News18 Lokmat

'डोकलामची रणभूमी'

. चीनी ड्रॅगन भारताला धमकावण्याची एकही संधी सोडत नाहीये. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी आणि त्यांची सरकारी प्रसारमाध्यमं युद्धंज्वराने पछाडले आहेत का असाच प्रश्नं पडतोय. अवाढव्यं चीनला डोकलामचा १५ किलोमीटरचा टापू एवढा का महत्वाचं वाटतोय...?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2017 01:58 AM IST

'डोकलामची रणभूमी'

उदय जाधव, प्रतिनिधी, मुंबई

माजी एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात चीनला दिलेलं बाणेदार उत्तर आजही आठवतंय. 'चीनला भारतीय वायूदल फक्तं २० मिनिटात धडा शिकवेल.' त्यांच्या या आक्रमक वक्तव्यांची दखल त्यावेळी चीन सरकार, लष्कर आणि तिथली सरकारी प्रसारमाध्यमं यांनी देखील गांभिर्याने घेतली होती. त्यामुळे त्यावेळी आरोप-प्रत्यारोपही झाले होते. आज तो वाद आठवण्याचं कारण म्हणजे डोकलाम वरून सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती.

सरकारने कितीही नाही म्हटलं तरी, डोकलाममध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय.. चीनी ड्रॅगन भारताला धमकावण्याची एकही संधी सोडत नाहीये. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी आणि त्यांची सरकारी प्रसारमाध्यमं युद्धंज्वराने पछाडले आहेत का असाच प्रश्नं पडतोय. अवाढव्यं चीनला डोकलामचा १५ किलोमीटरचा टापू एवढा का महत्वाचं वाटतोय...? त्यांची उत्तरं सामरिक आणि राजकीय देखील आहेत.

भारत-चीन-भूतान या तीन देशांच्या सीमा एकत्र जिथे मिळतात त्या ट्राय जंक्शन वरच नेमकं हे डोकलाम गाव आहे. गाव तसं नावा पुरतंच आहे. गावात मनुष्यवस्ती तशी नाहीच. पण तिथूनच ९ किलोमीटर असलेल्या नथांग गावात बऱ्यापैकी मनुष्यवस्ती आहे. हेच सध्या लष्कराने निर्मनुष्य केल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण लष्काराने त्यात तथ्य नसल्याचं सांगितलंय. तर हे डोकलाम आहे निसर्गाच्या कुशीत...

एखादा टुरिस्ट स्पाॅट असावां असं हे गाव. पण तीन देशाच्या धगधगत्या सीमेवर असल्यामुळे जवळपास निर्मनुष्यच. फक्तं लष्करी गणवेशातील माणसंच काय ती दिसतात. अशा जमिनीवर चीन का हक्कं सांगू लागलांय...? आणि ते मिळवण्यासाठी का म्हणून एवढां आटापिटा चालवलांय...? यांचं कारण डोकलाम प्लॅटू मध्ये आहे. हा डोकलामचा प्लॅटू म्हणजे इथल्या पर्वतीय प्रदेशांतील एक छोटंसं पठार आहे. आणि याच पठारावर चीनचा डोळा आहे. कशा करता तर चीनी लष्कराला त्यांच्या ताब्यातील चुंबी व्हॅली मधून थेट या पठारावर थेट रणगाडे आणता येतील, आणि मिसाईल बेस देखील बनवतां येईल. कारण एव्हढंच नाही आहे तर याच पठारावरून चीनी मिसाईल सरळ भारताच्या २० किमी अंतरावर असलेल्या, सीलीगुरी नॅशनल हायवेला टारगेट करू शकणार आहेत. हा सीलीगुरी नॅशनल हायवे म्हणजे भारताची मुख्य भूमी आणि पूर्वेकडील ७ राज्यांना जोडणारा महामार्ग. या राष्ट्रीय महामार्गाला सामरिक भाषेत 'चिकन नेक' म्हटलं जातं. एकदा का ही मान कापली तर पूर्वेकडील ७ ही राज्य भारतापासून वेगळी होतील. आणि ही तुटलेली राज्यं विस्तारवादी चीनला गिळंकृत करण्यास वेळ लागणार नाही. खरं तर हा चीनच्या माओंचाच मास्टर प्लान आहे. सध्या त्याने डोकलाममध्ये डोकं वर काढलंय एव्हढंच. माओंनी ५० आणि ६० च्या दशकात थेअरी मांडली होती. ती म्हणजे तीबेट हा हाताचा पंजा आहे. तर लदाख, नेपाळ, सिक्कीम, भूतान आणि अरुणाचल प्रदेश ही त्याची पाच बोटं आहेत. माओंनी हाताचा पंजा म्हणजे तिबेट तेंव्हाच बळजबरीने ताब्यात घेतलांय. आता त्यांचं उरलेलं स्वप्नं चीन पुर्ण करण्यासाठी धडपडतोय. त्यासाठीच डोकलामचं आता रणभूमीत रुपांतर झालंय.

Loading...

डोकलामचं रणभूमीत रुपांतर झाल्यावर, चीनने आक्रमक भाष वापरायला सुरुवात केलीय. हा त्यांचा स्ट्रॅटेजिक प्लानचाच एक भाग आहे. शत्रू राष्ट्राच्या विरोधात तो कसा चुकीचा आहे, या संदर्भात बोंबाबोंब करायची. त्यासाठी त्यांची सरकारी प्रसारमाध्यमं तयार असतात. हेच सध्या बिजिंगवरून निघणारं ग्लोबल टाईम्स करतंय. क्रिकेटमध्ये जसा स्लेजिंग प्रकार आहे. ( विरुद्ध संघाचं मानसिक नामोहरण करण्यासाठी केली जाणारी बाश्कळ शेरेबाजी ) तसाच काहीसा हा प्रकार आहे. भारत चीनची ही रणनिती चांगलीच ओळखून आहे. त्यामुळेच कोणतीही जास्त प्रतिक्रिया न देता भारताने राजकीय मुसद्दीगिरीला प्राधान्य दिलंय. आणि त्याचा परिणाम ही दिसून आलाय. चीनच्या शेजारी असलेल्या देशांपैकी फक्त उत्तर कोरिया सोडला तर एक ही देश चीनसोबत नाही आहे. रशिया, जपान, तैवान, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम ही सर्व चीनच्या शेजारील राष्ट्र भारतासोबत आहेत. चीनचं आंतरराष्ट्रीय राजकारणात देखील पाकिस्तान सोडला तर कुणी भरवशाचा मित्र देश नाही आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिका भारताच्या मागे चीन विरोधात भक्कम उभा आहे. या सर्व मित्र देशांची मोट भारताने आपल्या परराष्ट्र धोरणातच बांधली आहे. या परराष्ट्र धोरणातच आर्थिक धोरण देखील तितकेच मजबूत आहेत. त्यामुळे ऐनवेळी मित्र देशांपैकी कुणी दगा फटका करण्याचा विचारच करू शकणार नाही आशी व्यवस्था भारताने करून ठेवली आहे. दुसरीकडे चीनचं देखील भारतासह सर्वच देशाचं आर्थिक धोरण सुरू आहे.

 

पण चीनच्या अतिमहत्वकांक्षी धोरणामुळे शेजारी देश प्रचंड दुखावले गेलेले आहेत. जपान-चीन चा समुद्र सीमा आणि बेटांचा जूना वाद अजूनही चिघळलेलाच आहे. एक लहान बेट असलेला तैवान देश चीनला गेले काही वर्षे उघड आव्हान देतोय. प्रगत दक्षिण कोरीया अमेरिकेच्या पाठिंब्यावर चीनला नडतोय. तर व्हीएतनाम आणि चीनच्या समुद्र सीमा आणि बेटांच्या वादावर आंतरराष्ट्रीय कोर्टाने व्हिएतनामच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर संतप्तं झालेल्या खवळलेल्या चीनने खूप आदळआपट केली. पण त्याचा काहीच परीणाम व्हिएतनामवर झाला नाही. रशीयाशी आपले घनिष्टं राजकिय आणि आर्थिक संबंध आहेत. त्यामुळे मंगोलिया देखील शांत रहाणंच पसंत करेल अशी परीस्थीती आहे. उरला चीनचा फार मोठा सीमा शेजारी नसलेला पाकिस्तान जो चीनच्या माध्यमातून भारताला जेव्हढा देता येईल तेव्हाढां त्रास देणार. डोकलाम संदर्भात ही चीनला नसेल तेव्हढी घाई पाकिस्तानला आहे. कारण डोकलामच्या रणभूमीवर तापलेलं वातावरण त्यामुळे भारतीय लष्काराची ताकत पूर्व सीमेवर कसं वस्तं राहील. आणि मग पच्छिम सीमेवर पाकिस्तानला हवं ता करण्यासाठी रान मोकळं मिळेल. अशी अपैक्षा कावेबाज पाकिस्तान करून आहे. पण या सर्व शक्यशक्यातांची भारतानेही चांगली तयारी करून ठेवली आहे. पूर्व सीमेवर संघर्ष झालाच, तर पच्छिम सीमेवर देखील तयारी करावीच लागणार. याआधी १९७२ च्या युद्धात पूर्व-आणि पच्छिम सीमेवर भारताने अशी यशश्वी कामगिरी करून दाखवलीय. त्यावेळी क्षत्रू पिकीस्तान होता, पण चीनचा धोका ओळखून, भारताने तीथेही सज्जता ठेवली होती.

चीनच्या अतिमहत्वकांशी कुरापत्या या नवीन नाहीत. त्यामुळे पुढे मागे असा संघर्ष होऊ शकतो. हे ओळखूनच भारताने दूरदृष्टीने दरवर्षी लष्कराच्या मालाबार युद्ध सराव कसरती आयोजित केल्या. या आंतरराष्ट्रीय युद्ध सराव कसरतीमध्ये भारत, जपान आणि अमेरिकेचा सहभाग मोठा होता. तीनही देशांनी लष्कारातील सर्वोच्च यंत्रणा या युद्ध सराव कसरतीमध्ये सहभागी केल्या होत्या. या वर्षी तर भारताने निकोबार आय लँड आणि मलेशिया- सिंगांपूरच्या आंतरराष्ट्रीय समुद्रमार्ग काॅरीडाॅरच्या तोंडावरच हा युद्धसराव आयोजीत केला होता. त्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला होता. कारण हा समुद्रातील ट्रेड काॅरीडाॅर चीनसाठी सर्वात महत्वाचा आहे. याच काॅरीडाॅर मधून चीनची सर्वाधीक आंतरराष्ट्रीय जलवाहतूक होते. त्यामुळे चीनच्या नाकाला मिरच्यां झोंबल्या. अशा प्रकारे भारताने चीनची सामरिक नाकेबंदी कशी होऊ शकते, हेच दाखवून दिलंय.

आणखी एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, चीन ज्या पिपल्स लिबरेशन आर्मीची ताकत जगाला आणि भारताला दाखवतोय. त्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे कच्चे दुवे भारतीय लष्कराला चांगलेच ठाऊक आहेत. त्यापैकीच काही गोष्टी सांगतो, एक म्हणजे चीन आणि पाकिस्तानही लष्कारात क्वालिटी ऐवजी क्वांन्टेटी ला महत्वं देतं. भारत याचा अगदी उलट म्हणजे क्वांन्टेटी ऐवजी क्वालिटीला महत्त्व देतं. त्याचा सर्वात मोठा परिणाम लष्कराच्या मारक आणि भेदक क्षमतेवर होतो. भारतीय लष्कराचं हेच धोरण आहे. लष्कारात किती अधिक संख्येने जवान आहेत, यापेक्षा किती अचूक परिणाम कारक आणि गेम ओव्हर करणारे निर्णायक जवान आहेत. या क्वालिटीवर भारतीय लष्कर भर देतं. या उलट चीनने पिपल्स लिबरेशन आर्मीत २१ लाखाहून अधिक जवान भरती केलेत. जगातील सर्वाधिक जवान असलेले हे दल आहे. पण ऐवढा मोठ्या मनुष्य बळाचा, प्रत्यक्ष निर्णायक युद्धात काहीच उपयोग होत नसल्याचा साक्षात्कार, देखील नुकताच चीनला झालाय. त्यामुळे त्यांनी चक्क १० लाख सैन्य कपातीचा निर्णय घेतला. त्यावरून चीनचं धोरण कसं चुकलंय हे जगाने याच वर्षी पाहिलंय. आणखी एक महत्वाचं सैन्यात खोगिर भरती करण्याच्या नादात निकाल देऊ न शकणारे जवान चीनने भरती केलेत. त्याचं उदाहरण म्हणजे ज्या हिमालय पर्वतीय रांगांत भारत-चीन सीमा आहे. त्या भौगोलिक परीस्थितीत जिथे भारताचे ITBT म्हणजे इंडो-तिबेट बटालियनचे जवान तैनात आहेत. तिथे चीनचे त्यांच्या देशातील पुर्वेकडील प्रांतात राहणारे जवान तैनात केलेत. कौशल्याचे बोलायचे म्हणजे या चीनच्या पूर्वेकडील भागातून आलेल्या जवानांना पर्वतिय प्रदेशात राहण्याचा आणि तिथे लढण्याचा काहीच अनुभव नाहीये.

या उलट भारताने ITBT चे जवान हे हिमालयातील पहाडी भागात राहणारे कुमांऊ आणि गोरखा जवान तैनात केलेत. हे जवान याच हिमालयीन भौगोलिक परीस्थीतीत लहानाचे मोठे झालेत. त्यांना इथल्या परिस्थितीची चांगली जाण तर आहेच, शिवाय काटक आणि लढाऊ बाणा त्यांच्या अंगात भिणलेला आहे. त्यामुळे भारताची सीमा सुरक्षित असल्याची आपण छाती ठोकपणे जगाला सांगू शकतो. त्यामुळेच सध्याचा भारत हा १९६२ चा भारत नसल्याचं आपल्या संरक्षण मंत्र्यांनी चीनला ठणकावलंय. त्याच्या मागे ही सर्व सामरिक आणि राजकीय ताकद भारताकडे आहे. त्यामुळेच सर्व भारतीय निश्चितपणे स्वातंत्रदिन साजरा करून, तिरंग्याला अभिमानाने सलाम करू शकतो.

जय हिंद...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2017 11:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...