अखेर सदाभाऊंची स्वाभिमानीतून हकालपट्टी, पुढे काय?

अखेर सदाभाऊंची स्वाभिमानीतून हकालपट्टी, पुढे काय?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अखेर सदाभाऊंची हकालपट्टी केलीय, या कारवाईने लगेच सदाभाऊंची मंत्रिपद जाईल अशातला काही भाग नाही पण, संघटनेला 30 वर्षं दिलेल्या कार्यकर्त्याला अशा मानहानीकारक पद्धतीनं संघटनेतून बाहेर पडावं लागणं खचितच योग्य नाही. किंबहुना या संघटनात्मक निमित्ताने सदाभाऊंचं शेट्टी समर्थकांकडून झालेलं 'चारित्र्यहनन' कधीही भरून निघणारं नाहीये, त्यामुळे सदाभाऊंसमोर पुढे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, मुंबई

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आलीय. सदाभाऊंच्या हकालपट्टीमुळे शेतकरी चळवळ पुन्हा फुटल्याचं अधोरेखित झालंय. अर्थात तसाही शेतकरी संघटनेला फुटीचा असलेला फुटीचा शाप काही आजचा नाही आहे. अगदी संघटनेचे संस्थापक शरद जोशींचीही यातून सुटका झालेली नाही. फरक फक्त फुटीची तात्कालिक कारणं आणि दोन नेत्यांमधल्या वादाचा असतो. इथंही संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातल्या सुप्त राजकीय संघर्षामुळेच संघर्षामुळेच शेतकरी संघटना पुन्हा नव्यानं फुटलीय इतकंच काय ते नवीन... थोडक्यात, आज ना उद्या हे होणारच होतं. आता फक्त प्रश्न हा आहे की पुढे काय?

सदाभाऊ खोत कृषी राज्यमंत्री झाल्यापासूनच राजू शेट्टी आणि त्यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झालाच होता. या दोन्ही नेत्यांच्या आजूबाजूच्या लोकांनीही त्यात आणखीनच तेल घालण्याचं काम केल्यानं त्याची परिणीती अखेर सदाभाऊंच्या हकालपट्टीत झालीय. अर्थात सदाभाऊंनी यासाठीची मानसिक तयारी केलीच होती म्हणा... म्हणूनच चौकशी समितीला सामोर गेल्यानंतरच त्यांनी यापुढे आपलाच झेंडा, आपलीच काठी आणि दोरीही आपलीच असं विधान करून वेगळी चूल मांडण्याचे स्पष्ट संकेत दिलेच होते.

मुद्दा फक्त एवढाच बाकी होता की स्वाभिमानी त्यांना हाकलणार की ते स्वतःहून बाहेर पडणार? पण इथंही सदाभाऊंनी हा निर्णय राजू शेट्टींवरच सोपवल्यानं त्यांनीही चौकशीचे सोपस्कार पार पाडून यथावकाश त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. एवढंच नाहीतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सदाभाऊ खोत यांची प्रतिमा व्यवस्थित मलीन होईल, याचीही तजवीज केली. सोशल मीडियातून सदाभाऊंविरोधात शेट्टी समर्थकांनी याच दरम्यान पद्धतशीरपणे मोहीम चालवली. थोडक्यात, सदाभाऊंची संघटनेतून हकालपट्टी करताना ते कुठेही स्वतःला 'शहीद' अथवा अन्यायग्रस्त म्हणून मिरवणार नाहीत, याचीही विशेष खबरदारी घेण्यात आली. कदाचित त्यामुळेच सदाभाऊंच्या हकालपट्टीनंतरही स्वाभिमानी संघटनेतील एकाही पदाधिकाऱ्यानं राजीनामा दिल्याचं अथवा बंड पुकारल्याचं अजून तरी ऐकिवात नाही. आत्मक्लेश यात्रेच्या माध्यमातून राजू शेट्टींनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना सरकारविरोधात आंदोलनाचा कार्यक्रम देऊन संघटना पातळीवरही बऱ्यापैकी 'डॅमेज कंट्रोल' केल्याचं बघायला मिळालंय.

सदाभाऊंचं कुठं चुकलं?

सदाभाऊ खोत हे खरं तर लढाऊ नेतृत्व, स्वाभिमानीची मुलूखमैदान तोफ अशी त्यांची ख्याती... प्रदेशाध्यक्षपदी असताना पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यात शेतकरी चळवळ वाढवण्यात त्यांचंही योगदान कदापिही विसरून चालणार नाही. विशेषतः राष्ट्रवादीच्या साखर कारखानदारांविरोधात त्यांनी शिवराळ भाषेत फिरवलेला 'दांडपट्टा' अनेकांच्या जिव्हारी लागलाय. त्याच जोरावर संघटना भाजपच्या सोबतीनं सत्तेचा सोपान चढली. यथावकाश त्यांना मंत्रिपदही मिळालं. पण मंत्रिपद मिळताच सदाभाऊंना सत्तेची ऊब हवीहवीशी वाटू लागली. अशातच ते मुख्यमंत्र्यांच्या नको तितके जवळ गेल्यानं राजू शेट्टींचा चांगलाच तिळपापड झाला... तिथूनच खऱ्या अर्थानं या दोन नेत्यांमध्ये वितुष्ट आलं. त्यांच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनीही त्यात आणखी भरच घातली.

शेतकरी संपकाळात तर सदाभाऊंवर थेट संप फोडण्याचा गंभीर आरोप झाला. या काळात त्यांनी जयाजी सूर्यवंशी, संदीप गिट्टे यांसारख्या 'वादग्रस्त' कार्यकर्त्यांना जवळ केल्यानं शेतकरी संघटनेतून सदाभाऊंवर अतिशय बोचरी टीका झाली. इथून पुढेच खऱ्या अर्थानं सदाभाऊंची प्रतिमा खलनायक म्हणूनच 'पोट्रेट' करण्यात त्यांच्या संघटना अंतर्गत विरोधकांना अधिक सोपं गेलं. त्यांनीही मग यावर आपली बाजू सावरत बसण्याऐवजी थेट राजू शेट्टींवरच प्रतिहल्ला करण्यात धन्यता मानली. याउलट राजू शेट्टींनी पद्धतशीरपणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर पुन्हा मजबूत पकड मिळवली तर सदाभाऊ संघटनेत काहीसे एकाकी पडल्याचं चित्रं बघायला मिळालं.

दुसरीकडे एरव्ही सदाभाऊंच्या बंगल्यावर कायम पडीक असलेले रविकांत तुपकर यांच्यासारखे दुसऱ्या फळीतले छोटेमोठे कार्यकर्ते लगेच परिस्थिती बदलताच राजू शेट्टींच्या गटात सामील झाले. याची सदाभाऊंना साधी खबरबातही लागली नाही. शेतकरी संपाच्या निमित्तानं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविरोधात शेतकरी संघटनेत नाराजी तयार होताच राजू शेट्टींनी त्यांच्याविरोधात चौकशी समिती नेमून खुलासा मागितला. पण तिथंही सदाभाऊंनी राजू शेट्टींशी जुळवून घेण्याऐवजी संघर्षाची भूमिका घेतली. त्याचाच परिपाक म्हणून संघटनेला 30 वर्षं दिलेल्या सदाभाऊंना अतिशय मानहानीकारक पद्धतीनं संघटनेतून बाहेर पडावं लागलं. बाहेर पडावं लागलं म्हणण्यापेक्षा त्यांची थेट हकालपट्टी करण्यात आली. संघटनात्मक पातळीवरचा सदाभाऊंचा हा पराभव भविष्यात त्यांना निश्चितच जड जाणार आहे. कारण शेतकरी चळवळीत सदाभाऊंचं झालेलं हे 'चारित्र्यहनन' कधीही भरून न येणारं आहे.

सदाभाऊ खोत यांच्यासमोरचे पर्याय काय?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी झाली म्हणून काय लगेच मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिपद काढून घेतील अशी सुतराम शक्यता नाही. त्यामुळे सदाभाऊ पुढे नेमकं काय करणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. याबाबत स्वतः सदाभाऊंनी कार्यकर्त्यांशी बोलूनच पुढची दिशा ठरवू असं म्हटलं असलं तरी त्यांची पुढची राजकीय वाटचाल काहीशी खडतरच वाटतेय. कारण स्वतःची शेतकरी संघटना काढायची म्हटली तरी नेमके किती कार्यकर्ते सोबत येणार याचा अजूनही त्यांना स्वत:लाही काहीच अंदाज नाही. समजा, संघटना काढायचा पर्याय बारगळला तर सदाभाऊंसमोर भाजपमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय नाही.

तसंही विधान परिषदेची आमदारकी त्यांना भाजपनंच देऊ केलेली आहे. सदाभाऊंनी भाजपात अधिकृत प्रवेश केला, भाजपसाठी ते सध्यातरी फायदेशीरच आहे. कारण त्यांना 'रेडिमेड' शेतकरी नेता मिळणार आहे. राजू शेट्टींच्या विरोधात भाजपकडून त्यांचा खुबीनं वापर केला जाऊ शकतो... पण चिंता एवढीच आहे की सदाभाऊंचाही पुढे जाऊन पाशा पटेल झाला नाही म्हणजे मिळवली. कारण सद्यस्थितीत तरी सदाभाऊंकडे हक्काचा असा कोणताच मतदारसंघ नाही. जर समजा भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीत सदाभाऊंना राजू शेट्टींच्या विरोधात उमेदवारी दिली तरी ती निवडणूक सदाभाऊंसाठी नक्कीच सोपी नसणार आहे.

कारण तसंही राजू शेट्टींनी जयंत पाटलांशी जुळवून घेतलेलं आहेच आणि कोल्हापुरात तीन विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेच्या ताब्यातले आहेत. कदाचित म्हणूनच राजू शेट्टींनी भाजपला शह देण्यासाठी आतापासूनच 'मातोश्री'शी व्यवस्थित सूत जुळवून घेतलेलं आहे. राहता राहिला इस्लामपूर नगरपालिकेचा प्रश्न तर तिथं निवडून आलेले पदाधिकारीही बऱ्यापैकी स्वयंभू आहेत. एकूणच सदाभाऊंसाठी आगामी राजकीय वाटचाल म्हणावी तितकी सोपी नक्कीच नाही.

(जाता जाता...)

सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्यासोबतचा फोटो मोठ्या दिमाखात बंगल्यावर लावला होता. आणि 'त्रिमूर्ती' फोटोची कॅप्शन होती, 'ही दोस्ती तुटायची नाय'... पण आता स्वतः राजू शेट्टींनीच सदाभाऊंची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानं सदाभाऊ आता या फोटोचं काय करणार? असा प्रश्न स्वाभिमानीच्या भाबड्या कार्यकर्त्यांना पडलाय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2017 05:56 PM IST

ताज्या बातम्या