राष्ट्रपतीपदाचे ‘राम’नाथ

राष्ट्रपतीपदाचे ‘राम’नाथ

आतापर्यंत भाजपची प्रतिमा ही ब्राम्हणांचा पक्ष अशाप्रकारची होती. जेव्हा याच पक्षातून पंतप्रधान हे एका मागासवर्गातून निवडले जातात. त्यातच याच पक्षाकडून आता दलित समाजातील कार्यकर्त्याला थेट राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाते. त्यावरून भाजप आता हे दाखवण्याचा प्रयत्न करतंय की, हा पक्ष आता केवळ ब्राम्हणांचा राहिलेला नाही.

  • Share this:

राजेंद्र हुंजे, न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत

देशाचा 14 वा राष्ट्रपती कोण होणार याची उत्सुकता गेल्या आठवड्यात सगळ्यांनाच लागून राहिली होती. पण अखेर एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बिहारचे राज्यपाल आणि उत्तरप्रदेशचे सुपुत्र रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर केलं.सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामनाथ यांचं नाव निवडताना भाजपनं नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार केला असेल? हे नाव ठरवताना या सगळ्या नेत्यांचं नेमकं कोणत्या बाबींवर एकमत झालं असेल? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात पडले असतील. रामनाथ कोविंद यांचं नाव ठरवताना भाजपनं एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या नावावर सर्वपक्षीय एकमत व्हावं म्हणून भाजपनं अरुण जेटली, राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू यांची त्रिसदस्यी समिती नेमली. ही समिती केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलून त्यांची जे कुठलं नाव राष्ट्रपतीपदासाठी ठरलं जाईल, त्यावर एकमत व्हावं म्हणून विरोधकांशी बोलून त्यांचा अंदाज घेण्यासाठी हे तिघेजण सोनिया गांधींपासून ते कम्युनिस्ट नेत्यांपर्यंत सगळ्यांना भेटत होते. पण कोणतं नाव याची कुठलीच चर्चा ना एनडीएकडे होती ना विरोधकांनी कुठल्या एका नावावर चर्चा केली होती. या भेटीगाठी केवळ विरोधकांचा अंदाज घेण्यासाठीच होत्या हे स्पष्ट होतं.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी एनडीएला 20 हजार मतांची गरज लागणार होती.ती मतं त्यांना शिवसेनेकडून अपेक्षित होती. विशेष म्हणजे शिवसेना एनडीएचा एक घटक पक्ष आहे. पण गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या घडामोडी पाहता या दोन्ही पक्षातले संबंध चांगलेच ताणले गेले होते. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी गुगली म्हणून सेनेनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यानंतर ऐनवेळी त्यांनी कृषीतज्ज्ञ डॉ. एम एस स्वामिनाथन यांचं नाव पुढे केलं. त्या दरम्यान भाजपाध्यक्ष अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर होते. त्याचवेळी नावाच्या बाबतीत उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची बैठक झाली.त्यात यावर चर्चाही झाली. त्यातही शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम होती ती म्हणजे भागवत किंवा स्वामिनाथन या नावावर...परंतु, 2007 आणि 2012 साली सेनेनं एनडीएसोबत राहूनदेखील काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. 2007 साली प्रतिभा पाटील या मराठी महिला म्हणून मराठी अस्मितेच्या नावाखाली त्यांनी आपलं संख्याबळ त्यांच्या पदरात टाकलं होतं. तर 2012 साली पवारांनी बाळासाहेबांसोबत शिष्टाई करून सेनेची मतं प्रणब मुखर्जी यांच्या पारड्यात टाकली होती. त्यामुळे भाजपला सेना कधीही दगा देईल याचा अंदाज होताच. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यावधी निवडणुकीसाठी भाजप तयार असल्याचा बाण हवेत सोडून दिला. पण त्यानंतर अमित शहांनी शक्यता फेटाळून लावली खरी. पण त्यांनीही झाल्याच निवडणुका तर आम्ही लढू आणि जिंकू दर्पोक्तीही केली. म्हणजे पुन्हा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न भाजपाध्यक्षांनी अप्रत्यक्षपणे केला.

शिवसेना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कधीही भाजपसोबत धक्कातंत्राचा वापर करू शकते याचा अंदाज असल्याने भाजपनं त्यांची जुळवाजुळव सुरुच ठेवली होती. तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस आणि अण्णा द्रमूकचे दोन गट, बिजू जनता दलाचा पाठिंबा मिळाल्यानंतर हलकं असलेलं एनडीएचं पारडं अचानक जड होऊन एका बाजूला झुकलं. त्यानंतर शिवसेनेच्या मतांचं महत्व अगदीच शून्य झालं.त्यामुळे रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर झाल्यानंतर आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत असं म्हणत कोविंद यांना पाठिंबा जाहीर करावा लागला. या सगळ्या राजकीय घडामोडीत शिवसेनेनं उपसलेली तलवार मात्र, भाजपनं केलेल्या खेळीमुळे त्यांना म्यान करून ठेवावी लागली. पण शेवटी काय त्यांच्या पदरात नामुष्कीच पडली ना!

सत्तेची तीन वर्ष पूर्ण करत असताना रामनाथ कोविंद याच्या नावाची गुगली टाकून सत्ताकारणचा नवा गिअर टाकला.काँग्रेस वगळता इतर काही विरोधी पक्षांकडून त्यांना मिळालेला पाठिंबा पाहता, भविष्यातलं राजकारण कसं बदलतंय याचे ते संकेत मानायचे का? दुसऱ्याबाजूला जीएसटीवर वारंवार टीका करूनही काँग्रेस समोर रामनाथ कोविंद यांचं नाव ठेवून भाजपाने धोबीपछाड दिली. शिवाय जीएसटीची अंमलबजावणी करत असल्याचे संकेत देत आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग जगताला आणि गुंतवणूकदारांना भारतात येण्यासाठी खुले संकेतही दिले.

पाकिस्तानविरूद्ध मोदींनी घेतलेली भूमिका, गोमांस आणि गोरक्षकाच्या बाबतीत सरकार जी पावलं उचलतंय याचंच धुव्रीकरण करत, त्यांनी स्वतःची प्रतिमा हिंदू हृदयसम्राट अशी करून घेतली.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांचं ऐकणारा उमेदवार त्यांना द्यायचा होता, त्यात त्यांनी रामनाथ कोविंद यांचं नाव देऊन पहिलं पाऊल टाकलंय.केवळ मोदींनाच हवं होतं असं नाही, तर संघालाही त्यांची हिंदू राष्ट्राची भूमिका ठामपणे मांडू शकणारा नेता हवा होता. रामनाथ कोविंद हे संघाच्या शाखेतच घडलेले स्वयंसेवक आहेत.त्यामुळं संघाला जे अपेक्षित आहे, ते रामनाथ कोविंद करू शकतील, असं संघाच्या नेत्यांनाही वाटतंय. त्यामुळं मोदी संघाचं ऐकत नाहीत, असं म्हणायला आता इथं मोदींनी अजिबात वाव ठेवला नाही.हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचा प्रचार रामनाथ कोविंद राष्ट्रपतीपदावर राहून करू शकतात, असं संघाला वाटू लागलं आहे. शिवाय संघाच्या मुशीत तयार झालेला शांत स्वभावाचा उमेदवार देऊन राष्ट्रपती पदाला संघाला आवडेल असा उमेदवार मोदींनी दिलाय असं सांगितलं जातंय.

बिहारचे राज्यपाल म्हणून काम करत असताना त्यांनी ज्याप्रकारे तिथली प्रकरणं हाताळली, बिहार सरकारशी त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे उत्तम संवाद साधला होता. त्यांच्या या कामाची बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी प्रशंसा करत त्यांच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक केलं. विशेष म्हणजे एकेकाळी एनडीएचे घटक पक्ष असताना चांगले मित्र असलेले मोदी आणि नितीशकुमार यांच्या गेल्या काही वर्षात विस्तवही जात नव्हता. पण रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांचे सूत जुळतात की काय, असं चित्र दिसू लागलंय. त्यामुळे कोविंद यांचं नाव जाहीर करत असतानाच मोदींनी त्यांचे राजकीय विरोधक आपल्याकडे आकर्षित करण्यात एक पाऊल पुढं टाकलंय.

रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर विरोधकांमध्ये गोंधळ झाला नसता तरच नवल! कोविंद यांच्या उमेदवारीनंतर विरोधकांमध्ये दुफळी पाडण्यात भाजपला यश मिळालं. याउपरही कोविंद यांच्याविरोधात एखादा विरोधी उमेदवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत असणार यात दुमत नाही. पण तो दुभंगलेल्या विरोधी पक्षांचा उमेदवार असेल.आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांमध्ये मोदींनी दुफळी पाडली हे स्पष्ट दिसतंय. जर हाच विरोधीपक्ष एक राहिला असता तर, राष्ट्रपतीपदाची निवडणूकच काय तर 2019 ची लोकसभा निवडणूकही भाजपला भारी पडली असती. पण आता त्याची शक्यता थोडी धुसर झालेली दिसतेय.

रामनाथ कोविंद हे दलित समाजाचे आहेत, विशेषतः ते उत्तरप्रदेशमधील असल्याने त्याला एक वेगळं महत्व आहे.रोहित वेमुला, हरियाणातील उना आणि सहारनपूर इथल्या घटना पाहता, देशात दलितांवरील अत्याचार होत असल्याची तीव्र भावना सरकारविरोधात उमटलेली होतीच. शिवाय 2014 च्या निवडणुकीत दलित मतांकडे फारसं गांभीर्याने न पाहिलेली भाजप आता याबाबत जागी झालीय. कदाचित त्यामुळेच राष्ट्रपतीपदासाठी दलित चेहरा देण्याचा प्रयत्न भाजपनं केला आहे. कोविंद हे कोळी समाजासारख्या एका छोट्या समुदायाचं प्रतिनिधित्व करतात.

आतापर्यंत भाजपची प्रतिमा ही ब्राम्हणांचा पक्ष अशाप्रकारची होती. जेव्हा याच पक्षातून पंतप्रधान हे एका मागासवर्गातून निवडले जातात. त्यातच याच पक्षाकडून आता दलित समाजातील कार्यकर्त्याला थेट राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाते. त्यावरून भाजप आता हे दाखवण्याचा प्रयत्न करतंय की, हा पक्ष आता केवळ ब्राम्हणांचा राहिलेला नाही. कदाचित त्यांना असं वाटतंय की, त्यांच्या या भूमिकेमुळे 2019 च्या निवडणुकीत याचा फायदा पक्षाला होईल. पण, जर असा विचार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्षानं केला नसता, तर केवळ उत्तरप्रदेशातच दलितांसोबत मुस्लिमांचीही तब्बल 34 टक्के मतं भाजपच्या विरोधात गेली असती. याचा अंदाज त्यांना आला असावा, म्हणूनच त्यांच्याकडून अशाप्रकारे रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा करून एका दगडात अनेक पक्षी मारण्याची अनोखी शक्कल वापरली गेली.

 

 

First published: June 21, 2017, 11:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading