ब्लाॅग : तुमच्या माझ्या बापाचं सामूहिक हत्याकांड !

"राजरोसपणे इथला शेतकरी मारणाऱ्या नफेखोर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कत्तलखाने तुमच्या आमच्या नाकावर टिच्चून हत्याकांडं घडवत राहतील. त्यात फार बोंबलायचीही सोय राहिली नाही. लगेच ऐकवलं जाईल."

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2017 07:10 PM IST

ब्लाॅग : तुमच्या माझ्या बापाचं सामूहिक हत्याकांड !

-विलास बडे, प्रतिनिधी, आयबीएन लोकमत

कीटकनाशकांची बाधा होऊन मेलेले शेतकरी हा अपघात नाही. बाबांनो, हे तर इथल्या व्यवस्थेनं तुमच्या माझ्या बापाचं घडवून आणलेलं सामूहिक हत्याकांड आहे. पिकांना जगवण्यासाठी पोशिंद्यानं फवारणी केली आणि तोच किड्यामुंग्यासारखा तडफडून मेला. तो मृत्यू नाही तर इथल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चार पैशाच्या नफ्यासाठी विष देऊन केलेली ती हत्या आहे.

ज्या कीटकनाशकांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बळी घेतला त्या मोनोक्रोटोफॉस, ऑक्सिडेमेटॉन मिथाईलला जागतिक आरोग्य संघटनेनं अत्यंत धोकादायक म्हटलंय. मोनोक्रोटोफॉसवर 60 देशांनी बंदी घातलीय. पण आमच्या देशात त्याची राजरोसपणे विक्री सुरूच आहे. जगानं नाकारलेलं विष आमच्या माथी मारलं जातंय. भारतभूमी या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी विष खपवण्यासाठीचं डम्पिंग ग्राऊंड बनलीय. त्यातून या कंपन्या हजारो कोटींचा नफा कमवताहेत. कीटकनाशकांची बाधा होऊन दरवर्षी हजारो शेतकरी मरतात. पण त्या मरणाची ना दाद ना फिर्याद. यांचं मरण हे मरण असतंच कुठे? ते उघडकीस येतच नाही. कुणी बोंबललाच तर तोंडावर लाख... दोन लाख... फारतर चार लाख फेकले जातात. कारण शेतकऱ्यांच्या मरणाची इथं एवढीच किंमत आहे.

शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दलचा सरकारी अहवाल आला त्यात शेतकऱ्यांनाच जबाबदार धरण्यातं आलं. कीटकनाशकं फवारताना काळजी न घेतल्याचा त्यांच्यावरच ठपका ठेवण्यात आला. सुरक्षा किट, गॉगल आणि हातमोजे वापरले नसल्याचं यात म्हटलं गेलं. यात काही अंशी तथ्यंही आहे. पण ज्यांनी धोकादायक विषारी रसायनं शेतकऱ्यांच्या माथी मारली, ज्यांनी शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती दिली नाही, त्यांचं काय? ही जबाबदारी कृषीखात्याची नव्हती का? पण कृषीखातं मेलेल्यांचे आकडे गोळा करण्यातच दंग होतं. जबाबदारी शेतकऱ्यांवर टाकली की मग सगळेच मोकळे झाले. इतकी माणसं मेल्यावरही सरकारला जाग येत नाही. सरकारने किती कंपन्यांवर गुन्हे दाखल केले?

खरंतर जगात बंदी घातलेलं विष खपवून आपल्या माणसांचे जीव घेणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवर बंदी घालणं हे सरकारचं काम आहे. इथल्या व्यवस्थेनं शेतकऱ्यांच्या मारेकऱ्यांच्या नरडीला नख लावायला हवं, पण त्यांच्यात ती धमक नाही. उलट बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला बांधले गेलेले नेते, राजकीय पक्ष कीटकनाशक व्यवस्थापन कायदा अस्तित्वात येऊ देत नाहीत.

Loading...

त्यामुळे या हत्याकांडात तेही तितकेच सहभागी आहेत. नरडीला नख लावणं खूप दूरच राहिलं, भोपाळ दुर्घटनेतील चार हजार निष्पाप लोकांच्या मृत्यूला जबाबदार असलेला आरोपी आणि युनियन कार्बाईडचा प्रमुख वॉरेन अँडरसनला भारतातून कोणी सहिसलामत पळवून लावलं? आपल्याच देशातल्या गद्दारांनी. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तळवे चाटणाऱ्या नेत्यांनी. हा इतिहास आणि वर्तमान आहे.

अशा परिस्थितीत कुठल्यातरी थुकरट चार-दोन लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून किंवा मदतीचे चार-दोन लाख फेकून मरणाचे सोहळे संपवले जातील. पण राजरोसपणे इथला शेतकरी मारणाऱ्या नफेखोर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कत्तलखाने तुमच्या आमच्या नाकावर टिच्चून हत्याकांडं घडवत राहतील. त्यात फार बोंबलायचीही सोय राहिली नाही. लगेच ऐकवलं जाईल. दोन-दोन लाखांची नुकसानभरपाई दिली तरी रडतात 'साले'.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2017 07:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...