आहे. ही परंपरा पुढे नेणे हे मला कर्तव्य वाटते', हे उद्गार होते डॉ. अरुणा ढेरे यांचे.. 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते.

अरुणा ढेरे यांचं नाव माहिती नाही असा साहित्यप्रेमी बहुधा नसेलच... याचं कारण म्हणजे कविता, कथा, ललित, कादंबरी, अनुवादित कथा, स्त्री आणि लोकसंस्कृती, समीक्षा अशा जवळपास प्रत्येक प्रकारचं त्यांनी लेखन केलंय. घरातूनच साहित्याचा वारसा अरुणाताईंना लाभला. प्रसिद्ध साहित्यिक रा. चिं. ढेरे यांच्या त्या कन्या, पण ही ओळख त्यांनी तिथपर्यंतच कधीच मर्यादित ठेवली नाही. उलट राचिं.चा वारसा त्यांना जपला आणि पुढेही नेलाय.


Loading...

लहानपणापासून पुस्तकांच्या जगात वावरणाऱ्या अरुणाताईंनी व्यक्त होण्यासाठी लेखणी जवळ केली नसती तरच नवल. अरुणाताईंच्या लेखनाची सगळ्यांत भावणारी गोष्ट म्हणजे त्यांची ओघवती आणि सुंदर सहज भाषा. ती अगदी सहज त्यांच्या लेखणीतून उतरते. विषय कितीही किचकट असो त्यांच्या लेखणीतून तो अगदी मनापर्यंत पोहोचतो.  मग ते काळजाचा ठाव घेणारं कृष्णकिनारा असेल प्रेमातून प्रेमाकडे, विस्मृतीचित्रे असो... किंवा काश्मीरच्या राजानं लिहिलेल्या राजतरंगिणीचा अनुवाद असेल. त्यांच्या कविता हुरहुर लावतात, कल्पनाचित्रात रमवतात, पण भानावरही आणतात. मूळच्या प्राध्यापिका आणि डॉक्टरेट असलेल्या अरुणा ढेरे या उत्तम वक्त्यादेखील आहेत. पण त्या कोणताच आव आणत नाहीत. अगदी सहजपणे वाचकांशी, प्रेक्षकांशी संवाद साधत त्या बोलतात.

संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमतानं झालेली निवड हे विशेष महत्त्वाचं आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड निवडणूक न होता करण्यात यावी अशी घटनादुरुस्ती महामंडळानं केली आणि त्यानंतर पहिल्यांदाच हा मान अरुणाताईंना मिळाला हे विशेष...निवडणुकीसाठी नाव जाहीर होणं, मग त्यातले आरोप-प्रत्यरोप, चिखलफेक हे सगळं अरुणाताईंच्या प्रकृतीला न मानवणारंच होतं. एकमतानं निवड झाली म्हणूनच आपण ती मान्य केली, हे अरुणाताईही खुल्या मनानं मान्य करतात.

म्हणूनच ही निवड महत्त्वाची आहे. अरुणाताईंच्या निमित्तानं आपल्याला पाचव्या महिला संमेलनाध्यक्ष मिळाल्या आहेत. यापूर्वी पहिल्या महिला अध्यक्ष होत्या कुसुमावती देशपांडे. 1961 मध्ये ग्वाल्हेर इथं झालेल्या संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी हा मान मिळाला 1975 मध्ये कराडच्या संमेलनात दुर्गा भागवत यांना. मग पुन्हा 21 वर्षांनी  आळंदीमध्ये 1996 साली महिला संमेलनाध्यक्ष झाल्या त्या शांता शेळके. 2001मध्ये इंदूर इथं डॉ. विजया राजाध्यक्ष यांना  हा मान मिळाला. याच परंपरेत आता डॉ. अरुणा ढेरे यांचं नाव आलंय.

यवतमाळला हे संमेलन होणार आहे... पुण्यामुंबईच्या गर्दीपेक्षा वेगळी आणि जास्त गर्दी इथं साहित्य रसिकांची होईल अशी अपेक्षा आहे...त्यात काहीतरी वेगळं, चांगलं आणि सकस असेल तर हीच गर्दी पुढे होणाऱ्या संमेलनात टिकू शकते अशीही अपेक्षा आहे. त्याशिवाय संमेलन म्हणजे वाद हेही समीकरण मोडीत निघावं असंही वाटतंय.

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हे फक्त मिरवण्याचं पद असतं अशी टीका नेहमीच होते. साहित्य संमेलनाच्या विरोधातले सूरही भरपूर निघतात. मुळात संमेलन घ्यायचंच कशासाठी असंही बोललं जातं आणि हेच मोठं आव्हान अरुणाताईंसमोर आहे. संमेलनापासून लागलेल्या सर्वसामान्य मराठी वाचकाला आणि विशेषत: तरुणाईला साहित्याकडे वळवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

सोशल मिडीया, डिजीटलच्या युगात पुस्तकं, मराठी भाषा याकडे आताच्या तरुणाईला वळवण्यासाठी अरुणाताईंनी काही गोष्टी कराव्यात अशी नक्कीच अपेक्षा आहे. मराठी साहित्य संमेलनातले रटाळ परिसंवाद, चर्चा टाळणं या चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या नेहमीच्या डुढ्ढाचार्यांऐवजी विविध माध्यमांतून लिखाण करणाऱ्या तरुणाईला व्यासपीठ देणं हे प्राध्यापिका असणाऱ्या अरुणाताईंना अवघड नाही. त्याशिवाय सगळ्यात मोठी उत्सुकता आहे ती अरुणाताईंच्या भाषणाची. गेली अनेक वर्षं आवर्जून ऐकावं असं संमेलनाध्यक्षांचं भाषण झालेलंच नाही. आता अरुणाताईंच्या निवडीमुळे सहजसुंदर, ओघवती मराठी भाषा पुन्हा ऐकायला मिळेल ही अपेक्षा आहेच. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर...

देता यावे शब्द

अम्लान निसंशय

आयुष्याच्या पायाशी जगणारे

निरहंकार...

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2018 08:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close