पतंगराव, वुई विल मिस यू...

पतंगराव, वुई विल मिस यू...

पतंगराव हे काही तसे स्वच्छ साधे,निरलस प्रतिमेचे नेते नव्हतेच उलट रगेल,बेरकी, मुरब्बी,राजकीय डाव पेच लढवणारे, मुख्यमंत्री व्हायची जबरी महत्वकांक्षा मात्र कायम वेटिंग सीएम मोड वर अशीच त्यांची ओळख होती..

  • Share this:

ए मेहता, लका हिकडं बघ की केवढं वजन उतरवलंय मी...

कसली ब्रेकिंग न्यूज देतोय..

लगा त्या राणा जगजीतला तुम्ही लै हुलगाडला...

अरे ती आमोंडिकर बाई लई छान होती,रेडिओ वर माझ्या फर्माईशची गाणी आवर्जून लावायची...

ए देवरा, अरे काय बिस्किट चहा कॉफी आहे का नाही दे लवकर मला पण ,पत्रकारांना पण...

असे एक ना दोन प्रसंग

पतंगराव कदम यांच्या आठवणींनी आज गर्दी केलीय. प्रमाणाबाहेर मोकळेपणा फटकळपणा कडे झुकणारा स्पष्ट वक्तेपणा दिलदार,दिलखुलास,बेरकी,मुरब्बी,इरसाल,रगेल,रांगडा नेता म्हणजे पतंगराव कदम...

कदम यांना प्रत्यक्ष भेटण्याआधी मनात एक प्रतिमा होती. शिक्षण सम्राट,सहकार सम्राट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात अनेक वजनदार राजकीय पुढारी आहेत त्यापैकी एक.. भारती विद्यापीठ नावाचं साम्राज्य म्हणजे भरपूर डोनेशन घेत असणार  ,सरकारी जागा फुकटात घेतल्या असणारहे हे डोक्यात पक्क होतं...केलं असेलही त्यांनी..

पतंगराव हे काही तसे स्वच्छ साधे,निरलस प्रतिमेचे नेते नव्हतेच उलट रगेल,बेरकी, मुरब्बी,राजकीय डाव पेच लढवणारे, मुख्यमंत्री व्हायची जबरी महत्वकांक्षा मात्र कायम वेटिंग सीएम मोड वर अशीच त्यांची ओळख होती..

भारती विद्यापीठाकडे जाणारा रस्ता ज्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला तो आसपासच्या लोकांच्या वहिवाटी करता होता तो बंद केला होता. कात्रज दूध डेरी च्या जमिनीच्या तुकड्या वरून अजित दादांशी जुंपली होती..या घटनांमुळे मनातली प्रतिमा घट्ट होत होती.

नंतर भेटत गेलो, कार्यक्रमाच्या निमित्ताने,पत्रकार परिषदा कव्हर करण्याच्या निमित्ताने आणि पतंगराव कदम यांच्या व्यक्तित्वातले इतर पैलू उलगडत गेले..

अफाट लोकसंग्रह- गावकडच्या  लोकांना विशेषतः विद्यार्थ्यांना अॅडमिशन,नोकरी,फी माफी करता केलेली मदत, भारती हॉस्पिटल मध्ये उपचार असतील, आपल्या मतदार संघातील,संस्थेच्या पसाऱ्यातील लोकांना सढळ हाताने मदत करणं आज सिंहगड बंगल्याबाहेर असो किंवा भारती विद्यापीठात उसळलेला जनसागर असो, लोकांशी जोडलं जाणे म्हणजे काय याची प्रचिती येते.

ग्रामीण बाज, बोली भाषा वापरणारा,मिश्किल माणूस त्यामुळं भाषणं बोअर व्हायची नाहीत उलट मरगळ,रटाळ कार्यक्रमात जान यायची पतंगराव यांचं भाषण ऐकलं की पत्रकार परिषदेत पण धमाल उडवून देणार. त्यांना आम्ही स्टिंग ऑपरेशन करायची गरज नसलेला नेता म्हणत असू इतका मोकळे ढाकळेपणा होता..

राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांची मांदियाळी असायची दिग्गज मंडळींना डी लीट देणं असो,पदवीप्रदान किंवा अभिजित कदम फूटबॉल स्पर्धा,सामाजिक पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रातील stallwart लोकांना आणायचा जणू त्याना छंद होता.

आणि त्यात मुख्यमंत्री कुणीही असो कुठला पक्ष महत्वाचा नाही पण तो आला पाहिजे असा बहुदा अलिखित नियम(सीएम व्हायची मनात दडलेली सुप्त इच्छा कारणीभूत असावी)

एक भन्नाट किस्सा-

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना अभिजित कदम फुटबॉल स्पर्धा अंतिम सामना,पारितोषिक वितरण कार्यक्रम फायनल मॅच सुरू झाली....पतंगराव यांना त्यात रस नव्हता...मुख्यमंत्री निघाले का हेलिकॉप्टर उडाले का याची विचारपूस ते करत होते. मॅच संपता संपता सीएम येतील मग बक्षीस वितरण,भाषणे असं नियोजन होतं. पण मॅचचा दुसरा हाल्फ संपत आला पण मुख्यमंत्र्यांचा काही पत्ता नव्हता. विश्वजित कदम म्हणाले मॅच संपेल, कार्यक्रम सुरू केला नाही तर गर्दी हटेल कधी येणार मुख्यमंत्री ?

यावर पतंगराव म्हणाले, मॅच सुरू ठेवा, 3rd हाल्फ, 4th हाल्फ खेळवा..मुख्यमंत्री येईपर्यंत थांबवू नका..

अहो असं नाही करता येत..-विश्वजित..

तेवढ्यात मुख्यमंत्र्यांचं हेलिकाॅप्टर लँड होत आहेत असा निरोप आला आणि सगळ्यांनी सुस्कारा सोडला आम्ही हसून लोळायचे राहिले होतो..असे अनेक किस्से आहेत...

पतंगराव अजब रसायन होतं, कर्मवीर भाऊराव,यशवंतराव मोहिते,वसंत दादा यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. प्रचंड आत्मविश्वास,उत्साह,अफाट ऊर्जा होती. हयात असतानाच त्यांनी स्वतः चं स्मारक वाटेल असं म्युजियम उभारलं.त्यात त्यांचा संघर्ष आणि यशोगाथा मांडलीय.

एका खोलीपासून सुरू झालेला भारती विद्यापीठाचा प्रवास शेती,सहकार, शिक्षण क्षेत्रातील प्रयोग,प्रकल्प,राजकीय कारकीर्द,दुर्मिळ फोटो, पहिली अॅम्बेसेडोर कार असं सगळं सविस्तर आकर्षक पणे मांडलंय.

पतंगराव यांचे चाहते असा वा विरोधक हे वेगळं म्युजियम नक्की बघा म्हणजे एक माणूस किती मोठं संस्थात्मक काम उभं करू शकतो याचा अंदाज येईल.

पतंगराव यांचं व्यक्तिमत्व विरोधाभासी जरूर होतं अनेकांना त्याची प्रतिमा,त्यांनी उभारलेले साम्राज्य,लोकसंग्रह,लोकप्रियता याचा मेळ घालता येत नाही. कोणताही निष्कर्ष न काढता,शिक्का न मारता एवढंच म्हणेन एक उमदा,दिलदार, दिलखुलास नेता पाहिला ज्याचं सगळं वर्तन पटलं नाही पण खोडकरपणा, मिश्किलपणा लोकांशी जोडलं जाणे भावलं आता कोणत्या कार्यक्रमाला गेलो तर व्यासपीठावरून हसून हात हलवून आवाज देऊन हाक मारणारा...

आस्थेनं विचारणारा ए मेहता लका कुठं लक्ष आहे तुझं....

तू लै डांबरट आहेस लेका, तू हुशार आहेस पण तुला पिक अप मिळाला नाही बघ  असं मांडीवर बुक्की मारून म्हणणारा आवाज आता ऐकू येणार नाही....

पतंगराव आम्ही तुम्हाला, नक्की मिस करू..

- अद्वैत मेहता, प्रतिनिधी, पुणे

First published: March 10, 2018, 8:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading