... आणि मी बिग बॉसच्या घरात

... आणि मी बिग बॉसच्या घरात

सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात फोनशिवाय राहणं वगैरे गोष्टी म्हणजे अकल्पित वाटतात. घराबाहेर पडायचं नाही, फोन नाही, जगाशी कुठलाच संपर्क नाही.नाही, तुम्ही कोणत्या तुरुंगात नाही तर घरातच असता.

  • Share this:

नीलिमा कुलकर्णी, प्रतिनिधी

सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात फोनशिवाय राहणं वगैरे गोष्टी म्हणजे अकल्पित वाटतात. घराबाहेर पडायचं नाही, फोन नाही, जगाशी कुठलाच संपर्क नाही.नाही, तुम्ही कोणत्या तुरुंगात नाही तर घरातच असता पण तुमच्यावर असतात काही बंधनं आणि तुमची प्रत्येक हालचाल, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, एवढंच काय सकाळी तुम्ही पलंगावरून उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत सगळं काही टिपणारे अनेक कॅमेरे.

तुम्ही बरोबर ओळखलंत, मी बोलतेय बिग बॉसच्या घराबद्दल. या घराविषयी अनेकांना कुतूहल आहे. बिग बॉस मराठीचं पहिलंवहिलं पर्वं सुरु होणार म्हटल्यावर अनेक चर्चांना ऊत आला. कलाकारांविषयी उत्सुकता होतीच. या घरात जाणं कुणी स्वीकारलं, कुणी नाकारलं, चर्चांना ऊत नुसता.

यातच आमच्या चॅनलमधील माझ्या सहकारी मैत्रिणीने चित्रालीने विचारलं, ‘तुला नाही का विचारलं?'  खरं सांगू तर मला हसू आलं.कारण काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळेना. काही सुचलं नाही. पण नंतर विचार केला खरंच आपण तयार आहोत का यासाठी?

मला The Truman Show हा जिम कॅरीचा सिनेमा आठवला. आपलं अख्खं आयुष्य टेलिव्हिजनवर दिसत असताना त्याची झालेली स्थिती आणि शेवटी त्याचं म्हणणं – In case, I don’t see you… Good Afternoon, Good evening and Good night’ अंगावर काटा आला.

हां, हे सगळे विचार सुरू असतानाच कलर्स मराठीच्या गायत्रीचा फोन खणखणला आणि बिग बॉसच्या घरात काही पत्रकारांना एक दिवस राहायचंय असं कळलं.आता विचार करायला फुरसत नव्हती.चला, हेही करून पाहू, असं म्हणत आमची स्वारी त्या सकाळी मुंबईहून लोणावळ्याला रवाना झाली.

वेगवेगळ्या चॅनलचे पाच पत्रकार आणि प्रिंट मीडियाचे आठ पत्रकार असे एकूण 13 पत्रकार 12 एप्रिलला बिग बॉसच्या घरात गेले. मराठी कलाकारांच्या आधी त्या बिग बॉसच्या घरात हे पत्रकार राहिले.

अवघा एक दिवस पण तो दिवस आमच्यासाठी खास होता. सकाळी 10 वाजता आम्हाला लोणावळ्याच्या त्या जागी बोलावण्यात आलं. तिथून आतमध्ये आमच्या डोळ्यांवर काळ्या पट्ट्य़ा बांधून आम्हाला बिग बॉसच्या घरी गाडीने नेण्यात आलं. जवळपास आपल्याला कुणीतरी किडनॅप केलंय असंच वाटून गेलं, हळूहळू या खेळाचं गांभीर्य वाढलं. जागेची गोपनीयता पाळली गेली आणि डोळ्यांवर काळी पट्टी बांधली तेव्हा खरा पोटात गोळा आला.

 डोळ्यांवरची पट्टी कुणीतरी उघडली आणि मी बिग बॉसच्या घरात गेले.माझ्या आधी ज्यांना घरात नेलं होतं त्या पत्रकारांनी माझं टाळ्या वाजवत छान स्वागत केलं. ओमंगकुमार यांनी डिझाईन केलेलं बिग बॉसचं घर फारच सुंदर आहे. पैठण्या, नथ,कोल्हापुरी चपला यांनी नटलेलं ते मराठमोळं घर जणू एखाद्या घरंदाज, खानदानी सुनेसारखं आमच्या स्वागताला आरतीचं ताट घेऊन तयार होतं असं वाटलं.आकर्षक सजावट डोळ्यांना सुखावणारी होती. क्या बात है, या घरात राहायचंय..मज्जा! असं सगळं वाटून गेलं.

घराने मन जिंकलं पण लगेच सावध झालो.आता जे काही बोलणार ते सगळं रेकॉर्ड होणार ही जाणीव पुन्हा पुन्हा अस्वस्थ करत होती. आम्ही ठरवलं की आता चहा करूया, स्वयंपाकघरात मी आणि चैताली जोशीने चहा केला. चहा, कॉफी आणि साखर आणि दूध ठेवलेलं होतं.बाकी खाण्याचं कोणतंच सामान अजून स्वयंपाकघरात ठेवलेलं नव्हतं. एक स्टोअर रुम होती, तिथे अलार्म वाजला की आत जायचं आणि जे किराणा सामान ठेवलं असेल , किंवा खायचे पदार्थ ठेवले असतील ते घ्यायचे आणि घरात स्वयंपाक करायचा असा नियम होता.पण जेवण्यापूर्वी आम्ही एक गंमत केली. जोवर बिग बॉसने आम्हाला कोणताच टास्क दिला नाही तोवर आम्ही ‘Truth or Dare’ खेळायचं ठरवलं.

कुणाची प्रेमप्रकरणं बाहेर आली तर कुणाचे टॅलेंटही कळलं. प्राची आणि अक्षय छान कथ्थक करतात हे आम्हाला तेव्हाच समजलं. आता आमची गट्टी झाली.तिथेच काही नाती तयार झाली. मी चैतालीला वहिनी, वहिनी म्हणू लागले तर विशाल जवळपास चैतालीचा सासरा असल्याप्रमाणे तिला ऑर्डर देऊ लागला. मध्येच किती वाजले असं विचारायचं, जे कुणालाच माहीत नव्हतं, मग श्रेयसची एक थेअरी होती, तो स्वीमिंग पूलच्या जवळ जाऊन आकाशाकडे पाहायचा आणि किती वाजले सांगायचा. ‘एक-सदतीस वाजले’ असं त्याने सांगितलं तेव्हा आम्ही खूप हसलो.  मग पुन्हा गप्पांचे, गॉसिपचे फड रंगले.

आता आम्ही बिग बॉसच्या घरावर जवळपास ताबा केला होता. कुणी स्वीमिंग पूलमध्ये पाय सोडून गप्पा मारत होतं तर कुणी गुलाबी रंगाच्या स्त्रियांच्या खोलीत आरामात बसलं होतं.  कुणाची फिरकी घे, कुणाला टोमणा मार, शाब्दिक कोट्या कर हे सगळं मनसोक्त सुरु झालं.काही जण अजूनही थोडे शांत होते. .एकंदर हा खेळ आता रंगत चालला होता. आम्हाला कुणीच कोणतीही स्क्रिप्ट दिली नव्हती.  बिग बॉसमध्ये स्क्रिप्ट असते का आणि म्हणून भांडणं होतात का? असे प्रश्न अनेक वेळा अनेक जण विचारतात. तर याचं उत्तर नाही असंच आहे. कोणतीही स्क्रिप्ट कुणालाही दिली जात नाही. जी भांडणं होतात, जे गॉसिप्स होतात, जी कारस्थानं रचली जातात ती सगळी स्पर्धकच करतात. खेळात पुढे जाता यावं आणि कुणीही आपल्याला घरातून बाहेर काढू नये यासाठी सगळेच लढत असतात.

एकाच घरात इतके दिवस राहणं हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. कारण नाही म्हटलं तरी मुखवटे गळून पडतात आणि दिसायला लागतो तो खरा चेहरा.

मग आम्हा सर्वांना बिग बॉसने एकेक करत कन्फेशन रुममध्ये बोलावलं आणि घरातून कोणत्या दोघांना बाहेर घालवायचं असं विचारलं.प्रत्येकाने त्याला खटकणा-या दोघांची नावं घेतली. अर्थात कन्फेशन रुममधील गोष्टी या गुपित राहिल्या, त्यामुळे कुणी कुणाचं नाव घेतलं ते आम्हाला कळल नाही.

शेवटी एक अशी व्यक्ती होती जिचं नाव सर्वांनीच घेतलं.तो कोणामध्ये मिसळत नव्हता पण तो कुणाशी बोलत नव्हता आणि खरंतर निरुपद्रवी होता पण तरीही सर्वांनी त्याचं नाव घेतलं. अखेर त्याला बिग बॉसने घराबाहेर जायला सांगितलं आणि तोही बिचारा हसतहसत बाहेर गेला. इथे कुणीच कुणाचं नसतं आणि सगळेच सगळ्यांचे असतात, फक्त वेळ येईल तेव्हा निघावं लागतं मग कारण काही का असेना, नसीब अपना अपना ,  बिग बॉसने आम्हाला हेच शिकवलं.

संध्याकाळी बिग बॉसचा आदेश आला आणि वेळ संपल्याचे कळले. तेव्हा मात्र सर्वांनाच खूप वाईट वाटले. अख्खा दिवस धमाल-मस्ती करत गेला.शेवटी त्या घरातून बाहेर पडावंसं वाटत नव्हतं.कदाचित आत्ता आम्हाला खरी मजा काय असते ते कळायला लागलं होतं. पण अलार्म वाजला होता आणि आम्हाला घराबाहेर जायचं होतं.

तेव्हा मनातल्या मनात हेच म्हणावंसं वाटलं - In case, I don’t see you… Good Afternoon, Good evening and Good night’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2018 02:09 PM IST

ताज्या बातम्या