S M L

#पेनकिलर : देसाई जात्यात...मेहता जात्यातून सुपात..

अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विरोधी पक्षांनी बदललेल्या रणनीतीमुळे प्रकाश मेहता सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचाही दबाव कमी झालाय तर सुभाष देसाई आणि शिवसेनेवर तो अधिक वाढला आहे.

Chandrakant Funde | Updated On: Aug 10, 2017 03:24 PM IST

#पेनकिलर : देसाई जात्यात...मेहता जात्यातून सुपात..

रफिक मुल्ला, विशेष प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाचा दिवस सरकारसाठी वेगळे आव्हान घेऊन आला होता, पण हा दिवस सुरळीत पार पडला आणि सरकारने सुटकेचा श्वास सोडला, पण अधिवेशनाचे राहिलेले दिवस सर्काररसाठी कठीण आहेत कारण एकीकडे कामकाज खूप राहिले आहे तर दुसरीकडे सुभाष देसाई आणि प्रकाश मेहता त्यांचे घोटाळ्याच्या आरोपात राजीनामे मागितले जात आहेत, आणि या मागणीसाठी विरोधक आक्रमक आहेत, त्यातल्या त्यात सुभाष देसाईंचे प्रकरण विरोधकांनी अधिक लावून धरायचे ठरवले आहे, त्यामुळे स्वाभाविक प्रकाश मेहता यांची एकप्रकारे सुटकाच होताना दिसते आहे. मुख्यमंत्री मेहतावर कारवाई करणार नाहीत, किंबहुना सभागृहात मुख्यमंत्र्यांनी मेहता यांनी भ्रष्टाचार केला नाही, अशी स्पष्ट भूमिका घेऊन अभय दिले, मुख्यमंत्री मेहतावर कारवाई करणार नाहीत हा अंदाज घेऊन विरोधी पक्षांनी आता देसाई यांच्याकडे आपला मोर्चा वळवलाय. अधिवेशन संपेपर्यंत हा विषय विरोधक जोरकसपणे लावून धरतील, तसे विरोधी पक्षांचे नियोजन आहे.

सुभाष देसाईंचे प्रकरण नाट्यमयरित्या पुढे आले, खरे तर विधान परिषदेत गेल्या आठवड्यात शुक्रवारी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ते प्रकरण बाहेर काढले, तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली, आणि विधानसभेत विरोधकांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहताना काहिसे बाजूला ठेवत उद्योगमंत्री सुभाष देसाईंना निशाण्यावर घेतले. देसाईंनी 60 हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप करत SIT मार्फत चौकशीची मागणी केलीय, त्यामुळे गेले दोन आठवडे निवांत आणि तटस्थ असलेल्या शिवसेनेला जोरदार दणका बसलाय, त्यात सोमवारी 'सामना'मध्ये अग्रलेख लिहून प्रकाश मेहता यांच्यावर झालेल्या आरोपावर कडवी टीका केली. भाजपला भ्रष्टाचारी ठरवण्याची आयती संधी घेणाऱ्या शिवसेनेच्या मदतीला कुणीच धावले नाही, याउलट सर्व पक्ष एकत्रित येऊन शिवसेनेला घेरण्याच्या प्रयत्नात आहेत. असंच काहिसं चित्र दिवसभर पाहायला मिळाले.

गेल्या बुधवारपासून पुढचे तीन दिवस एसआरए घोटाळ्यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी करणाऱ्या विरोधकांनी मंगळवारी अचानक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर हल्ला चढवला, हा हल्ला खरंतर पूर्वनियोजित होता मात्र शिवसेना गाफील असल्याने हा हल्ला त्यांना चांगलाच जिव्हारी बसला, त्यात देसाईंनी पक्षांतर्गत अनेक 'उद्योग' केल्याने पक्षाचे इतर नेतेसुद्धा मदतीला धावले नाहीत, 'मातोश्री'वरून साथ देण्याचा आदेश आल्यावर पक्षाचे इतर नेते आणि मंत्री सोबतीला आले, आणि देसाईंची थोडीफार बाजू सांभाळली गेली, त्यांनी थेट आरोप केला की मागच्या सरकारच्या काळात उद्योगमंत्री असलेल्या नारायण राणे आणि राजेंद्र दर्डा यांनी अशाचप्रकारे निर्णय घेतले होते, विधानपरिषदेत मात्र विरोधक अधिक आक्रमक होते, त्यांचा खुलासा सुरु असतानाच सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले गेले.

Loading...
Loading...

एरव्ही सुभाष देसाई माध्यमांशीही फटकून वागतात, आता मात्र तेच देसाई विधिमंडळात लागलेल्या मीडिया स्टॅन्ड कडे येतात, सभागृहात बाजू मांडता आली नाही म्हणून तुमच्याकडे आलो असे म्हणणारे देसाई कधी ना सरकार म्हणून ना स्वतःच्या खात्याची अशी कधीही बाजू मांडताना दिसले नाहीत, काही देणे घेणे नसल्यासारखे, अनेकदा पत्रकारांनी सहज माहिती म्हणून विचारलेल्या प्रश्नांची कुजकी उत्तर देण्याचा त्यांचा स्वभाव पाहता कुणी त्यांच्याशी चर्चाही करत नाही, आपल्या तंद्रीत राहणारे देसाई यावेळी मात्र खुलासा करत फिरत होते, एमआयडीसीची जमीन परत मालकांना देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन केला नव्हता, आरोप झाल्यावर मात्र मुख्यमंत्र्यांकडे जाऊन देसाईंनी बाजू मांडली, तुम्ही सभागृहत खुलासा करा, या व्यतिरिक्त त्यांनी देसाईंना फार दिलासा दिला नाही.

विरोधकांनी देसाई यांचा मुलगा या सर्व उद्योगात भागीदार असल्याचा आरोप मंत्री महोदयांना अधिक घायाळ करून गेला, एकूण आरोप असे आहेत की उद्योगमंत्र्यांनी नाशिक येथील 14 हजारातून 12 हजार एकर जमीन वगळली, स्वस्तिक डेव्हलपर हे शेतकरी दाखवण्यात आले, तसेच राज्यभरात 31 हजार 50 एकर जमीन एमआयडीसीतून बेकायदा पद्धतीने वगळली, असा सुद्धा आरोप करण्यात आला आहे. यावर आता अधिवेशनात विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. नाही म्हणायला विरोधी पक्षांनी सुरवातीला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी एसआरए घोटाळा आणि कुटुंबावर झालेले आरोप आणि केलेला खुलासा खोटा असल्याचा दावा केला आणि त्यांच्या राजीनामयची मागणी केली, पण त्यात जोर नव्हता. देसाई यांच्यावर मात्र सर्वजण तुटून पडले. तसेच गोंधळामुळे कामकाज अनेकदा तहकूब झाल्यावर विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे दिले आणि सरकार चोर असल्याच्या घोषणाही दिल्या. देसाईंनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.

अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विरोधी पक्षांनी बदललेल्या रणनीतीमुळे प्रकाश मेहता सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचाही दबाव कमी झालाय तर सुभाष देसाई आणि शिवसेनेवर तो अधिक वाढला आहे, अधिवेशनाच्या राहिलेल्या तीन दिवसात देसाई आणि पर्यायाने शिवसेनेवरचा हा दबाव वाढत जाईल, कारण सर्वांनी मिळून अखेर शिवसेनेला घेरायचे ठरवलेले दिसते आहे. आता दागी मंत्र्यांवर काही कारवाई होईल, अशी शक्यता नाही, मात्र मेहता जात्यातून पुन्हा सुपात परतलेत, याउलट देसाई थेट जात्यात अडकलेत, यावरून राजकारणाची नवी दिशा समजते, आणि ही दिशा देणारे मुख्यमंत्री तर नाहीत ना...असा प्रश्न विचारत विधिमंडळ परिसरात आतल्या राजकारणाची चर्चा रंगताना दिसते आहे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2017 03:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close