S M L

जन्नत ए कश्मीर!

या नंदनवनात पाऊल ठेवायला बरीच वर्ष मन उत्सुक होतं. काळजी, हुरहुर आणि आनंद अशा संमिश्र भावनांनीच पाय ठेवला श्रीनगरच्या विमानतळावर.

Sonali Deshpande | Updated On: May 7, 2018 02:42 PM IST

जन्नत ए कश्मीर!

सोनाली देशपांडे, प्रतिनिधी

जन्नत ए कश्मीर. भारताचं नंदनवन.  अगदी लहानपणापासून काश्मीरबद्दल हे वाचत, ऐकत आपण मोठे होतो. या नंदनवनात पाऊल ठेवायला बरीच वर्ष मन उत्सुक होतं. काळजी, हुरहुर आणि आनंद अशा संमिश्र भावनांनीच पाय ठेवला श्रीनगरच्या विमानतळावर. तिथून आमचा मुक्काम होता तो थेट दाल लेकमधल्या हाऊस बोटमध्ये. हाऊस बोटबाहेरचा विस्तीर्ण पसरलेला दाल लेक, उंच आभाळात दिसणारी हिमशिखरं, अदबीनं वागणारे काश्मिरी नागरिक... काश्मीरमध्ये शिरल्या शिरल्या मन सुखावून गेलं होतं. अर्थात, रस्त्यावर चप्प्या चप्यावर दिसणारं लष्कर पाहून मनात एक सावध पवित्राही घेतला गेला.

आदिल आमचा टूर गाईड. त्यानं आल्या आल्याच आम्हाला सांगितलं, बघा इथे कसं सगळं आलबेल आहे. जाऊन सांगा तुम्ही तुमच्या प्रदेशात. मीडिया उगाच बढा चढाके बताती है. हे आदिलचं मत. ते ऐकून एक गोष्ट नक्की जाणवली, ती म्हणजे काश्मीरला गरज आहे जास्त पर्यटक येण्याची. त्यावरच त्यांची रोजीरोटी अवलंबून आहे.हाऊस बोटमध्ये आम्ही थोडे सेटल झाल्या झाल्याच विक्रेत्यांची गर्दी सुरू झाली. कोण शाली घेऊन येत होतं, कोणी स्वेटर्स तर कोणी खास काश्मिरी दागिने. तर काही जण आकर्षक वस्तू. किमती अव्वाच्या सव्वा. म्हणजे मूळ किमतीपेक्षा तिप्पट चौपट किंमत. ज्यांना बार्गेन करण्याचं कसब असेल तेच ही खरेदी योग्य किंमतीत करू शकतात. असो. हाऊस बोटीतून एक तास शिकारा राईड होती. तोही एक अनोखा अनुभव. अप्रतिम नजारा. आणि सगळ्यांचा साक्षीदार तो हिमालय. कायम साद घालणारा. सतत आपल्यावर लक्ष ठेवून असणारा. त्या दिवशी बुद्धपौर्णिमेचा आदला दिवस होता. आकाशात पूर्ण चंद्र दिसत होता. आणि त्याचं प्रतिबिंब तलावात पडलेलं. सर्वच कसं देखणं, विलोभनीय.

दाल लेकमध्ये तुम्ही शिकारा राईड घेताना कदाचित तुम्हाला शम्मी कपूरचं गाणं आठवू शकतं, किंवा मिशन कश्मीरमधलं हृतिक रोशनचं. पण तुमचा हा रोमँटिक मूड थोडा काळ टिकतो. कारण आजूबाजूची तरंगती दुकानं तुमचं लक्ष अक्षरश: ओढून घेतात. छोट्या छोट्या होड्यांमध्ये छोटे विक्रेते पर्सेस, शाली इत्यादी वस्तू घेऊन येतात आणि तुम्हाला गोड भाषेत अगदी बेजार करतात. त्यांना नाही म्हणायला जिवावर येतं, पण नाईलाज असतो. पुन्हा अव्वाच्या सव्वा किमतींचा प्रश्न असतोच. शिकाऱ्यावर आपल्याला गाठून ते जणू पर्यटकांची शिकारच करत असतात, एका अर्थी. दाल लेकमध्ये बाजरपेठच आहे. पण गंमत म्हणजे तलावावरची दुकानं एकदम सुस्त असतात. तिथल्या दुकानदारांना फार काही पडलेली नाही, असं जाणवत होतं. धडपड चालली होती ती फक्त छोट्या विक्रेत्यांची!

Loading...
Loading...

श्रीनगरच्या दाल लेकमधून दुसऱ्या दिवशी आम्ही कूच केली ती गुलमर्गला. गुलमर्ग म्हणजे निसर्गाची नुसती उधळण. पांढऱ्या शुभ्र बर्फातली पाईन, चिनार, देवदारची झाडं, एकेक सौंदर्य खुलत जाणारं. गुलमर्गला स्कुटर राईड असते. ही स्कुटर चार चाकी. ड्रायव्हरच्या मागे बसून तुम्ही दऱ्याखोऱ्यात फिरायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्हीही ही स्कुटर चालवू शकता. स्कुटर राईड करताना निसर्गाचा आनंद जास्त घेता आला. कार आणि स्कुटरमधला हा मोठा फरक. यात निसर्ग अगदी अंगावर येतो. आपण त्याचंच अपत्य, त्याच्या अंगाखांद्यावर खेळतोय असं जाम फीलिंग येतं अशा वेळी.

गुलमर्गला गंडोला राईडही प्रसिद्ध आहे. तुम्हाला थेट हिमालयाच्या कुशीतच घेऊन जाते ही राईड. तिथे हाडं गोठावणारी थंडी म्हणजे काय, याचा अनुभव येतो अगदी. वरून लांबवरची एलओसीही दिसते.

गुलमर्गवरून आम्ही पहलगामला निघालो, तो दिवस लक्षात राहणाराच होता. आदल्याच दिवशी इथे हिजबूल मुजाहिद्दीन या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या दोन कमांडर्सना लष्करानं मारलं होतं. आम्ही अनंतनाग, फुलवामा, त्राल या दहशतवाद्यांच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गावांमधून जात होतो. दहशतवाद्यांना मारल्याच्या निषेधार्थ गावंच्या गावं बंद होती. आमचा ड्रायव्हर शकील आमची टुरिस्ट बस जलद चालवत होता. तो म्हणाला, इथे कधीही जोरदार दगडफेक होऊ शकते. गावातले लोकच लहान मुलांमार्फत दगडफेक करतात. काही अंतरावर ही दगडफेक सुरू होतीच. आणि काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर अक्षरश: अलर्ट दिसत होतं रस्त्यारस्त्यावर. कोपऱ्या कोपऱ्यात लष्कर. मधूनच जाणाऱ्या लष्कराच्या गाड्यांनी थोडं सुरक्षितही वाटत होतं.

काश्मीरमध्ये अनेक काश्मिरी लोक भेटले. अनेकांशी मी संवाद साधला. ही सगळी मंडळी एकदम प्रेमळ. मदत करणारी. अदबीनं वागणारी. पर्यटक त्यांच्यासाठी जणू देवच. पण त्यांच्याशी बोलल्यावर हे कळलं, यातले काही जण दहशतवाद्यांना पाठिंबा देतात. त्यांना मदत करतात. कधी नाईलाजानं, तर कधी स्वत:हून. आमचा ड्रायव्हर शकील सांगत होता, इथे कुणाला पाकिस्तान नकोय. हवाय तो स्वतंत्र काश्मीर. सरकारवर त्यांचा राग आहे.

पहलगाममध्ये बेताब व्हॅली आहे. इथे बेताब सिनेमाचं शूटिंग झालं होतं. म्हणून या व्हॅलीला हे नाव पडलं. इथे एक चाचा भेटले. खूप प्रेमळ. म्हणाले, केंद्र सरकार काश्मीरसाठी पैसे पाठवतं. पण इथल्या तरुणापर्यंत पोचतच नाहीत. रोजगारासाठी इथल्या तरुणाला वणवण करावी लागतेय. मग सुतारकाम, नक्षीकाम, ड्रायव्हिंग, घोडेस्वारी ही कामं हे तरुण करतात. ते सरकारवर खूप टीका करत होते. म्हणाले, 1990नंतर इथली परिस्थिती बिघडत गेलीय. तुम्हाला काय हवंय असं विचारल्यावर थोडं चाचरत म्हणाले, हे असंच राहणार असेल तर स्वतंत्र काश्मीरच हवा. पण बेताब व्हॅलीतून आम्ही बाहेर पडत असताना पुन्हा नक्की या सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते.

काश्मीरमध्ये सगळीकडे कामधाम करणारे पुरुषच आहेत. स्त्रिया फारशा दिसत नाहीत. रस्त्यावर जाताना दिसल्या तरी फक्त त्यांचा सुंदर चेहराच दिसतो. बाकी बुरखाच असतो. पण त्या कुठे काम करत नाहीत. श्रीनगरच्या विमानतळावर मात्र तरुणी दिसतात. काश्मिरी तरुण,तरुणी, मुलं, मुली सगळेच कसे राजबिंडे दिसतात.

पहलगामवरही निसर्गाचं मोठं वरदान जाणवलं. इथे घोड्यावर बसवून एका चिंचोळ्या मार्गावर घेऊन जातात. तिथल्या दरीला मिनी स्वित्झलँड म्हटलं जातं.. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या चादरीचं ते विलोभनीय दृश्य तुम्हाला तुमचे सगळे श्रम, चिंता विसरायला लावतं. खरं तर संवेदनशील व्यक्ती निसर्गात येऊन नम्र होते. या अवाढव्य आणि अचंबित करणाऱ्या निसर्गापुढे मी मी म्हणणारी आपण सगळी माणसं किती खुजी आहेत, याची जाणीव होते. का कोण जाणे, पण त्या वातावरणात कुणावर काही रागच राहात नाही. एकमेकांशी चांगलंच वागावंस वाटतं, अगदी या नितांत सुंदर निसर्गासारखं. मग राहून राहून एक प्रश्न मनात येतोच, इतक्या सुंदर वातावरणात दहशतवाद कसा पोसला जातोय?

इथे एक शंकराचार्यांचं मंदिरही आहे. एकदम जुनं पुराणं. दगडांनी बांधलेलं. मंदिरापर्यंत जायला 250च्या वर पायऱ्या चढाव्या लागतात. तिथे CRPSचे जवान सुरक्षेसाठी तैनात होते. त्यात एक नागपूरच्या इन्स्पेक्टर मॅडम आणि वर्ध्याचा हवालदार भेटला. आम्हा मुंबईकरांना पाहून ते खूश झाले. मग आमचा संवाद मराठीतच सुरू झाला. ते सांगत होते, 'इथलं आयुष्य आव्हानात्मक आहे. इथले बरेच जण दहशतवाद्यांना मदत करतात. पोलीसही अनेकदा 'त्यांच्या' बाजूनं असतात. आमचा नाईलाज होतो. आमच्यावर दगड मारतात.'

आम्हाला विमानतळावर एक काश्मिरी भेटला. तो गेली 25 वर्ष मुंबईत हिऱ्यांच्या दागिन्यांचा व्यवसाय करतोय. त्याचे आईवडील श्रीनगरमध्ये राहतात. त्याला मुलगा झाला म्हणून तो बाळंपणासाठी माहेरी आलेल्या बायकोला भेटायला आलेला. त्यानं एक किस्सा सांगितला भ्रष्टाचाराचा. काही दिवसांपूर्वी काश्मीरला पूर आलेला. त्याच्या आत्याचं घरदार वाहून गेलं. सरकारकडून 2 कोटी मिळणं अपेक्षित होतं. तर हातावर टेकवले फक्त 3 हजार 700 रुपये.

असे अनेक किस्से, कहाण्या, व्यथा ऐकत आमचा काश्मीर प्रवास सुरू होता. यात अजून एक उल्लेख करावसा वाटतो तो कहावा चहाचा! हे काश्मिरी पेय. इथे आलेल्या  पाहुण्यांना आवर्जून दिलं जातं. एका दुकानात तर मराठी बोलणारा काश्मिरी तरुण भेटला. म्हणाला, महाराष्ट्रातले टुरिस्ट येतात.  त्यांच्यासाठी मराठी शिकून ठेवलंय. एकदम भारी वाटलं.

'जन्नत ए कश्मीर' ही काश्मीरला दिली जाणारी उपमा एकदम सही आहे. इथे हिमालय भेटतो. खूप जवळचा वाटतो. शांत, निवांत असा. आपले पितामह असल्यासारखं भासतं. काश्मीरला येऊन हिमालय अनुभवणं शब्दापलीकडचं आहे. सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम, मुघल गार्डन, बोटॅनिकल गार्डन... सगळ्यात जास्त सुंदर कोण, हे ठरवणं महाकठीण. काश्मीरचा आनंद घ्यायला जास्तीत जास्त पर्यटकांनी आलं पाहिजे. इथल्या काश्मिरींच्या स्वभावातला मूळचा गोडवा टिकला पाहिजे. आणि सुंदर वातावरणाला लागलेली दहशतीची किनार नष्ट व्हायला पाहिजे. तूर्तास, आपण एवढीच इच्छा व्यक्त करू शकतो!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2018 02:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close