'पक्के पुणेरी' मंगेश तेंडुलकर यांची चटका लावणारी एक्झिट

'पक्के पुणेरी' मंगेश तेंडुलकर यांची चटका लावणारी एक्झिट

स्वतः च्या मृत्यकडेही निर्लेपपणे पाहणारे आणि स्वभावात खोडकर, मिश्कील, रेवडी उडवणारे तेंडुलकर स्वर्गलोकातही हास्याचे फवारे उडवतील आणि मृत्यूपश्चातही जगण्याची, आयुष्याची मौज, आनंद लुटतील यात शंका नाही

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे

श्रेष्ठ नाटककार, साहित्यिक विजय तेंडुलकर, सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सुरेश तेंडुलकर, उत्तम अभिनेत्री प्रिया तेंडुलकर अशा हरहुन्नरी तेंडुलकर घराण्यातील असलेले पण स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवलेले व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर गेल्याची बातमी आली आणि सगळेच हळहळले. उंचापुरा बांधा, पांढरी दाढी, नेहमी बाईकवरून फिरणारे असं रूपडं असलेले तेंडुलकर पुण्यात अनेक सार्वजनिक कामात हटकून दिसायचे. नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचं परीक्षण असो किंवा राजकीय,सामाजिक विषयावर काढलेलं व्यंगचित्र असो तेंडुलकर यांचं खास शैलीतील भाष्य लक्ष वेधून घ्यायची.

पुण्याची वाहतूक समस्या,पर्यवरणाचा प्रश्न हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. पण केवळ व्यंगचित्र काढून, ब्रश आणि शब्दाचे फटकारे मारून तेंडुलकर स्वस्थ बसले नाहीत. ते भूमिका घ्यायचे. सार्वजनिक जीवनातला त्यांचा उत्साही सक्रिय सहभाग लक्षणीय ठरायचा. त्यांचा स्वभाव हा टपली मारणारा, हसत हसत दुसऱ्याची टोपी उडवणारा होता, आयुष्य ही मोठी मौज आहे आणि जगण्यातील आनंद आपण पुरेपूर लुटतो हे त्यांचं साधं सोपं तत्वज्ञान होतं. अत्यंत मृदुभाषी, आवाजात मार्दव असलेले तेंडुलकर हे कधीच कर्कश, आक्रस्ताळे वागले नाहीत, त्यांची रेषा ही त्यांच्याप्रमाणेच भारदस्त हास्याचे फवारे, विनोदाचे शिडकावे उडवणारी होती. ती कधी उग्र बोचकारे अथवा ओरखाडे काढणारी नव्हती.

पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात पीएमटीचं नामकरण त्यांनी पुणे मृत्यलोक ट्रान्स्पोर्ट असं केलं होतं. असं असलं तरी आणि याच पीएमटी किंवा आताच्या पीएमटीच्या कारभाराबाबत तेंडुलकरांनी ब्रशने फटकारे मारले असले तरी दरवर्षी दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेला ते न चुकता वयाच्या सत्तरीतही कर्वे रोडवरील नळस्टॉप चौकात भर उन्हात उभे राहून शुभेच्छा पत्रांचं वाटप करून वाहतूक नियमांविषयी जनजागृती करायचे. पुणे वाहतूक पोलिसांसोबतही तेंडुलकरांनी कार्टून्सद्वारे जनजागृतीच्या अनेक मोहिमा राबवल्या म्हणूनच तेंडुलकरांना अखेरचा निरोप द्यायला वैंकुठात राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील मंडळींसोबत पोलीस कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

दर 3 महिन्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात आपल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन ते भरवायचे, त्यात दरवेळी 15 ते 20 व्यंगचित्रे ही नवी ताजीतवानी आणि तजेलदार असायची.

व्यंगचित्र कार्यशाळा असो वा आर. के. लक्ष्मण यांच्यासारख्या व्यंगचित्रकाराला श्रद्धांजली कार्यक्रमाला तेंडुलकर आवर्जून व्यंगचित्र काढायचं प्रात्यक्षिक दाखवायचे, न थकता दर्दी प्रेक्षकांना त्यांचं अर्कचित्र काढून द्यायचे. मिश्कील स्वभाव, अचाट विनोद बुद्धी, अफाट निरीक्षण शक्ती, खुसखुशीत शैली ही तेंडुलकरांची वैशिष्ट्ये होती. वयाच्या पंचाहत्तरीतही ते सतत व्यग्र असायचे, अखंड कार्यरत असण्याचं कारण म्हणजे विनोदाचं टॉनिक. जीवनाकडे विनोदी अंगाने, खेळकर दृष्टिकोनातून पाहण्याची वृत्ती यामुळे ते सदैव उत्साही, टवटवीत, ताजेतवाने असत. नवीन नाटक असो वा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा पुण्याच्या नागरी समस्येबाबतचं आंदोलन, परिसंवाद यामधून तेंडुलकर यांची हजेरी ही असणारच. तुमची हजेरी नाही तर गैरहजेरीही जाणवली पाहिजे असं म्हणणाऱ्या मंगेश तेंडुलकर यांची गैरहजेरी पुणेकरांना यापुढे नक्कीच जाणवणार आहे.

हॅलो, मी मंगेश तेंडुलकर बोलतोय, बालगंधर्व रंगमंदिरात माझं प्रदर्शन लागलंय, तुम्ही या वाट पाहतोय, असा फोन आता येणार नाही पण तेंडुलकर त्यांच्या खळखळून हसवणाऱ्या व्यंगचित्रांमुळे कायम स्मरणात राहतील. स्वतः च्या मृत्यकडेही निर्लेपपणे पाहणारे आणि स्वभावात खोडकर, मिश्कील, रेवडी उडवणारे तेंडुलकर स्वर्गलोकातही हास्याचे फवारे उडवतील आणि मृत्यूपश्चातही जगण्याची, आयुष्याची मौज, आनंद लुटतील यात शंका नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2017 05:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading