फुटबॉल प्रेम आणि ठाकरे घराण्याचे युवराज !

फुटबॉल प्रेम आणि ठाकरे घराण्याचे युवराज !

एकमेकांसमोर आल्यावर ते कसे वागले असतील? त्यांनी एकमेकांना भेटल्यावर पहिली प्रतिक्रीया काय दिली असेल? एकमेकांच्या कुटुंबियांची विचारपूस केली असेल का? एकमेकांच्या कामाबाबत काही चर्चा झाली असेल का? एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं असेल का?

  • Share this:

प्रणाली कापसे,प्रतिनिधी

दोन भावांनी एकत्र जेवण करणं तसं काही आश्चर्याचा विषय नाही. पण हा विषय जर ठाकरे बंधूच्या बाबतीत असेल तर मात्र सगळ्यांनाच औत्सुक्य वाटणं साहजिक आहे.  त्यात तो  ठाकरेंच्या चौथ्या पिढीबाबत असेल तर मग ही बातमी ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात अनेक  प्रश्न निर्माण होतात. कारण ठाकरेंच्य़ा तिसऱ्या पिढीच्या भेटीला कायमच राजरकारणाचा रंग राहिला आहे.

राज ठाकरेंनी नवा पक्ष स्थापन केल्यापासून आजवर झालेल्या प्रत्येक बैठका या अतिशय गुप्त आणि कुठलंही फलित घेवून आलेल्या नाहीत. महाराष्ट्रतल्या हजारो कार्यकर्त्यांना काहीही वाटत असलं तरी या दोन्ही पक्ष प्रमुखांना कायव वाटतं यावर सगळं अवलंबून आहे. आजवर अनेकदा टाळी देण्याघेण्याबाबत चर्चा झाल्या. पण दरवेळी चर्चेच्या पलीकडे गोष्टी गेल्या नाहीत. त्यात या महापालिकेपूर्वी झालेल्या प्रकारामुळे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे  वडिलांमध्ये असलेल्या राजकीय वादांचा परिणाम या भावंडांच्या भेटीवर झाला असेल का ? एकमेकांसमोर आल्यावर ते कसे वागले असतील?  त्यांनी एकमेकांना भेटल्यावर पहिली प्रतिक्रीया काय दिली असेल?  एकमेकांच्या कुटुंबियांची विचारपूस केली असेल का? एकमेकांच्या कामाबाबत काही चर्चा झाली असेल का?  एकमेकांच्या कामाचं कौतुक केलं असेल का? त्यात अमित राज ठाकरे नुकत्याच मोठ्या आजारातून बरे झाले आहेत. त्याबाबत मोठा भाऊ या नात्याने आदित्य ठाकरेंनी काही विचारपूस केली असेल का?  असे सगळे प्रश्न सर्वसमान्यांच्या मनात येणं खूप स्वाभाविक आहे. आणि तशी विचारणा ही सर्वत्र होऊ लागलीये.

मुख्य म्हणजे ही भेट खूपचं वेगळ्या कारणावरुन झालीय. या दोन भावांमध्ये ५.३ किलोमीटरचं अंतर पाच फुटावर आणण्यासाठी कारण ठरलाय तो  एक खेळ...ज्या खेळाचे हे दोघेही भाऊ दिवाणे आहेत. तसं या खेळानं या  जगभरात लाखो, करोडो लोकांना वेड लावलंय. तोच फुटबॉल हा खेळ या दोन भावांना एवढं जवळ घेवून आलाय. आदित्य ठाकरेंना राजकारणाशिवाय खेळांमध्ये खूप रस आहे. त्यामुळेच मुंबईतल्या काही क्रिकेट क्लबचे ते सदस्य आहेत.

इतकंच नाही तर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यामुळे आदित्य अनेक वेळा मैदान हे खेळांसाठी राखिव ठेवण्यासाठी आग्रही असतात. तर दुसरीकडे अमित ठाकरेंना सुद्धा फुटबॉलचा नाद आहे. व्यायाम, सायकलिंग आणि  फुटबॉल हे त्यांचे आवडते छंद आहेत. ते स्वत: फुटबॉल खेळतात सुद्धा.

भारतात फुटबॉलला प्रोत्साहन मिळायला हवं. आपण एक चांगली दमदार फुटबॉल टीम बनवायला हवी. त्यासाठी शाळांच्या स्तरापासून सुरुवात करायला हवी  शुक्रवारी झालेल्या जागतिक फुटसाल दिनाच्या आयोजनाप्रमाणे जास्तीत जास्त आयोजनं होणं गरजेचं आहे. असं मत अमित ठाकरे व्यक्त करतात. मुंबईच्या वरळी परिसरातील एनएसआयमध्ये सध्या  प्रिमियर फुटसाल लिगचं आयोजन करण्यात आलंय.

आता फुटसाल हे काही मी चुकून लिहित नाहीये. तर या खेळाचं नाव फुटसाल असंच आहे. फुटसाल म्हणजे फुटबॉलचा छोटा भाऊ म्हटलं तरी चालेल किंवा क्रिकेटच्या भाषेत ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटसारखा प्रकार आहेत.  कारण बघणाऱ्याला फुटसाल हा फुटबॉलसारखाच वाटतो. या खेळाचं मैदान छोटं असतं , एक संघात पाच  खेळाडू  असतात. आणि काही नियम ही वेगळे असतात.  जागेची कमतरता  असलेल्या ठिकाणी किंवा जिथं खेळणाऱ्या मुलांची संख्या कमी आहे.  तिथं फुटबॉल हा खेळ वाढवायचा असेल तर सुरुवात फुटसालने करतात.

ब्राझीलचा जगविख्यात फुटबॉलपटू रोनाल्डीनो  ही लहानपणी फुटसालचं खेळायचा...फुटसालपासून सुरू झालेला त्याचा खेळ आज या पदापर्यंत येवून पोहचलाय. त्यामुळे भारतात या खेळाला प्रोत्साहन देण्याची सुरुवात फुटसालच्या माध्यमातून करावी असा विचार करुन दिनेश राज, निथ्या गणेश, अभिनंदन बाल सुब्रमण्यम या तिघांनी  गेल्या वर्षीपासून या खेळाचं आयोजन करायला सुरुवात केली.

रोनाल्डीनो त्यात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत आले आहेत. त्यांच्यासह नावाजलेले ६ खेळाडू या खेळासाठी मुंबईत आले आहेत. प्रत्येक खेळाडू एकऐका संघात खेळताहेत. असे सहा संघ मुंबईत खेळताहेत. आयपीएल प्रमाणे या  खेळाच्याही टीम्स वेगवेगळ्या लोकांनी खरेदी केल्या आहेत.  यंदाचं या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे.गेल्यावर्षी हे सगळे खेळाडू आले कधी आणि गेले कधी कुणाला कळलं ही नाही. पण या वर्षी मात्र अमित ठाकरेंच्या या आयोजनातील सहभागामुळे अनेकांचं लक्ष त्याकडे गेलं.

प्रसारमाध्यमं त्याचबरोबर वृत्तपत्रांनी या बातम्यांची दखल घेतली.मुंबईत जागतिक किर्तीचे खेळाडू आले असताना आदित्य ठाकरे मात्र त्यांच्या बरोबर कुठे ही दिसले नाहीत. शिवाय याच वर्षी फिफा वर्ल्डकप अंडर १७ होतंय. त्या आयोजनात आदित्य ठाकरेंचा महत्वाचा सहभाग असणार आहे. अशात आदित्य यांच्या खेळाडूंना न भेटीमागे वैयक्तिक रागद्वेश तर नाही ना अशी शंका यायला वाव होता. पण तसं न होता मुंबईकरांनी जे चित्र कधीच पाहिलं नव्हतं ते आता पाहिलंय.

वडिलांच्या सावलीत वाढलेली ही दोन्ही भावंड कधी ही सार्वजनिकरित्या एकटे भेटल्य़ाची माहिती नाहीये. यापूर्वी एबीसीच्या कार्यक्रमात हे दोघे ही गेल्याचं ऐकवित आहे पण त्या ठिकाणीही त्यांची इतकी दिर्घ चर्चा झाल्याची माहिती नाही. त्यामुळे या भेटीच्या छायाचित्रांना बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असो...तर आदित्य ठाकरेंना या खेळाडूंना भेटाची इच्छा झाली. त्यामुळे आदित्य यांनी अमित ठाकरेंना फोन करुन मी भेटायला येवू शकतो का याची विचारणा केली. तेंव्हा अमित ठाकरेंनी लगेचच होकार देत या खेळाडूंची भेट घालून दिली.

मुंबईच्या लोअर परळ भागातील हॉटेल सेंट रेगिसमध्ये तब्बल दीड तास चालेल्या या भेटी दरम्यान दोन्ही भावडांनी खूप गप्पा केल्या. एकत्रित जेवण ही केलं. दोन्ही भावंड भेटी दरम्यान खूपचं मनमोकळे, निवांत जाणवल्याची माहिती मिळतेय. आदित्य ठाकरेंनी राजकीय जिवनात प्रवेश केलाय. पण अमित ठाकरे अजून राजकारणापासून लांब आहेत. त्यामुळे राजकारणाबाबत या भेटी दरम्यान कुठलीही चर्चा झाली नाही अशी माहिती मिळतेय. त्यामुळे जे भल्याभल्यांना जमलं नाही ते फुटबॉल महाराजांना जमलंय.​

First Published: Sep 17, 2017 06:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading