तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार?

तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार?

सिरियामधल्या रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिका आणि रशिया मधला तणाव प्रचंड वाढलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियात रशियाला थेट युद्धाची धमकीच दिलीय. सिरियावरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष झालाच तर ती तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी तर असणार नाही ना? अशी भीती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होतेय.

  • Share this:

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक

सिरियामधल्या रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिका आणि रशिया मधला तणाव प्रचंड वाढलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियात रशियाला थेट युद्धाची धमकीच दिलीय. यापुढे सिरियात रशियाने मिसाईल डागले तर अमेरिकेचेही मिसाईल्स तयारच आहेत अशी धमकीच त्यांनी रशियाला दिलीय. सिरियावरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष झालाच तर ती तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी तर असणार नाही ना? अशी भीती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होतेय.

सिरियामधील संघर्ष आता आठव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. बशर अल असाद विरुद्धचा छोटा उठाव यादवी युद्धात रुपांतर झाला. या यादवी युद्धाने इस्लामिक स्टेटसारख्या संघटनेच्या प्रसारासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली. 2011 पासून सुरू झालेला हा संघर्ष आजही सुटण्याच्या स्थितीमध्ये दिसत नसून उलटपक्षी तो अधिकाधिक चिघळत जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

* गेल्या सात दिवसांमध्ये सिरियामध्ये दुसर्‍यांदा रासायनिक हल्ला झाला आहे. या हल्ल्यांमध्ये सुमारे 40 हून अधिक जणांचा बळी गेला आहे.

* गतवर्षी एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्काळ त्याचे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेकडून त्यावेळी जवळपास 59 टॉमहॉक मिसाईल्स सिरियावर डागण्यात आली होती. आता तशाच स्वरुपाची कारवाई अमेरिकेकडून केली जाण्याची दाट शक्यता आहे.

* ट्रम्प यांनी ट्विट करून अमेरिका सिरियातून 2000 सैनिक काढून घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काही तासांतच हा रासायनिक हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यातून अमेरिकेचा सिरियामधील लष्करी हस्तक्षेप वाढणार आहे. त्यातून हा संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.

* रासायनिक हल्ले हे अत्यंत संहारक असतात. यातून अत्यंत विषारी वायू हवेत पसरतात. ही अस्रे क्षेपणास्रांच्या साहाय्यानेच डागली जातात. यामध्ये प्रामुख्याने क्लोरिन सायनाईट, सिरेन, मस्टॅर्ड गॅस, टीअर गॅस यांसारख्या शस्रास्रांचा वापर केला जातो. वास्तविक, अशा प्रकारची रासायनिक अस्रे दुसर्‍या महायुद्धाच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती. त्यानंतर या अस्रांचा वापर आत्ताच होतो आहे.

* एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिरियाकडे ही रासायनिक शस्रास्रे नाहीत. त्यामुळे त्यांनी ही संहारक अस्रे कोठून तरी आयात केली असण्याची शक्यता आहे. यामध्ये रशियाचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सिरियातील बशर अल असाद सरकारला रशियाचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिका आणि रशिया आमने सामने उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या ब्रिटनमध्ये गुप्तहेरावर झालेल्या विषप्रयोगाच्या प्रकरणामुळे अमेरिका आणि रशियामधील तणाव हा आधीच विकोपाला गेला आहे. तशातच हा रासायनिक हल्ला झाला आहे. अमेरिका आणि रशियाची सध्याची आक्रमक धोरणे पाहता या हल्ल्याच्या निमित्ताने युद्धाची ठिणगी पडते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास चीनसारखा देश रशियाच्या बाजूने जाऊ शकतो. कारण सध्या सुरू असलेल्या व्यापारी युद्धामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील कडवटपणा वाढत चालला आहे. अशा स्थितीत चीन रशियाच्या बाजूने उभा राहिल्यास कदाचित तिसर्‍या महायुद्धाची ठिगणीही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघटनेसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने तात्काळ पुढाकार घेऊन यामध्ये मध्यस्थी करून शांततेच्या मार्गाने तोडगा काढणे आवश्यक आहे.

भारतावर काय परिणाम?

या संपूर्ण संघर्षमय, अशांततेच्या वातावरणामुळे संपूर्ण आखातामध्ये अस्थिरतेचे वातावरण तयार झाले आहे. या परिस्थितीकडे भारताने सावध होऊन लक्ष ठेवून राहणे गरजेचे आहे. कारण आखातात अशांतता निर्माण झाल्यास कच्च्या तेलाचे भाव वधारतात. परिणामी देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढून महागाई वाढण्याची शक्यता बळावते. तसेच आखातात काम करणार्‍या 60 लाख भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीकडे भारताने अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून राहणे आवश्यक आहे.

 

 

First published: April 12, 2018, 3:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading