नितेश राणेंनी मच्छीमार वादात का घेतली उडी ?

वरवर ही घटना मामुली वाटत असली तरी यात चालून आलेली संधी न दवडता नितेश राणेनी फेकलेला हा फक्त मासा नव्हेतर 'राजकीय' फासा आहे !

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2017 08:24 PM IST

नितेश राणेंनी मच्छीमार वादात का घेतली उडी ?

 

दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग

6 जुलै : नारायण राणेंचे आमदार पुत्र नितेश यानी आज पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमार वादात उडी घेत मालवणच्या मत्स्यव्यवसाय आयुक्तांना अरे-तुरेची भाषा वापरत त्यांच्या कार्यालयातच त्यांच्यावर मासा फेकून मारला ! आणि बेकायदा मासेमारीवर कारवाई नाही केलीत तर नितेश राणेशी गाठ आहे, असंही सुनावलं ! वरवर ही घटना मामुली वाटत असली तरी यात चालून आलेली संधी न दवडता नितेश राणेनी फेकलेला हा फक्त मासा नव्हेतर 'राजकीय' फासा आहे !

खरं तर सिंधुदुर्गातले बहुतेक पर्ससीन आणि मिनि पर्ससीन मच्छीमार हे नारायण राणेंचे समर्थक आहेत . तरीही आज नितेश राणेना पर्ससीन मासेमारीविरोधात भुमिका घ्यावी लागतेय . त्याचं कारण असं आहे की , गेल्या काही वर्षांपासून सिंधुदुर्गात पारंपरिक आणि पर्ससीन जाळ्यानी मासेमारी करणाऱ्या मच्छीमारात वाद सुरु आहे . हा वाद अनेक वेळा हिंसक झालाय . पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान हा वाद टोकाला गेला असता मालवण मतदार संघाचे तत्कालीन उमेदवार नारायण राणे यानी पारंपरिक मच्छीमाराना फार गांभीर्याने घेतलं नाही. आणि नेमकी हीच संधी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी घेत पारंपरिक मच्छीमारांना फुल्ल सपोर्ट करीत या मच्छीमारांची एकगठ्ठा मतं मिळवली होती. राणेंच्या पराभवाच्या कारणात हे एक महत्वाचं कारण होतं. त्यावेळी राणे कुटुंबियांकडून झालेली ती चूक होती हे आता नितेश राणेही मान्य करतायत !

पुढे विद्यमान शिवसेना आमदार वैभव नाईक यानी पाठपुरावा केल्यावर राज्य सरकारने पर्ससीन मासेमारीवर निर्बंध आणत पर्ससीन मासेमारीचा कालावधी आणि किनाऱ्यापासूनचं अंतर निश्चित केलं आणि या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व मत्स्यव्यवसाय आयुक्तांना दिले. पण त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे हे वाद सुरूच राहिले. तशातच भाजपाचे मत्स्यव्यवसाय मंत्री पर्ससीन बंदीच्या कालावधीत सिंधुदुर्गात आले आणि त्यांनी चक्क एका पर्ससीन मच्छीमारासोबत समुद्रात जाऊन पर्ससीन मासेमारी कशी करतात याचं प्रात्यक्षिक पाहिलं. जानकरांची ही कृती पारंपरिक मच्छीमारांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली आणि सरकारचेच मंत्री जर कायदा मोडत असतील तर भाजपा आपल्याला या बाबतीत काय न्याय देणार, अशी भावना मच्छीमारात तयार झाली. दुसरीकडे जानकरांच्या या कृतीचा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी साधा निषेधही केला नसल्यामुळे शिवसेना सरकारमध्ये असूनही आणि राणेंचे विरोधक शिवसेना आमदार दीपक केसरकर पालकमंत्री असूनही आपले प्रश्न सुटत नसतील तर सेनेच्या आमदारामागे तरी किती वेळा फिरणार ? असा समज या पारपरिक मच्छीमारात दृढ होऊ लागला आणि नेमकी हीच तात्कालीक संधी नितेश राणेना पुन्हा चालून आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 08:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...