" श्रावण सूक्त ! "

आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांचा विशेष ब्लॉग " श्रावण सूक्त ! " सणासुदीची सुरुवात म्हणजे श्रावण. ज्याचे बालपण गावखेड्यात गेलेले त्यांच्यासाठी तर श्रावण म्हणजे उत्तम निसर्ग पाहण्याची, उत्तम पदार्थ खाण्याची आनंदपर्वणी. नाही म्हणायला "श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे... क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे" हे बालकवींचे श्रावनसूक्त गात तुम्ही - आम्ही सारे मोठे झालो.

  • Share this:
महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक,IBNलोकमत हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला.... कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या शब्दातून उमटलेल्या या शब्दओळी श्रावणाचे सोनकोवळे, आरस्पानी रूपसौंदर्य मोठ्या नजाकतीने डोळ्यासमोर उभे करतात. हा महिना खरंच हसरा आणि नाचरा आहे. त्याच्या प्रत्येक दिवसामध्ये चैतन्यदायी ऊर्जा असते. आपण आषाढ पहिला, धरतीच्या सूर्यतप्त असोशीला तृप्त कार्याचे विलक्षण सामर्थ्य असणारा आषाढ, थोडा मोकळा-ढाकळा, मन हरपून बरसणारा,"मेघदूता"च्या साक्षीने विहरणारा. पण श्रावण त्यापेक्षा वेगळा. एखाद्या राजाला लाजवेल असे देखणे निसर्गरूप ल्यालेला तेवढाच राजस, लोभस आणि तेजस महिना म्हणजे श्रावण. जे निसर्गाच्या जवळ आहे, त्या हिरव्या वैभवाची हसत लयलूट करणारा महिना म्हणजे श्रावण. म्हणून असेल कदाचित याच महिन्यातील अष्टमीला, पाऊसभरल्या काळोख्या रात्री विजांच्या साक्षीने श्रीकृष्णाला जन्म घ्यावासा वाटला असेल. सामान्य माणसाला देवत्वाकडे नेण्याची पहिली वाट म्हणजे श्रीकृष्ण, तद्वत सणासुदीची सुरुवात म्हणजे श्रावण. ज्याचे बालपण गावखेड्यात गेलेले त्यांच्यासाठी तर श्रावण म्हणजे उत्तम निसर्ग पाहण्याची, उत्तम पदार्थ खाण्याची आनंदपर्वणी. नाही म्हणायला "श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे... क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे" हे बालकवींचे श्रावनसूक्त गात तुम्ही - आम्ही सारे मोठे झालो. आज शहरातील मुलांना ज्या गोष्टी कल्पनारम्य वाटतील, अविश्वसनीय वाटतील , त्यांचे वर्णन बालकवींच्या कवितेत आहे. खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत बालकवी असतील, कुसुमाग्रज असतील कविमनाच्या शब्दकोशातून उसळणारा आनंद म्हणजे मनाला येणारी सुखाची प्रचिती. ही सुखाची अनुभूती जशी माणसांना घेता येते, तद्वत निसर्गही ती अनुभूती घेत असतो. ‘श्रावण’ हा असाच निसर्गाच्या आनंदानुभूतीचा पर्वकाळ मानला जातो. म्हणून असेल कदाचित सृजनाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्येक घटकाचे या महिन्यात स्मरण करण्याची आमची कृषक परंपरा आहे. सृजन, नवनिर्माण आणि जीवनदायी वात्सल्याचे सगळ्यात मोठे प्रतीक म्हणजे आई, आमच्या घरी पिठोरी अमावस्या, म्हणजे 'मातृदिन' आजही तेवढ्याच प्रेमभावाने साजरा केला जातो. ' मदर्स डे 'ला भरभरून शुभेच्छा देणाऱ्या मंडळींना हल्ली या देशी किंवा पारंपरिक 'मातृदिन' साजरा करण्याची हौस निर्माण होत आहे. पण जेव्हा त्या सणांमागील अर्थ आणि उद्देश कळेल तेव्हा मनातील गैरसमजही कमी होतील. आमच्या आधीच्या पिढ्यांचे आयुष्य ऋतुचक्राशी "बांधलेले" होते, खासकरून ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना प्रत्येक गोष्ट निसर्गाच्या मर्जीने करावी लागत होती. त्यामुळे आमचे सण, उत्सव, परंपरा शेतीच्या वेळापत्रकासोबत जोडलेल्या होत्या. मात्र सध्या ज्या गतीने आणि पद्धतीने शेती आणि शेतीवर आधारित जीवन जगणाऱ्यांची संख्या वेगाने कमी होत आहे, ते पाहता जुन्या परंपरांचे वेगाने विकृतीकरण किंवा विस्मरण होणे अपरिहार्य आहे. पण ज्यांच्या मनात आजही या आठवणी जिवंत आहेत, त्यांच्यासाठी 'त्या' दिवसांचे नुसते स्मरणही स्फुरणदायी ठरते. मग मन त्याच आठवणीत रमते, भ्रमात. बघा ना श्रावणात येणारा पहिला सण असतो नागपंचमीचा. साप, उंदरांचा कर्दनकाळ म्हणजे शेतकऱ्याचा मित्र . त्याच्या विषारी दंशाची सगळ्यांनाच दहशत, त्याला प्रत्येक शेतकऱ्याची बायको आपला भाऊ मानते. त्या भावनेने पुजते. त्याची व्रतकथाही तशीच मनाला हात घालणारी निसर्ग-माणूस एका घरगुती नात्याने जोडणारी. श्रावणातच नारळीपौर्णिमेला समुद्राची पूजा करतात, अगदी नाचत - गात कोळी आबालवृद्ध दर्यावर जातात आणि नारळ अर्पण करून आपली भावना व्यक्त करतात. सूर्याच्या तप्त किरणांनी, उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या धरतीमातेला श्रावणात हिरवी तृप्ती लाभलेली असते. एरवी उघडे-बोडके दिसणारे डोंगरमाथे श्रावणात हरित तृणांच्या मखमलीने झाकले जातात. म्हणूनच असेल कदाचित या महिन्यात आवर्जून 'आदित्यपूजन' केले जात असावे. असो, मानवी मनाच्या उत्साहाचे उत्सवात असे सहज रूपांतर करणारा श्रावणसृष्टीतील चराचराला जागवत आणि जोजवत असतो. मग प्रतिभेची दैवी देणगी लाभलेल्या मंगेश पाडगावकरांसारख्या कवीला त्याची भुरळ नाही पडली तरच नवल.... बघा ना, पाडगावकरांचे शब्द, अहाहा... पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा श्रावणात घन निळा बरसला... श्रावणात राणा-वनात फिरणे हा एक विलक्षण अनुभव, या दिवसात खाच-खळग्यात जमा झालेल्या जागांवर चमचमणार्‍या पाण्याचे विविध आकाराचे तुकडे जणू पृथ्वीच्या हिरव्यागार शालूवरील आरसेच भासतात आणि तिकडे मोकळ्या पठारावर तर गवतफुलांच्या विविधरंगी पुष्पगुच्छांची सुरेख आरासच मांडलेली दिसते. लहानमोठ्या पानांच्या वेली अवखळपणे झाडांच्या फांद्यांशी लगट करत आकाशात डोकावताना दिसतात. पाखरांच्या किलबिलाटाला झर्‍याच्या खळखळाटाची साथ घेत अवघ्या सृष्टीत रंग, गंध आणि नाद असा मनमोहक नादोत्सव रंगतो, आणि आपण सारे श्रावणनादात दंगतो. श्रावण संपत येतो तोच ढोल-ताशांच्या गजरात येतात गणपती बाप्पा. गणपतीपाठोपाठ येतात नवलाईच्या नवरात्री, दसरा आणि दिवाळी. थोडक्यात काय, तर श्रावणसरींच्या साथीने आपले जीवन ‘उत्सवी’ होण्यास सुरुवात झालेली असते. या उत्सवी काळामध्ये आपले जगणे-वागणेही संयमी असावे, या अपेक्षांमधूनच खरे तर श्रावण महिन्यातील जप-तप आणि खाणे-पिणे आदींवर बंधने आली असावीत, पण आमच्याकडे या लोकरूढींकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची पद्धतच नाही. त्यामुळे श्रावणातील निसर्गसंपन्न जगण्याला आम्ही कर्मकांडाच्या फेर्‍यात अडकवून मोकळे होतो. त्यामुळे ना स्वत:चा, ना समाजाचा फायदा होतो. मग अशा प्रसंगी जर आम्ही रूढी-परंपरांना सामाजिक समस्यांशी जोडले तर खूप मोठे काम होऊ शकते. फार दूर कशाला जायचे, नागपंचमी असो वा श्रावणी सोमवार या दिवसांमध्ये देशातील लक्षावधी माता-भगिनी नागाच्या मूर्तीवर आणि शंकराच्या पिंडींवर कोटयवधी लीटर दुधाचा अभिषेक करतात. वास्तविक पाहता, हा दह्या-दुधाचा अधिकार सामान्यांना देण्यासाठी हजारो वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने दहीहंडी फोडण्याचा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे त्याने त्या बंडखोरीची सुरुवात आपल्या घरापासून केली होती, मग गोकुळातील अन्य लोकांच्या घरातील दही-दूध गोपाळांच्या हाती देण्याचे धाडस केले होते. कृष्णाच्या त्या बंडखोरीचे स्मरण म्हणून आम्ही गोपाळकाला हा सण म्हणून साजरा करतो, हे बरेच लोक विसरलेले आहेत. म्हणून आम्ही ज्यावेळी दुधाची धार शंकराच्या पिंडीवर धरू त्यावेळी आमच्या देशातील भुकेने तडफडणार्‍या गोरगरिबांच्या लेकरांचा चेहरा डोळयासमोर आणला पाहिजे. शिवपिंडीवर केलेला दूध, तूप वा मधाचा अभिषेक प्रत्यक्ष शंकराला पोहोचतो की नाही हे मला ठाऊक नाही, तसे सांगणारा अजूनपर्यंत कधी पाहिलेला नाही. परंतु स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे जर ‘जीवसेवा हीच शिवसेवा’ असेल तर आम्ही ही दूध-तूप आणि दह्याची धार भुकेने मरणार्‍या लोकांपर्यंत नेणे गरजेचे आहे. आज आपल्या देशातील एकूण मुलांच्या निम्मी मुले म्हणजे जवळपास सहा कोटी बालके दुबळी, कमी वजनाची आहेत. ४५ टक्के मुले त्यांच्या वयाच्या तुलनेत छोटी दिसतात. ७५ टक्के मुले अ‍ॅनेमिक आणि २० टक्के कुपोषित असलेली दिसतात. आपल्या देशातील भले-भले लोक भारताला महासत्ता बनवण्याची ‘स्वप्ने’ पाहत आहेत, पण ज्या चीनशी आम्हाला स्पर्धा करायची आहे, तेथील कुपोषित बालकांच्या पाच पट कुपोषित मुले ज्या देशात आहेत, तो आपला भारत देश बलाढ्य चीनशी टक्कर कसा देणार, याचे उत्तर मात्र त्यांच्यापाशी नसते. मंदिरातील देवी-देवतांवर, तेथील सोहळ्यावर, उत्सवांवर कुणी खर्च करीत असेल तर त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही, परंतु जो धर्म माणुसकी विसरतो, त्याला त्याला आम्ही धर्म म्हणावे का? आमची देवपूजा स्वतःचे कौतुक करून घेणाऱ्या 'देहपूजे'सारखी होत असेल तर देव या संकल्पनेला काय अर्थ उरेल? मला आजही आठवते, दर श्रावणी शनिवार आणि सोमवारी एक-दोन गरीब अतिथी जेवायला नसेल तर आई जेवत नसे, मला कधी-कधी पावसात पायपीट करायला कंटाळा येई, पण तिचा निर्धार मात्र ठाम असे. आजच्या दिवशी गावात कुणी उपाशी झोपू नये, या तिच्या भोळ्या भावनेमध्ये सामाजिक सौख्याचे अंतःप्रवाह होते, ते त्यावेळी कळत नव्हते, समजण्याचे वयही नव्हते, पण आज त्याचा उलगडा होतोय... हा सारा श्रावण महिमा, आपल्या आई-वडिलांमध्ये देव पाहणाऱ्या श्रावणबाळाचे नाव या महिन्याने घेतलंय, म्हणून असेल कदाचित मला तो जास्त आपला वाटतोय. पण खरंच सांगतो, ज्याने कवींना प्रतिभेची, कलाकारांना नवसृजनाची, शेतकर्‍यांना हिरव्या दानाची आणि पाखरांना मधुरगानाची देणगी दिली आहे, त्या श्रावणाकडून आपण सारे चांगल्या ‘मार्गदर्शना’ची अपेक्षा करू या !
First published: