दुग्ध विकासमंत्री महादेव जानकरांना खुलं पत्र - त्या दूधाचं कर्ज तुम्हाला फेडावंच लागेल!

दुग्ध विकासमंत्री महादेव जानकरांना खुलं पत्र - त्या दूधाचं कर्ज तुम्हाला फेडावंच लागेल!

राज्यात पाण्याच्या बाटलीला 20 रुपयांचा भाव आणि शेतकऱ्यांच्या दुधाला केवळ 17 रुपयांचा भाव आहे. हा कुठला न्याय? तुम्ही जनावरांना कायद्याचं संरक्षण दिलंय पण त्यांना जगवणाऱ्या शेतकऱ्यांना मरणाच्या दारात ढकलून.

  • Share this:

विलास बडे, प्रतिनिधी

प्रिय जानकर साहेब,

तुम्ही राज्याचे दुग्धविकास मंत्री आहात याची आठवण करून देण्याचं कारण म्हणजे राज्यातली दूध उत्पादकांची अभूतपूर्व हालाखीची परिस्थिती. तुमच्या राज्यातला दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागतोय, तरी तुम्ही गायब आहात. कुठेच काही बोलत नाहीत. दिसत नाही. गेल्या वर्षी शेतकरी संपावर गेल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांच्या दूध दरात तीन रुपयांची वाढ केली. 27 रुपयांचा हमीभाव जाहीर केला. पण तो हमीभाव कुठे आहे?

वास्तव हे आहे की, राज्यात पाण्याच्या बाटलीला 20 रुपयांचा भाव आणि शेतकऱ्यांच्या दुधाला केवळ 17 रुपयांचा भाव आहे. हा कुठला न्याय? तुम्ही जनावरांना कायद्याचं संरक्षण दिलंय पण त्यांना जगवणाऱ्या शेतकऱ्यांना मरणाच्या दारात ढकलून. दुभती जनावरं जगवण्यासाठी लागणारी चाऱ्याची पेंडी 12 ते 15 रुपयांना मिळते. म्हणजे दिवसाकाठी 60 ते 70 रुपयांचा नुसता कडबाच झाला. त्याशिवाय पेंड, भुस्सा यांचा खर्च वेगळाच. त्यातून मिळणारं दूध विकलं तर शेतकऱ्यांच्या हातात राहाताहेत फक्त चिपाडं. मग शेतकऱ्यानं जगायचं कसं आणि गोठ्यातल्या गाईंना जगवायचं कसं?

सध्या राज्यात दूध दराचं आंदोलन पेटतंय, याची तुम्हाला कल्पना असेलच. 'दूधाला दर देत नसाल, तर फुकट न्या' असं म्हणत हतबल शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतोय. ही तुमच्यासाठी नामुष्की आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही राणाभीमदेवी थाटात गर्जना केली. जे खासगी दूध उत्पादक जुमानत नाहीत त्यांना कायद्यानं वठणीवर आणणार. मग आज तुमचे हात कोणी बांधलेत, की तुम्हीच डोळ्यावर पट्टी बांधलीय? एकदा महाराष्ट्राला सांगून टाकाच.

जे गुजरात, कर्नाटक करु शकतं मग महाराष्ट्रात का होत नाही यावर तुम्ही कायद्याची सबब देवून पळवाट काढू शकता. पण तो कायदा करायला गेल्या साडेचार वर्षात तुम्हाला कोणी रोखलं होतं? याचं उत्तरही तुम्हाला द्यावं लागेल.

दूध व्यवसाय हा महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचा कणा आहे. बिघडलेल्या अर्थकारणानं तो कणा मोडून पडतोय. शेतीमालाला भाव नाही. त्याला जोडधंदा असलेल्या दुधालाही भाव नाही. मग जनतेच्या लेखी तुमचा आणि सरकारचा भावही घसरणार यात शंका नाही. पण तुम्ही या गंभीर प्रश्नाचं गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांना न्याय द्याल ही अपेक्षा आहे. तुम्ही मंत्री नंतर, त्याआधी शेतकऱ्याचं पोर आहात. त्या दूधाचं कर्ज तुम्हाला फेडावंच लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 4, 2018 03:03 PM IST

ताज्या बातम्या