दिवाळीला फटाके का फोडतो ?

दिवाळी-दिव्यांची आवली-दिव्यांची रांग! हा सण साजरा करणं नक्की कधी सुरू झालं याची ठोस माहिती कुणालाच नाही. प्राचीन भारतातही हा सण साजरा केला जात असावा असे काही उल्लेख आढळतातही. बरं या सणाशी निगडीत राज्याराज्यातील कथाही वेगळ्या आहेत. आंध्र प्रदेशात नरसिंहाची पूजा करून दिवाळीचा सण साजरा होतो. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात कृष्णाने नरकासुराचा वध केला ही कथा दिवाळी सणाची कथा होते.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 18, 2017 06:13 PM IST

दिवाळीला फटाके का फोडतो ?

चित्ततोष खांडेकर,प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी दिल्लीत फटाके विक्रीवर बंदीचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. या आदेशावरून सोशल मीडियावर भरपूर 'फटाके' वाजले. चेतन भगतसारख्या प्रथितयश लेखकांपासून अनेक मोठ्या हस्तींनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दिवाळीत फटाके फोडूच नयेत का?, एका दिवशी फटाके फोडून असा काय फरक पडणार आहे?, सारी बंधनं हिंदुंच्या सणांनाच का? असं अनेकांनी विचारलं. मला मात्र इथे काही वेगळेच प्रश्न पडले आहेत. आपण दिवाळी नक्की का साजरी करतो? फटाके का फोडतो?, आपल्या कुठल्या धर्मग्रंथात फटाके फोडूनच दिवाळी साजरी करावी असं म्हटलं आहे?

दिवाळी-दिव्यांची आवली-दिव्यांची रांग! हा सण साजरा करणं नक्की कधी सुरू झालं याची ठोस माहिती कुणालाच नाही. प्राचीन भारतातही हा सण साजरा केला जात असावा असे काही उल्लेख आढळतातही. बरं या सणाशी निगडीत राज्याराज्यातील कथाही वेगळ्या आहेत. आंध्र प्रदेशात नरसिंहाची पूजा करून दिवाळीचा सण साजरा होतो. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात कृष्णाने नरकासुराचा वध केला ही कथा दिवाळी सणाची कथा होते. तर उत्तर भारतात राम वनवासातून अयोध्येला परत आला म्हणून घरोघरी दिवे लावून रोषणाई करून रामाचं स्वागत केलं . राम घरी परत येण्याचा सण म्हणजेच दिवाळी ही उत्तर भारतातील लोककथा. याशिवाय दिवाळीच्या अनेक लोककथा-स्थानिक कथा देशभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याचं सगळ्यांची कारणं वेगळी. दिवाळी साजरी करण्याची पद्धत ही राज्याराज्यात बदलते. महाराष्ट्रातला फराळ आणि उत्तर प्रदेशातील प्रसाद सारखा नसतो. तर दक्षिण भारतातील पायास्सम महाराष्ट्रात खाल्लं जातंच असं नाही.

पण इतकी विविधता जरी असली तरी सगळीकडे या सणाचा एक समान दुवा सापडतो. तो म्हणजे-'दिवा',दीप. प्रत्येक राज्यात प्रत्येक प्रदेशात घरोघरी दिवे लावून,पणती लावून हा सण आजही साजरा केला जातो. ज्योती-ज्योतीने सारा आसमंत उजळून निघतो. मग दिवाळीत 'दीपाचं' महत्त्व काय? जेव्हा या देशात इलेक्ट्रिसिटी नव्हती, लाईट-ट्यूबलाईट नव्हते तेव्हा रात्रीचा अंधार दुर करण्याचं काम हे दिवेच करत होते. वेदांमध्ये म्हटलं आहे 'तमसो मा ज्योतीर्गमय'-अंधाराकडून प्रकाशाकडे जावे. अंधाराकडून प्रकाशाकडे, तिमिरातून तेजाकडे जा हा दिवाळीचा खरा संदेश आहे.तात्पुरता का होईना हे दिवे घरातला अंधार दुर करतात. आजूबाजूला प्रकाश पसरवतात. अशा दिव्याच्या रांगांच्या रांगा लावून अमावस्येच्या रात्री सारा अंधारच नाहीसा व्हावा ही दिवाळीमागची खरी संकल्पना.

कृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हा त्याच्या ताब्यातल्या 16 सहस्त्र कैदी नारींच्या आयुष्यातला अंधार संपवला. समुद्रातून लक्ष्मी वर आली तेव्हा तिने दारिद्र्याचा अंधार संपवला. तिमीर म्हणजे वाईट प्रवृत्ती. जे जे काही वाईट आहे त्याचं प्रतीक म्हणजे अंधार. म्हणूनच ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर दुरितांचे तिमीर जावो असं म्हणतात. अर्थात दुर्जनांमधील वाईटपणा, जे जे काही वाईट आहे ते जावो. आपल्यातील वाईट गोष्टी संपाव्या हीच दिवाळीची खरी 'प्रार्थना'. म्हणून मग घर धुवून स्वच्छ पुसली जातात. नवे रंग दिले जातात. म्हणजे घरातील जी जी अस्वच्छता आहे ती पूर्णपणे नाहीशी केली जाते. अस्वच्छताही एक मोठा 'अंधार' आहे हे तर आज देशात सगळ्यांना चांगलंच पटतं आहे.

त्यात सगळ्यात मोठा अंधार असतो 'अज्ञानाचा'! संतासाठी दिवाळी ही अज्ञानाचा अंधार दुर करणारी दिवाळी आहे. "साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा" म्हणताना साधू संत घरी आले असता त्यांच्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. चार चांगल्या गोष्टी कानावर पडतात. अज्ञान दुर होते. हा खरा विचार आहे. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. पण खरा आनंद हा ज्ञान मिळाल्यानेच होतो ही आमच्या संतांची धारणा आहे.

आता दिवाळी का साजरी करतो या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू या. आपण दिवाळीत फटाके का फोडतो. तिमिरातून तेजाकडे जाणे हा दिवाळीचा उद्देश आहे. मग असा कुठला अंधार फटाके फोडल्याने दुर होतो. कानठळ्या बसवण्याइतकं ध्वनि प्रदुषणं करणारे फटाके. सारा आसमंत तेजोमय दिव्यांच्या प्रकाशाने उजळला असता फटाक्यांनी तो धुराने भरल्याने काय साध्य होतं. वायू आणि ध्वनि असं दुहेरी प्रदूषण या फटाक्यांमुळे होतं. सारासार बुद्धीने विचार केला तर फटाके फोडून असा कुठला स्वर्गीय आनंद आपल्याला मिळतो?, कुठल्याही संतांनी,गुरूंनी,धर्मग्रंथानी त्याला दुजोरा दिला नाही. दिवाळीचं उद्दिष्टही त्याने साध्य होत नाही. मग आपल्याला विवेकाला फटाके फोडणं पटतंच कसं? अविवेक संपवायचा सण म्हणजे दिवाळी असं ज्ञानोबाराय सांगतात.

ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत म्हणतात ,'मी अविवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी!तिच योगिया दिवाळी होई निरंतर||

प्रचंड प्रदूषण करणारे फटाके फोडणे हे सारासार बुद्धीला पटूच शकत नाही. दुसऱ्या धर्मांना काही करायचं स्वातंत्र्य आहे. त्यांच्यात काही चुकीच्या प्रथा आहेत. म्हणून आम्हालाही फटाके फोडायचं स्वातंत्र्य असायला हवं याला काही अर्थ नाही. कारण फटाक्यांना आपल्या धर्मात आधार नाही. त्यात फटाके फोडल्याने काही विधायक होत नाही. दिवाळीत महत्त्व आणि आग्रहही 'दिव्या'ला आहे. मग फटाके फोडावे हा आग्रहच का असावा?

त्यामुळे जे पैसे फटाक्यांवर खर्च होतात ते जर काही गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च केले तर काय वाईट? त्यांच्या अज्ञानाचा अंध:कार दुर होईल. जिथे जिथे तिमिर आहे दारिद्र्य,समाजातील समस्यांचा अंधार दुर करण्यासाठी पैश्यांचा वापर केला तर ते खरं लक्ष्मी पूजन. ती खरी दिवाळी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 06:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close