तामिळनाडूत आता 'रजनी'राज!

तामिळनाडूत आता 'रजनी'राज!

सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केलाय. स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा रजनीकांत यांनी केलीय.त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात आता नव्या पर्वाला सुरुवात झालीय.

  • Share this:

प्रसाद काथे, Prasad Kathe , संपादक, न्यूज18लोकमत

सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केलाय. स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याची घोषणा रजनीकांत यांनी केलीय.त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात आता नव्या पर्वाला सुरुवात झालीय.

तो राजकारणात आलाय. त्याच्या नुसत्या बघण्यानं ज्यांचं देहभान हरपून जातं तो थलैवा अर्थात बॉस, नेता रजनीकांत आता राजकारणात प्रवेश करणार आहे. तामिळी जनतेच्या अम्मा, जे जयललिता यांच्या निधनानंतर तिथं व्यक्तीकेंद्रित राजकारणात पोकळी निर्माण झालीय. ही पोकळी एक नवी संधी आहे हे अचूक ओळखण्याचं कौशल्य रजनीकांत यांनी दाखवलंय.

गेल्या महिन्याभरापासून रजनीकांत राजकारणात येणार की नाही याची चर्चा गावात होती. खरंतर तशी चर्चा आजवर अनेकदा झालीय. पण, यावेळी दस्तुरखुद्द रजनीकांत यांनी शक्याशक्यतांना बळ दिले आणि माहौल बदलून गेला. या निर्णयाची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं. दक्षिणेतील आणखी एक अभिनेते कमल हासन यांनी राजकारण नको असा सल्ला रजनीकांत यांना देऊन पाहिला. रजनी यांच्या चाहत्यांनाही आधी आपल्या बॉसने राजकारण करावं असं वाटलं नव्हतं. पण आता निर्णय झालाय. बॉस आता MLA व्हायला निघालाय.

दक्षिणेत, तामिळनाडूत राजकारण व्यक्तीकेंद्रित, पूजनीय चेहऱ्याच्या अवती भवती फिरत असतं. यात सिनेमा इतकं नाट्य आहे आणि तितकेच रागलोभ. राजकारणाच्या दक्षिणी छटा कधी इतक्या खुनशी असतात की त्या भर विधानसभेत अम्माच्या पदराला हात घालतात आणि  कधी पाऊणशेहून जास्त वयमान असलेल्या करुणानिधी नावाच्या म्हाताऱ्या राजकारण्याची पोलिसांकरवी गठडी वळू शकतात. आपल्या लाडक्या व्यक्तित्वाला अशा काही घटनेला सामोरं जावं लागू नये म्हणूनचा तो हट्ट असावा. पण, परिस्थितीचे फासे आता पडले आहेत.

दक्षिणेत रजनी नावाचं गारुड आहे. तिथल्या राजकारणाला आता त्याची गरज आहे. जयललितांच्या निधनानंतर तिथल्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालीये. अण्णा द्रमुक सत्तेत आहे पण पक्षात दुफळी माजलीये. जयललितांच्या तोडीचा नेता सध्यातरी अण्णा द्रमुकत नाहीये. द्रमुकचा विचार केला तर 2011 पासून तो पक्ष सत्तेत नाही.  करुणानिधांची दोन मुलं स्टालिन आणि अळगिरींचं अजिबात पटत नाही. स्वतः करुणानिधींचं वय 93 आहे, दैनंदिन राजकारणात ते फारसे सक्रिय नसतात. काँग्रेस आणि भाजपचं अस्तित्व तर आधीपासून नगण्यच आहे. अभिनेते कॅप्टन विजयकांत यांच्या पक्षाचाही फारसा प्रभाव नाहीय.

MGR आणि जयललिता यांच्यानंतर निर्माण झालेल्या जागेची भरपाई करायला हे गारुड उपयोगी पडेल असा पॉलिटिकल नियोजकांचा होरा आहे. कारण, या घटनेमागची सूत्र तामिळनाडूपेक्षा दूरवरून हलत आहेत हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नाही. भाषिक अस्मितेबाबत कायम कडवट असलेल्या आणि प्रभू रामाच्या पदस्पर्शानंतरही गंगा-जमनी तहजीबचा प्रभाव हाणून पडलेल्या या राज्यात आपलं अस्तित्व अजून शून्य आहे ही गोष्ट राजकारणातल्या सध्याच्या प्रभावी गटाला खुपत असणारच. त्यातच, द्रमुक गटाच्या परिवाराचं अहिंदू असणं आणि त्यांच्या प्रभावाची प्रसरण नापसंत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

अशा पार्श्वभूमीवर कोणे एकेकाळी कोल्हापुरात बस कंडक्टर राहिलेला मूळचा रजनीकांत गायकवाड आणि आता द बॉस असलेला रजनी नावाचा ऑनस्क्रीन जादूगार, राजकारणी होऊ धजावतोय. रजनीच्या सिनेमात प्रश्नांची उत्तरं जितकी सहज सापडतात तितकं सहज राजकारणात बे एके बे नसतं. चित्रपटसृष्टीतली कारकीर्द उतरणीला लागलेल्या रजनीने हे ओळखूनच जनमानसाचा ध्यास घ्यायचं ठरवलं असेल. अशात, चित्रपट चालला नाही तर निर्मात्यांना पैसे परत करणारा हा थलैवा राजकारणाचे छक्के-पंजे कितपत जमवू पाहतो याकडे सगळ्यांचं लक्ष नक्की असेल. अगदी दिल्लीश्वरांचंही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2017 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading