मधू दंडवते यांची भीती खरी ठरली !

मधू दंडवते यांनी रेल्वे मंत्री असताना, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणि भविष्यात दुर्घटना होऊ शकते हे ओळखून परळ आणि एलफिन्स्टन स्टेशन जोडायचे ठरवून त्या जागी पुलाचे काम करण्याचे आदेश दिले. पुलाचे आदेश मधू दंडवते यांच्या कार्यकाळात निघाले. पण, पूल अस्तित्वात आला तेव्हा मंत्री बदलले होते. आज पूल अस्तित्वात आलाय. पण, मधू भाईंची भीती खरी ठरलीय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2017 08:29 PM IST

मधू दंडवते यांची भीती खरी ठरली !

प्रसाद काथे, संपादक, आयबीएन लोकमत

आज जो पूल परळ आणि एल्फिन्स्टन स्टेशनला जोडतोय तो आधी अस्तित्वात नव्हता. त्या ऐवजी परळ स्थानकातून पूर्वेला उतरायचा पादचारी पूल कार्यरत असे. मधू दंडवते यांनी रेल्वे मंत्री असताना, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणि भविष्यात दुर्घटना होऊ शकते हे ओळखून परळ आणि एलफिन्स्टन स्टेशन जोडायचे ठरवून त्या जागी पुलाचे काम करण्याचे आदेश दिले. पुलाचे आदेश मधू दंडवते यांच्या कार्यकाळात निघाले. पण, पूल अस्तित्वात आला तेव्हा मंत्री बदलले होते. आज पूल अस्तित्वात आलाय. पण, मधू भाईंची भीती खरी ठरलीय.

खरंतर, असे मृत्यूचे सापळे अनेक स्टेशन्सवर आहेत. तुम्ही मध्य रेल्वेच्या करिरोड स्टेशनवर उतरा. प्लॅटफॉर्मवरून बाहेर यायला तिथेही एकच मार्ग आहे. ठाण्याच्या दिशेला असलेला बिन पायऱ्यांचा पूल. पश्चिम रेल्वेच्या लोअर परळला परिस्थिती काही वेगळी नव्हती. योगायोगानं तिथं नवा फलाट आला आणि तुलनेनं बिन पायऱ्याच्या पुलाचा ताण कमी झालाय. पण, गम्मत म्हणजे, रेल्वे रूळ ओलांडू नका असं सांगणारे रेल्वे प्रशासन, लोअर परळच्या फलाट क्रमांक १ वर उतरलेल्या प्रवाशांना पश्चिमेला जाताना कारशेडमधले रूळ ओलांडायला लावते.

कुर्ला आणि बांदऱ्याची स्थिती आणखी भयाण आहे. वांद्रे पश्चिमेकडून पूर्वेला जाणार पूल असेल की कुर्ल्याचा मध्य आणि हार्बरला जोडणारा पूल, हे पूल एकापेक्षा अधिक गाड्या स्टेशनात असतील तर असे गच्च होतात की विचारता सोय नसते. या गर्दीच्या ओढ्यात खिसेकापू असोत की छेड काढणारे आपापला कार्यभाग आटोपत असतात. गर्दीत जिथं हलता येत नसेल तिथे प्रवासी प्रतिकार काय करेल? या प्रवाशांना मूग गिळून पुढे पाऊल टाकण्याशिवाय गत्यंतर नाही.

दररोज सुमारे 74 लाख प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करत आहेत. त्यातल्या कुणाला जीवाची शाश्वती रेल्वेनं दिलीय? गेल्या ७-८ वर्षात मध्य मुंबईत गिरण्यांच्या जागी कॉर्पोरेट पार्क आले आणि इथं येणारा कर्मचारी लोंढा अचानक वाढला. गिरण्या असताना पाळी सुटली की, लोअर परळ, करिरोड, महालक्ष्मी ही स्टेशन्स फुलून जायची. आज सकाळी 9 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 7 ही गर्दी या स्टेशन्सला असते. त्यामुळे, इथं धक्काबुक्की रोजचीच. कारण, या रेल्वे स्थानकांच्या नियोजनात दूरदृष्टीचा अभाव आहे. या उलट, प्रशासन जिथून हाकलं जात होतं त्या चर्चगेट आणि जुन्या विक्टोरिया टर्मिनस इथं प्रवाशाला यायला - जायला पहा कशी प्रशस्त जागा आहे.

Loading...

मुळात, मुंबईच्या प्रवाशांची जी वेदना आणि धोके मधूभाईंना लक्षात आले ते नंतर कुणाच्या लक्षात आले नसावेत, हे चिंताजनक आहे. तसं ते होणं शक्य आहे. कारण, मुंबईच्या

रेल्वे प्रशासनात निर्णय घ्यायचा पदावर स्थानिक कुणी नाही. जे आहेत ते उपरे आहेत. त्यांचे क्वार्टर सुरक्षित जागी असतात आणि हे अधिकारी फार दूरवरून प्रवास करताना दिसत नाहीत. जोडीला, रेल्वे नावाच्या अजस्त्र सुस्तावलेल्या अजगररुपी व्यवस्थेचा विळखा त्यांना असतो. यातच, इच्छाशक्तीचा बळी सगळ्यात आधी जातोय.

प्रशासनाला जर इच्छाशक्ती असती तर परळ स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून ठाणे दिशेने पूल सुरू करून तो ठाकरे फुलमार्केटच्या मागे उतरवला जाऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आलं असतं. पण याला आड येत असणार तो मध्य आणि पश्चिम रेल्वेतील हद्द वाद. घनदाट लोकवस्तीच्या मधोमध असलेल्या परळ आणि एल्फिन्स्टन स्टेशन्सवर पोहोचायला अगदी गेल्या 3वर्षापर्यंत लोक सर्रास रूळ ओलांडून जात असायचे. यात अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत किंवा जायबंदी झाले आहेत. पण, प्रशासनाच्या संवेदनाहीन वागण्यापुढे प्रवासी हतबल आहेत. मरायला मजबूर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2017 07:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...