उदक वाहते अथक-भाग १

आमची ही पारंपारिक समजूत आज नद्या आटल्याने, प्रदुषणामुळे बाटल्याने, जे भयंकर दुष्परिणाम होत आहेत त्याने खरी ठरते आहे. एक नदी संपली तर अवघा सांस्कृतिक प्रवाह कसा खंडित होतो. हे आम्ही सरस्वती नदीच्या निमित्ताने अनुभवले आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2017 05:18 PM IST

उदक वाहते अथक-भाग १

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएनलोकमत

नदी  संपली की माणूस संपतो , नदी शब्दाच्या उलट म्हणजे दीन होतो. नदी परिसंस्थेच्या संवर्धनासाठी सर्वत्र 'जागतिक नदी दिवस' साजरा होतोय. त्यानिमित्ताने आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांची पाच भागातील लेखमाला

नदी म्हणजे माणसांच्या असंख्य वर्षांच्या जीवनप्रवासात अखंडपणे खळाळणारा जीवन प्रवाह. आधुनिक वैद्यकीय शास्त्राला शोध लागण्याच्या शेकडो वर्षआधीच आमचे पूर्वज जाणून होते की मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाण कसले असेल तर ते आहे पाण्याचे. अगदी मांस-हाडाहूनही जास्त.  अर्थात टक्केवारीतच सांगायचं तर मानवी शरीरात  60 टक्के प्रमाण हे पाण्याचं असतं. जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं तसं पाण्याचं प्रमाण कमी होत जातं. परिणामी शरीरात बदल होत जातात. माणूस म्हातारा होत जातो. आपण भारतीय लोक व्यष्टी ते समष्टी हा नियम मानतो.

जे आमच्या शरीरात घडते तेच आमच्या अवतीभवती परिसरात, संसारचक्रात प्रतिबिंबित होते. आमची ही पारंपारिक समजूत आज नद्या आटल्याने, प्रदुषणामुळे बाटल्याने, जे भयंकर दुष्परिणाम होत आहेत त्याने खरी ठरते आहे. एक नदी संपली तर अवघा सांस्कृतिक प्रवाह कसा खंडित होतो. हे आम्ही सरस्वती नदीच्या निमित्ताने अनुभवले आहे. तरीही भारतीय लोक भौतिक प्रगतीच्या लालसेने नदीची गती मंदावताना दिसतात. मग ती गंगा असो वा मुंबईची मिठी नदी  आम्ही आमच्या आसपासच्या जीवनधारा आमच्याच हाताने नष्ट करतो आहोत. आता जागतिक नदी दिनाच्या निमित्ताने तरी आम्ही  आमच्या नदी नाल्यांचा विचार करणार आहोत की नाही?

Loading...

नदी किंवा समुद्र, पाणी किंवा विहीर, तलाव किंवा विहीर आपल्या बालपणाला या ना त्या नावाने 'लागलेलं' असतं, 'लाभलेलं' असतं. आमच्या शेकडो पिढ्या पाण्याच्या शोधात फिरत राहिल्या  आणि पाण्याच्याच आधारेने स्थिरावल्या. राहुल सांकृत्यायन व्होलगा ते गंगा हा प्रवास, एक इतिहास चित्रकथेप्रमाणे डोळ्यासमोर उभा करतात. तेव्हा माझ्यासारख्याचेही मन इतिहासात रमते. परवा वाडा गावाला कुशीत घेऊन मुंबईच्या सागराला भेटाणाऱ्या वैतरणा नदीला आमच्या वैतरणा मायला पाहिलं. पावसाने पोटूशा बाईसारखी तुडूंब देखणी दिसणारी वैतरणा हिरव्याकंच आसमंताला व्यापून उरली होती. एकीकडे सगळेजण  माझ्या मोठ्या काकांच्या चितेची तयारी करत होते तर दुसरीकडे माझे मन वैतरणेच्या डोहात बुडाले होते. पाण्याच्या तुफानी प्रवाहासारखे माझ्या मनात असंख्य प्रश्न उठत होते. माणसाला स्मशान नदीकिनारी का तयार करावेसे वाटले असेल? पाणी  हे जीवन असतं, नदीही जीवनदात्री, मग मृत्यूनंतर जगण्याची शाश्वती माणसाला नदीच्या किनाऱ्यावर मिळत असेल का? धडाडणाऱ्या चिता कलेवराची राख करून शांत होतात. नदीच्या पाण्याने 'राख धुण्याचा' विचार माणसांच्या मनात नवजीवनाच्या आशेतूनच आला असावा का? वैतरणेच्या खळाळत्या जलौधाच्या फेसाळत्या प्रवाहाशी माझ्या मनातील उसळत्या प्रश्नांची जणू स्पर्धाच लागली होती. स्मशानातून सगळे घरी परतले. पण माझ्या  मनात प्रश्नांचा कल्लोळ आणि कानात वैतरणेचा खळखळाट कायम होता.

नदीचं हे नादावणं अनुभवायची संधी खऱ्या अर्थाने माझ्या गावच्या वैतरणेपेक्षा नर्मदा नदीने मला दिली. तसा माझा नर्मदा नदीचा काहीच संबंध नव्हता. पण गो.नी.दांडेकर,अमृतलाल बेगड,जगन्नाथ कुंटे यांच्या भेटीतून शब्दबद्ध झालेली नर्मदा मला पहिल्या भेटीपासूनच आवडत गेली. फक्त आवडली नाही तर माझ्या तनामनात उतरत गेली. माझ्या नकळत तिच्या आठवणींची साठवण इतकी प्रचंड की तिच्या स्मरणाने डोळ्याच्या कडातून सहस्त्रधारा बरसू लागतात. आणि ती समोर दिसली की तिच्या कुशीत कधी झेपावतो असं होतं. अगदी अमरकंटकापासून मी नर्मदेचा प्रवास भडोच जवळच्या समुद्रापर्यंत प्रवाह कसा बदलत गेलाय ते पाहिलंय. अगदी शोण नदीसोबत तिचे झालेले भांडण ,सहस्त्रार्जुनाने अडवलेला तिचा मार्ग आणि तिची परिक्रमा अर्थात प्रदक्षिणा करणाऱ्यांशी तिचे असणारे माय लेकराचे विलक्षण विलोभनीय नाते आहे. नर्मदा तिच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर नवे रूप घेऊन आपल्यावर  गारूड टाकते. आणि आपण वहावत जातो तिच्या अफलातून लोककथांच्या प्रवाहात, लोकगीतांच्या तालात आणि खोलवर जातो लोकसंस्कृतीच्या तळात जिथे अजून आहेत पडलेल्या दडलेल्या सभ्यतेच्या अमूर्त खूणा आहेत.

 आहे जळ म्हणूनी निश्चळ

राहिल निरंतर ,भूमीवरी

जळ देई बळ, अन्य ते निष्फळ

नदीतूनच  जन्मे, बिसलरी

उद्या वाचा 'नर्मदे हर, हरहर नर्मदे '

(क्रमश:)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2017 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...