शब्द अपुरे पडतात तेव्हा...
सगळंच 140 अक्षरांमध्ये कसं सांगणार ट्विटर राव...
ते घाव इतक्या तुटपुंज्या शब्दांत मावणार नाहीत आताशा..
ते घाव त्या निर्भयावर होते...
ते घाव त्या नकोशीवर होते...
ते घाव त्या दामिनीवर होते...
हरयाणातल्या त्या कुमारिकेवर होते...
तर खैरलांजीतल्या प्रियांकावरही केलेले ते निर्घृण घाव होते...
बलात्काराला जात नसते, पण स्त्री ही एकमेव जात उरतेच ना तरीही...
पृथ्वीच्या अंतापर्यंत तरी !
माणुसकी हा चार अक्षरांचा शब्द डिलीट होत चाललाय ट्विटर राव...
तू एकशेचाळीस अक्षरांचं काय घेऊन बसलास?
त्या दामिनी... त्या रागिणी शब्दांनी वार तर करत होत्या
पण अपुरे पडले ते शब्द राक्षसी वासनेपुढे...
एकशेचाळीस अक्षरं लांब राहिली रे ट्विटर राव...
एक हुंदका... तो कसा पोस्ट करू सांग फक्त...
=================================================================================
आवाज पुरोगामी महाराष्ट्राचा !
मग एके दिवशी नरेंद्र दाभोलकरांना मारलं
म्हणजे त्यांचा मर्डर झाला.
त्यानंतर पुरोगामी महाराष्ट्राचा आवाज
म्हणून एकच आवाज झाला.
त्यानंतर वातावरण ढवळून निघालं.
त्यानंतर शोकसभा झाल्या.
निषेधही झाला.
त्यावेळेस श्रावण सुरू होता
त्यामुळे पुरोगामित्व थोडं बॅकसीटला होतं
लोक सणवारात रमले होते
आणि हे मध्येच काय?
आता गणपती येतील
ते दाभोलकर म्हणजे पर्यावरण वाचवणारे
मूर्तीबद्दल काहीतरी सांगणारेच ना हो?
ओह! फार वाईट झालं.
तुमच्याकडे यावर्षी कोणता देखावा?
जटायूवध? अरे वा!
बरोबर! ते विज्ञान देखावे बोअर होतात नाहीतरी..
ते फारच टोकाचे बोलायचे का हो?
असं बोलू नये.
भावना दुखावतात लोकांच्या
शेवटी श्रद्धा असतात काही.
त्यांचा आदर करावा.
बरं गाणी कोणती घ्यायची यावर्षी?
चिकनी चमेली जुनं झालं
नवीन घ्या की काहीतरी
ते पिंकी साँग वगैरे
मी काय म्हणतो, ते दाभोलकर देखाव्यात घ्यायचे का?
कोण बघणार?
काहीतरीच.
असं काय करता राव?
त्यांना सपोर्ट होता पुण्यात.
तुम्ही करा एक देखावा त्यांच्यावर
लोक गर्दी करणार नक्की
अगदी शंभर टक्के
असं म्हणता?
करू म्हणता?
आता पोरं म्हणतात तर करू या
शेवटी पोरांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे.
- नीलिमा कुलकर्णी, सिनिअर करस्पाँडंट, IBN लोकमत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra dabholkar