आम्हाला 'हसीना' चालते पण 'पद्मावती' नाही !

जर इतिहास सांगायचा असेल तर तो पुराव्यानिशी सांगितला गेला पाहिजे. पण गोष्ट सांगायची असेल तर त्याला मर्यादेत कसं बसवणार ?, भन्साळींना जे सांगायचं आहे ते सांगू द्या. तुम्हाला पटलं नाही तर चित्रपट पहायला जाऊ नका.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 20, 2017 07:10 PM IST

आम्हाला 'हसीना' चालते पण 'पद्मावती' नाही !

प्रणाली कापसे, प्रतिनिधी

काल मी आणि माझी सहकारी प्रतिनिधी रोहिणी बोलत होतो. खरंतर विषय निघाला तो दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव झाला या बातमीवरुन. ती मला सांगत होती की, त्या भागातल्या लोकांना दाऊदचं काहीच वाटत नाही. दाऊदचे नातेवाईक आणि तो स्वतः याच भागात लहानाचे मोठे झाले त्यामुळे त्यांना इतरांना वाटणारी भिती वाटत नाही. आमच्या पिढीनं दाऊदला पाहिलं नाही. तो भेटला तो चित्रपटातून आणि टी.व्हीच्या बातम्यांमधून.

त्याच्याबद्दलच्या प्रत्येक बातमीसाठी प्रत्येक चॅनेल आजही उत्सुक असतं. या उत्सुकते पोटी आजवर अनेक चित्रपट दाऊद आणि त्याच्या आसपासच्या लोकांवर बनवले गेले आणि ते चाललेही. यावर्षी त्यापैकी एक चित्रपट हसीना पारकर रिलीज झाला. तसाच डॅडी ही रिलीज झाला. मी हे दोन्ही चित्रपट पाहिले नाहीत. पण रोहिणीने मात्र पाहिले आहेत. ती म्हणाली बघ ना या सगळ्या चित्रपटांमध्ये या गुन्हेगारांचा जिवनपट दाखवण्याच्या नावाखाली या लोकांना ग्लॅमराईज केल जातं आणि मुख्य म्हणजे जे जसे वागले त्यासाठी कारणं ही दिली जातात. ज्यामुळे परिस्थिती तशी होती म्हणून ही माणसं अशी वागली याचं समर्थन केलं जातं. मला ही ते पटलं कारण, या पूर्वी आलेले शुट आऊट ऍट लोखंडवाला, शुट आऊट ऍट वडाला हे चित्रपट मी पाहिले होते. या चित्रपटांचा जीवनपट हा फार जुना नाही. हा इतिहास सांगणाऱ्यांपैकी अनेज जण आजही हयात असल्यानं ते या चित्रपटांमध्ये काय असावं असू नये हे जास्त चांगलं समजू शकतं शकतात.

पण बाजीराव मस्तानी किंवा पद्मावती यांचा काळाबद्दल आपण केवळ पुस्तकांमधून,कादंबऱ्यातून ऐकतो वाचतो. खरंतर आता वाचणाऱ्यांचा काळ ही राहिलेला नाही. त्यामुळे किती जणांनी या कादंबऱ्या वाचल्या असतील माहिती नाही. इतिसात तर मुळातच बोर विषय वाटत असल्यामुळे तो कोण वाचणार असं अनेकांचं म्हणणे असतं. पण मग एखादा चित्रपट जेंव्हा अशा विषयावर बनतो तेंव्हा विरोध करणारे अचानक कसे जन्माला येतात हे काही मला कळत नाही. मराठी माणसाला बाजिराव माहिती असले तरी भारतातल्या इतर भागातील लोकांना ते किती माहिती होते.

अटकेपार मराठी साम्राज्याची पताका फडकावणाऱ्य़ा या शुरु, पराक्रमी पेशवा बाजीराव बद्दल फारतर महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पुस्तकात किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित होता. त्यांची ही कथा मर्यादित अर्थाने का असेना जर भारतभर आणि जगभर पसरणार असेल तर आम्हाला त्यात आक्षेप का असावा? तसंच मराठी असल्याकारणामुळे मला आजवर मस्तानी हीच जगातली सर्वात सुंदर स्त्री वाटत आली आहे. कारण ना.सींच्या राऊमध्ये तीचं जे वर्णन वाचलंय इतकं सुंदर वर्णन कुणीही करु शकलं नसेल किंवा केलं असेल तर ते माझ्या वाचनात आलं नसेल. जेंव्हा संजय लीला भंसाळीसारखा एखादा दिगदर्शक एखाद्या विषयावर चित्रपट करु लागतो त्यावेळी उत्सुकतेपोटी आपण गुगल करतो. मग कळतं की कुणी तरी आणखी एखादी राणी इतकी सुंदर होती, जीच्यासाठी- युद्ध झालं आणि तिनं जोहार केला.

Loading...

आपल्या जनरेशच्या किती जणांना जोहार हा शब्द माहिती होता. मराठी माणसाला तो माहिती असेल तर दानापुरता. आता मात्र या मुद्यावरुन रान पेटलंय. बरं ते का? तर आम्हाला असं वाटतं की, तुम्ही नक्कीच काही तरी आक्षेपार्ह्य केले असेल असं म्हणून. भाजपच्या एका मराठी आमदारानं तर पत्रकार परिषद सुद्धा घेवून टाकली. या आमदाराला माझा एक प्रश्न आहे बाजीराव मस्तानी तुम्ही पाहिला नाही का? तुम्ही मराठी आहात त्यावेळी तुम्हाला कुठल्या मुद्यावर आक्षेप घ्यावासा वाटला नाही का? काशीबाई आणि मस्तानी कधीच भेटल्या नसाव्यात असं इतिहास सांगतो. पण भंसाळींनी तर त्यांना एकत्रित पिंगा घालताना दाखवलं. त्यावेळी तुम्ही आक्षेप घेतला नाही? की पेशवे हे ब्राम्हण असल्यामुळे महाराष्ट्रात कुणालाही त्यावर आक्षेप घ्यावासा वाटला नाही? शिवाय मूळ मुद्दा हा की एखादी कलाकृती चांगली की वाईट हे ती बघण्याआधी कशी ठरवली जाऊ शकते?  की निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे उपद््व्याप केले जाताहेत. लेखकांनी कादंबऱ्यांमध्ये प्रेमप्रसंग चितारला की, आपण आपल्या मेंदूत ते चित्र तयार करतो.

त्यामुळेच आपल्याला त्या कलाकृतीचा आस्वाद घेता येतो. हे झालं लिखित माध्यमाचं मग चित्र माध्यमाचं काय? बरं चित्रपटात काम करणारे लोक हे कलाकार आहेत जे केवळ अभिनय करत असतात हे न समजण्यात इतके आपण अजाण आहोत का? रामायण सिरियल सुरू झाली त्यावेळी राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या भूमिका करणाऱ्या कलाकारांचे लोक जाऊन पाय पडायचे कारण त्यावेळी हे माध्यम लोकांना माहिती नव्हतं. पण आता मात्र तशी स्थिती नाही. शिवाय हा एक चित्रपट आहे डाॅक्युमेंटरी नाही. इतिहास सांगणारं पुस्तक आणि कादंबरी यातला फरक जर आपल्याला कळतो तर मग डाॅक्युमेंटरी आणि चित्रपटातला का नाही? एखादं ऐतिहासिक पात्र अमूक एका समाजापूरत मर्यादित कसं असू शकतं. शिवाय त्यांच्यामुळे चुकीचा इतिहास मांडला जाईल असं जर तुम्हाला वाटतं तर हा चित्रपट आहे डाॅक्युमेंटरी नाही हे समजून घ्या.

जसा एख्यादा लेखक स्वत:च्या कल्पकतेनं प्रसंग रंगवतात. तेवढीच सिनेमॅटीक लिबर्टी आपण दिग्दर्शकाला का देवी नये.. त्याचा वाईट परिणाम होईल असं वाटतं तर मग हसिना, डॅडीसारखे चित्रपट येतात त्यावेळी हा विरोध का होत नाही? जे चित्रपट पहायला गेले त्यासगळ्यांना हसिना किंवा डॅडीबद्दल प्रेम होतं म्हणून गेले नाहीत. एखादी चित्रपट पाहाण्याच्या उद्देशाने ते गेले होते. अनेक जण तर फक्त टाईमपास म्हणून  चित्रपट पहातात. मुळात तुमचा विरोध असेल तर चित्रपट न पहाण्याविषयी जनजागृती करा. चित्रपटाला आर्थिक फटका बसू द्या. पण ती कलाकृती दाखवूच नका असं आपण का म्हणतो. कुठल्याही कलाकारांना व्यक्त होण्याचा अधिकार आहे. आपल्याला तो कलाकृती आवडली नाही तर आपल्याला टीका करण्याचा अधिकार आहे. पण ती कलाकृती दाखवूच नका असं म्हणणं अन्याय कारक ठरेल. त्यात आपल्याकडे कुठल्याही गोष्टींची लागण होण्याची फार सवय आहे.

म्हणजे एका गोष्टीला विरोध झाला की सगळे विरोध करणार. एखाद्या सिनेमाला काहींनी डोक्यावर घेतला की मग सगळेच डोक्यावर घेवून नाचतात. मुद्दा इतकाच की, जर इतिहास सांगायचा असेल तर तो पुराव्यानिशी सांगितला गेला पाहिजे. पण गोष्ट सांगायची असेल तर त्याला मर्यादेत कसं बसवणार ?, भन्साळींना जे सांगायचं आहे ते सांगू द्या. तुम्हाला पटलं नाही तर चित्रपट पहायला जाऊ नका. पहायला गेला आणि नाही आवडला तर फालतू म्हणून चार शिव्या घाला. पण विरोध करू नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 06:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...