शरीफ गेले, पुढे काय?

शरीफ गेले, पुढे काय?

पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. नवाझ शरीफ हे पंतप्रधानपदावर राहण्यास योग्य नाहीत, त्यांनी त्वरित पायउतार व्हावं, असा निर्णय कोर्टानं दिला. शरीफ यांना तो पाळावाच लागला.

  • Share this:

अमेय चुंभळे, आयबीएन लोकमत

पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. नवाझ शरीफ हे पंतप्रधानपदावर राहण्यास योग्य नाहीत, त्यांनी त्वरित पायउतार व्हावं, असा निर्णय कोर्टानं दिला. शरीफ यांना तो पाळावाच लागला.

नवाझ शरीफ, त्यांची दोन मुलं आणि मुलीवर परदेशात बेहिशेबी मालमत्ता जमा करणाचे आरोप होते. ते सिद्ध झाले. पनामा पेपर्स या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शोध पत्रकारितेच्या मोहिमेदरम्यान शरीफ यांचे उद्योग जगासमोर आले. कट्टर विरोधक आणि माजी क्रिकेटर इम्रान खान यांनी यावरून रान उठवलं. 2016 साली तर त्यांनी हजारो समर्थकांसोबत इस्लामाबादमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्याआधी त्यांनी शरीफ यांच्या विरोधात अनेक याचिकाही दाखल केल्या होत्या. आता कोर्टाला दखल घेणं भाग होतं. आणि बघता बघता शरीफ अडकले. तसंही, त्यांची प्रतिमा स्वच्छ अशी कधीच नव्हती. पण भारतासाठी महत्त्वाचा प्रश्न हा, की आता पुढे काय?

पाकिस्तानात लष्कर आणि सरकारचे संबंध साधे सरळ नाहीत हे जगजाहीर आहे. संरक्षण आणि परराष्ट्र धोरणांविषयी अनेक निर्णय शरीफ यांना लष्कराला विश्वासात घेऊनच घ्यावे लागले. मोदींनी शपथविधीला निमंत्रित केल्यावरही लष्कराची परवानगी शरीफना घ्यावी लागली होती, अशा बातम्या तेव्हा आल्या होत्या. जे काही बरं चाललं होतं, त्यामागे एक कारण होतं शरीफ यांचा राजकारणातला दांडगा अनुभव. पण आता सत्ता राखण्यासाठी कमकुवत व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता जास्त आहे. याचं कारण म्हणजे सत्ता आपल्याचकडे रहावी, आणि आपल्याला आव्हान देणारा कुणी तयार होऊ नये, असाच विचार शरीफ करणार. या परिस्थितीचा फायदा लष्कर घेणार नाही, याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही.

पण लष्कर सत्ता काबीज करेल का? तसं वाटत नाही. कारण पडद्यामागून लष्कराला हवी तशी सूत्र फिरवता येतायत. पण पाक लष्कराच्या नसत्या कुरापतींचा भारताला काश्मीरमध्ये भोगावा लागतोय. घुसखोरी सुरूच आहे. फुटीरवाद्यांनी पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांकडून पैसे घेतले आणि दगडफेक करणाऱ्यांना  वाटले, असा ठपका एनआयएनं नुकताच ठेवलाय. खोऱ्यात सध्या शांतता आहे, पण तणावपूर्ण. या परिस्थितीत राजकीय नेतृत्व कमकुवत असल्याचा फायदा लष्कर घेऊ शकतं, ही शक्यता नाकारता येणार नाही. तसं झालं तर आपली डोकेदुखी वाढणार हे नक्की.

शरीफ होते तोपर्यंत 'वासरात लंगडी गाय शहाणी' या उक्तीप्रमाणं भारताला चर्चा करण्यासाठी किमान एक पर्याय तरी होता (सध्या चर्चा स्थगित आहे हा भाग वेगळा). पण नवे पंतप्रधान सेटल होईपर्यंत आणि लष्कराला आपण अंशतः का होईना, नियंत्रणात ठेवू शकतो, हे सिद्ध होईपर्यंत देव पाण्यात घालून बसण्याव्यतिरिक्त भारत काही करू शकत नाही.

इथे हेही नमूद करायला हवं की पुढच्या वर्षी पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका आहेत. पाकिस्तानच्या जनतेनं आजचा निर्णय मनावर घेत शरीफ यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला, तर इम्रान खान सत्तेवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खान यांची भारताबाबतची मतं तुलनेनं सौम्य आहेत. मी सत्तेवर आलो तर भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीन, भारतासह कोणत्याही देशाबाबत माझ्या मनात पूर्वग्रह नाही, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.

दुःखात सुख असं की शरीफ यांना पायउतार व्हावं लागलंय, त्यांच्या पक्षाचं सरकार कायम आहे. म्हणजे अगदीच अनागोंदी माजणार नाही हे नक्की. सतत राजकीय कलह सुरू असणाऱ्या शेजारच्या घरात शांतता आहे, हेही नसे थोडके. बाकी बोलायचं तर उम्मीद पे दुनिया कायम है!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2017 04:58 PM IST

ताज्या बातम्या