91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं फलित काय?

91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं फलित काय?

बडोद्यामध्ये मराठीजनांची संख्या सुमारे 5 लाखांच्या घरात आहे. यापूर्वी 1934 मध्ये बडोद्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं. यामुळे 84 वर्षांनी होणाऱ्या संमेलनाबद्दल बडोदेवासियांमध्ये मोठी ऊत्सुकता होती.

  • Share this:

मिलिंद भागवत, 22 फेब्रुवारी : 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सूप वाजलं. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांचं, राजा तू तू चुकत आहेस हे विधान, प्रकाशकांनी शेवटच्या दिवशी केलेलं आंदोलन, परिसंवादात काही मान्यवरांनी, स्वातंत्र्यांची गळचेपी होत्येय या वादग्रस्त गोष्टींसह महाराजा सयाजीराव गायकडाव यांच्यावरील मराठी आणि इंग्रजी चरित्रग्रंथांच्या प्रकाशनाच्या सकारात्मक मुद्याही बडोद्यात महत्वाचा ठरला. पण या संमेलनानंतर पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे या संमेलनाचं फलित काय?

ग्रंथदिंडी

बडोद्यामध्ये मराठीजनांची संख्या सुमारे 5 लाखांच्या घरात आहे. यापूर्वी 1934 मध्ये बडोद्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं. यामुळे 84 वर्षांनी होणाऱ्या संमेलनाबद्दल बडोदेवासियांमध्ये मोठी ऊत्सुकता होती. साहाजिकच संमेलनाच्या तयारीत मराठी जनांपैकी एक मोठा वर्ग सक्रीय होता. साहित्य संमेलनाच्या पूर्व संध्येला निघालेल्या ग्रंथ दिंडीला बडोदेकरांचा मिळालेला प्रतिसाद जबरदस्त होता. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्था यांच्यासह सर्वसामान्य बडोदेकर मोठ्या संख्येने ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले होते. अडिच किलोमिटरच्या या ग्रेथदिंडीच्या शेवटपर्यंत सगळ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. दिंडी बरोबर असणाऱ्या शोभायात्रेत, मल्लाखांब, रोप मलखांब, लेझिम, ढोल यांच्यासह बोथाटी फिरवणारे तरूण, वृक्षारोपणाचं महत्वन सांगणारे आबालवृद्ध सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या रोहीलेल्या लोकांनी या ग्रंथ दिंडीचं अनेक ठिकाणी स्वागत केलं.

महाराजा सयाजीराव गायकवाड खंड

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेणाऱ्या सहा मराठी आणि सहा इंग्रजी अशा 12 खंडांचं प्रकाशन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, महाराष्ट्राचे सांकृतिक मंत्री विनोद तावडे, बडोदा संस्थानच्या राजमाता शुभांगिनीराजे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. साहित्यिक बाबा भांडं यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सलग दीड वर्षाच्या प्रयत्नाने तयार केल्या या ग्रंथांच्या माध्यमातून महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या सर्व गुणांचा आणि कर्तृत्वाचा विस्तृत आढावा या खंडांच्या माध्यमातून जगासमोर आणला आहे. पंचायती राजची कल्पना, बालशिक्षणाचा हक्क, महिलांच्या संदर्भातील विविध निर्णय, बालविवाहा विरोधातील कायदा, सहभोजनसाठीचा आग्रह, देशातलं पहिलं धरण यासह अनेक महत्वाची कामं सयाजीराव गायकवाड यांनी केली आहेत याचा गौरवपूर्ण उल्लेख या खंडात करण्यात आला आहे.

राज्यपाल श्रीनिवास पाटील, राजमाता शुभांगिनीराजे, यांच्यासह राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची यावेळी भाषणं झाली. यावेळी मराठीतल्या शब्दाचा अर्थ समजला नाही तर काय होतं याचे किस्सा तावडे यांनी सांगितले आणि उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. पण या चरित्र खंडाच्या निमित्ताने आजपर्यंत ज्या सयाजीराव महाराजांचं कार्य महाराष्ट्रासह देशात दुर्लक्षित राहीलं होतं त्यावर मोठा प्रकाशझोत टाकण्यात राज्य सरकार आणि बाबा भांड यांच्या अध्यक्षतेखालील समिती यशस्वी झाली.

उद्घाटन

91 व्या अ.भा.मराठी साहित्य संमंलनाच्या उद्घाटन समारंभ गाजला तो, मुख्यमंत्र्यांची 25 लाखांचं अनुदान दुप्पट करण्याची घोषणा आणि फडणवीस यांच्या अनुपस्थितीत राजा तू चुकत आहेस या संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या विधानामुळे. नेहमीप्रमाणे उशिराने सुरु झालेला कार्यक्रम, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, लांबलेली भाषणं आणि संमेलनाध्यक्ष देशमुख यांच्या एक तास चाळीस मिनीटांच्या भाषणाने उपस्थितांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला. बडोद्यातल्या या संमेलनाच्या उद्घाटनाला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी अनेकांना खटकली.

परिसंवाद

महिला संतांची बंडखोरी आणि स्त्री वाद, मराठी साहित्याचा सरकलेला केंद्रबिंदू - नगर ते नांगर, कथा कथाकार, आणि कथानुभव ही चर्चा सत्र उपस्थितांसाठी उद्बोधक ठरली. तर निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची बेधडक मुलाखत त्यांच्या आक्रमक पण संयमी विधानांनी श्रोत्यांना आवडली. चपळगवकर यांनी गेल्या काही काळातल्या समाजातल्या घटनांवर आणि सरकारच्या काही विषयातल्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला. रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोळकर आणि अँड. उज्वल निकम यांच्या मुलाखतीला रसिकांनी चांगलंच उचलून धरलं. या तीनही मान्यवरांनी आपापल्या अनुभवाच्या आधारे रसिकांना खिळवून ठेवलं.

कार्यशाळा

निवेदन आणि सूत्रसंचालन, पटकथालेखन, डिजिटल पब्लिशिंग, कथा आणि कवितालेखन, गीतलेखनाचा प्रवास, आणि सध्याचं तरुणाईचं माध्यम म्हणजे ब्लॉग्ज या विषयांवर मान्यवरांनी घेतलेल्या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला.

कवीसंमेलन

मागच्या काही साहित्य समेलनाची कवीकट्ट्याची कल्पना बडोद्याच्या समेलनातही सुरु राहीली. अनेक नव कवींना या ठिकाणी आपापल्या कविता सादर करण्याची संधी देण्यात आली. आणि याचा अनेकांना लाभही घेतला. मात्र त्यात दर्जेदार कवीतांचा मत्र अभाव जाणवला. मिमंत्रितांच्या कवीसंमेलनाकडे काही मान्यवरांनी पाठ फिरवल्यामुळे रसिकांची थोडी निराशा झाली. बहुभाषिक कवीसंमेलनालाही रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

काही गोंधळ नेहमीचेच...

माजी संमेलनाध्यक्ष आणि बडोद्याच्या संमेलनात पराभूत झालेल्या साहित्यिकांना निमंत्रणं पाठवली नसल्याची ओरड झाल, पण प्रत्यक्षात निमंत्रणेच उशिराने तयार झाल्याने ती वेळेत पोहोचण्याचा प्रश्नच नव्हता.. साहित्य संमेलनात ग्रंथदिंडीला जेवढे महत्व आहे तितकेच महत्व आहे ग्रंथ प्रदर्शनाला. पण मागच्या काही संमेलनात प्रकाशक आणि संमेलनाच्या आयोजकांमध्ये वादाची परंपरा इथेही कायम राहीली. ग्रंथ प्रदर्शनाचं नेहमीप्रमाणे नीट उद्घाटन करण्यात आले नाही आणि संमेलनाचे अध्यक्ष देशमुख आणि राज्यपाल पाटील यांनी फक्त दोन ते तीन स्टॉलनाट भेटी दिल्या आणि ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्याचे सांगण्यात आले. आयोजन समितीतल्या काही लोकांच्या बेजबादार वागण्यामुळे, सतच पाणी, स्वच्छतागृहे अशा मूलभूत सुविधा न देता थेट पुस्तके जप्त करण्याची धमकी देण्याचा प्रकार झाल्याने प्रकाशक संतप्त झाले आणि सुमारे 2 तास आंदोलन झाले. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या यशस्वी शिष्ठाईने या आंदोलनावर तोडगा निघाला आणि समारोपाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.

समारोप

लोकं समारोपाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवणार हे लक्षात येताच आ.जकांनी समारोपाचा मुख्य कार्यक्रम बंद सभागहात करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा लांबलेल्या भाषणांमुळे समारोप कंटाळवाणा झाला. समारोपाच्या भाषणात समंलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुन्हा एकदा आपल्या आधीच्या भाषणातील मुद्यांची उजळणी केली. समारोपाच्या कार्यक्रमात शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात केलेल्या आत्महत्येसंदर्भात राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

साध्य काय झालं?

माजी आयएएस अधिकारी आणि कोणालाही माहीत नसलेले लेखक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. त्यातच उद्घाटनपर भाषणात, राजा तू चुकत आहेस असं विधान देशमुख यांनी केलं आणि त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याच्या चर्चा रंगल्या. पण ही भूमिका खरच आक्रमक आहे का बोलाची कढी ठरणार हे पुढच्या काही दिवसात कळेलच. साहित्य संमेलनात साहित्यिक, कवी, लेखक घेत असलेल्या भूमिका या फक्त बोलण्यापुरत्याच असतात का? अशा भूमिका घेण्याची साहित्यिकांची ही काही पहिलीच वेळ नाही, मग हे साहित्यिक फक्त बोलून का घालवतात? समाज, सरकार आणि व्यवस्थेतील कमतेतरवर फक्त बोलायचं एवढंच साहित्यिकांचं काम आहे का? सरकारकडून संमेलनासाठी मदत घ्यायची आणि सरकारवर टीका करायची हे योग्य आहे का?

संमेलनाध्यक्ष देशमुख यांनी संमेलनातल्या भाषणात आणि त्यापूर्वी निवडणुका जिंकायला पैसे लागतोच असं विधानही त्यांनी केलं होतं,त्यामागचं नेमकं कारण काय? काही चांगल्या कविता आणि एखादं रंगलेलं चर्चासत्र वगळता रसिकांच्या हाती काय लागलं? साधारण दीड कोटी रुपये खर्च करून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संमेलनात काय झालं? गेल्या काही वर्षांपासून साहित्यिक बोलत आहेत, अभिव्यक्ति स्वातंत्र्यांची गळचेपी होत आहे, पण साहित्य संमेलनापासून सगळीकडे हे करत असतांना कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याचं ऐकीवात नाही. असो. बडोद्याचं 91 वं साहित्य संमेलन म्हणजे ठिकाणातला बदल, बाकी बरीचशी चर्चा तीच अशीच स्थिती आहे. ​

First published: February 22, 2018, 11:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading