नागपूर बोट दुर्घटना : नेमकं काय घडलं ?

नागपूर बोट दुर्घटना : नेमकं काय घडलं ?

अमरावती मार्गावरील वेणा जलाशयाजवळच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ रविवारी संध्याकाळी ओवरलोडेड बोट बुडाल्याने अकरा युवक बुडाले. त्यातील आठ जणांचा मत्यू झाला तर तीन जण पोहत बाहेर आल्यामुळे त्यांचे जीव वाचले.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी, नागपूर

अमरावती मार्गावरील वेणा जलाशयाजवळच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ रविवारी संध्याकाळी ओवरलोडेड बोट बुडाल्याने अकरा युवक बुडाले. त्यातील आठ जणांचा मत्यू झाला तर तीन  जण पोहत बाहेर आल्यामुळे त्यांचे जीव वाचले. या अकरा जणांपैकी ८ जण या ठिकाणी पार्टी करण्यासाठी आले होते तर तीन जण बोट चालवणाऱ्या नाविकाचे मित्र होते. पण बोट पाण्याच्या मधोमध गेल्यावर पार्टीकरणाऱ्या आठही जणांनी सेल्फी काढणे सुरु केले आणि त्यातच पंकज डोईफोडे याने तर बोटीतून फेसबुक लाईव्ह व्हिडिओ सुरु केला .

बोटीतील या सर्व लोकांचा धिंगाणा पंकज नेरकर नावाचा या युवकांचा मित्र आपल्या घरी फेसबुकवर पाहत होता. त्याने या लोकांना धोक्याची सूचना दिली पण शेवटी नाव उलटली आणि त्यात आठ जणांचा मृत्यू झाला.

नागपूरच्या  अमरावती रोडवरील सिटीलाईन हाॅस्पिटलचे काही कर्मचाऱ्यांनी सण्डे पार्टीचा बेत आखला आणि त्यात आपल्या इतर मित्रांनाही बोलावून घेतले. अंकित भोसेकर, परेश काटोके, अतुल भोयर, पंकड डोईफोडे, प्रतीक आमडे, रोशन खांदारे, अक्षय खांदारे हे सर्व मित्र वेणा जलाशयावर आले. यातच एका विद्यार्थ्याचा वाढदिवस असल्यामुळे वेणा जलाशयाच्या ठिकाणी हे सर्व जण मद्य पिऊन कार आणि बाईक्सने पोहचले आणि पंधराशे रुपये देऊन त्यांनी नावाडी अतुल बावणे आणि त्याचे दोन मित्र रोशन दोडके आणि अमोल दोडके यांच्याकडून एक बोट भाड्याने घेतली.

बोट जलाशयाच्या मधोमध गेल्यावर पंकड डोईफोडे याने तर फेसबुक लाईव्ह सुरु करून आपल्या फेसबुक मित्रांसोबत तीन मिनिटे संवाद साधला. साडेसातच्या सुमारास बोट पाण्यात बुडाली आणि फेसबुकवरील बाय आयुष्याचा निरोप घेणारा ठरला. यातच अतुल बावणे आणि त्याचे दोन मित्र रोशन दोडके आणि अमोल दोडके यांना पोहता येत असल्यामुळे ते किनाऱ्यावर पोहत आले आणि त्यांचा जीव वाचला पण इतरांच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं.

या घटनेनंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत ज्यात या जलाशयाच्या ठिकाणी  बोटिंगला परवानगी नसताना या ठिकाणी  गेले अनेक वर्षांपासून बोट कशी काय चालवली जात होती? गेल्या एक वर्षात या ठिकाणी चार अपघात होऊनसुद्धा अशा अपघातांच्या संदर्भात काळजी घेण्याची कुणी तसदी घेतली नाही यावरही अनेक प्रश्नचिन्ह  उपस्थित केले जाताहेत.

पण या घटनेनंतर संपूर्ण नागपूरवरच शोककळा पसरली आहे तर खासकरून दक्षिण नागपूरातील  उदय नगर, जुना सुभेदार परिसरात नागरिकांना जास्त दु:ख झालं, कारण त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेली आठ मुले या अपघातात मृत्युमुखी पडली आहेत.

त्यातच  दिवे आणि मातीच्या आकर्षक वस्तू तयार करण्यासाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील पेठ गावात गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दु:खाची बातमी आली. कुंभारकाम करणाऱ्या मोहन खंदारे यांचा मुलगा अक्षय खंदारे याचा वेणा नदीत बोट उलटून मृत्यू झाल्याची बातमीमुळे गावात स्मशानशांतता परसरली. अक्षयचा मित्र अतुल बावणे याच्या बोलवण्यावरून अक्षय बोटीत बसला आणि  या जगाचा  निरोप घेऊन गेला.  खरं तर वेणा धरणात पिकनिकला आलेल्या ९ मुलांसोबत अक्षयचा कुठलाही संबध नव्हता. अक्षयचा मित्र अतुलच्या सांगण्यावरून तो वेणा धरणावर पोहचला तिथेच या ११ जण बसलेल्या ओवरलोड बोटीत तो बसला. सेल्फीच्या नादात त्याचाही जीव गेला

दरम्यान या वेणा धरणावर बोटिंग करण्याची कुठलीही परवानगी नव्हती तरी या ठिकाणी सर्रास बोटिंग चालायचं. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.  या घटनेनंतर आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचाव कार्य जोरात सुरु आहे. अशा जलाशयांच्या ठिकाणी आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय या घटनेनंतर घेण्यात आला आहे.

दरम्यान चोवीस तासापासून सुरू असलेलं बचाव कार्य आता अंतिम टप्प्यात आले असून दोन मृतदेहांचा शोध घेणे बाकी आहे. या घटनेनंतर सर्व विभागाच्या लोकांनी तत्पर मदत देऊन माणुसकी दाखवली पण अशा घटना रोखणं फक्त सरकारचंच काम नाही तर प्रत्येकानं आपापल्या परीने सुरक्षितता दाखवण्याची गरज आहे.

आपली मुले कुठे जातात, सेल्फीच्या नादात जीव धोक्यात तर टाकत नाहीये ना याची ही काळजी घेणं पालक म्हणून महत्त्वाचे आहे. फेसबुक हे संवादाचे माध्यम आहे. पण फेस टू फेस संवाद वाढवणे गरजेचे असल्याचे या घटनेनंतर मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे तरुणाईच्या फेसाळलेल्या उत्साहालाही वेळीच आवर घालण्याची गरज आहे . नाहीतर मृतांच्या आणि बचावलेल्यांच्या आकड्यांच्या खेळाशिवाय आपल्या हातात काहीही राहणार नाही.​

First published: July 10, 2017, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading