S M L
Football World Cup 2018

गंगा मैय्या!

गेल्या अनेक शतकांपासून झालेला हा माणसांचा प्रवास, भारताबाबत बोलायचे तर या गंगेच्या खोऱ्यामध्ये आल्यानंतर स्थिरावलेला दिसतो. विशेषत: गंगेतील खोऱ्यातील हा माणसांचा प्रवास जास्त करून काशीमध्ये आल्यानंतर गंगेबरोबर वसलेला आहे

Sonali Deshpande | Updated On: Sep 27, 2017 01:32 PM IST

गंगा मैय्या!

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएनलोकमत

नदी  संपली की माणूस संपतो, नदी शब्दाच्या उलट म्हणजे दीन होतो. नदी परिसंस्थेच्या संवर्धनासाठी सर्वत्र 'जागतिक नदी दिवस' साजरा होतोय. त्यानिमित्ताने आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांची पाच भागातील लेखमाला

उदक वाहते अथक- भाग 3

जगातील अवघी मानवजात नद्यानाल्यांच्या आश्रयाने राहिलेली आणि वाढलेली पाहायला मिळते. नदीसोबतच्या सामाजिक , राजकीय आणि  सांस्कृतिक प्रवास आणि प्रवाहामध्ये माणसे पाण्याच्या दिशेने कशी सरकत गेली आणि पाण्याबरोबर त्यांची जीवनगंगा कशी वाहत गेली, हे आपल्याला ठिकठिकाणी  वाचायला आणि अनुभवायलाही मिळते. गेल्या अनेक शतकांपासून झालेला हा माणसांचा प्रवास, भारताबाबत बोलायचे तर  या गंगेच्या खोऱ्यामध्ये आल्यानंतर स्थिरावलेला दिसतो.  विशेषत: गंगेतील खोऱ्यातील हा माणसांचा प्रवास जास्त करून काशीमध्ये आल्यानंतर गंगेबरोबर वसलेला आहे आणि त्याद्वारे भारतीय   जीवनाला गंगेने फक्त स्थिरता दिलेली नाही तर काशीच्या परिसरात तिला एक वेगळ्या प्रकारची संपन्नता आणि समृद्धता दिलेली दिसते. त्यामुळेच असेल कदाचित काशीतील गंगा आणि तेथील विश्वनाथ अवघ्या भारतवर्षासाठी पूजनीय बनले असावेत. त्यांच्या अस्तित्वासाठी मराठे, होय काही प्रमाणात शीख, राजपूतही लढले पण, काशी आणि गंगेच्या रक्षणार्थ मराठ्यांनी मुघलांशी सातत्याने झगडा केला. आज जे काशी विश्वेश्वराचे आधीपेक्षा छोटे मंदिर आहे, त्याचे सारे श्रेय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याकडे जाते.

काशीतील बहुसंख्य घाट मराठ्यांनी बांधलेले आहेत. शेकडो मंदिरे , मठ आणि आश्रमांची उभारणी आणि त्यांचे रक्षण केवळ मराठ्यांमुळे झाल्याचे काशीतील लोक सांगत असतात. दुर्दैवाने आजचे काशीतील मराठी माणसांचे अस्तित्व हे केवळ पुरोहित कामापुरतेच मर्यादित राहिलेले दिसते. पण आता उमा भारतीजींनंतर गंगासफाईशी संबंधित खाते आता ज्येष्ठ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आलेले आहे. हाती घेतलेले काम कितीही कठीण असले तरी ते तडीस नेण्याची ख्याती असणारे नितीनजी गंगेला कसे साफ करणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. अर्थात ते काम साधे नाही,  फार कठीण आहे. अशक्यप्राय असले तरी अगदीच अशक्य नाही.

साधारणत: ३२०० वर्षापूर्वी गंगेच्या खोऱ्यात आर्य टोळ्यांच्या आगमनाने मानवी संस्कृती रुजली, फुलली आणि फळली असे तज्ज्ञांचे मत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसह ९ राज्यांतील सुमारे ५० कोटी लोकांना गंगा जीवन देते. देशातील एकूण सिंचनाखालील जमिनीपैकी निम्मे क्षेत्र गंगेच्या खोऱ्यात आहे. २५२५ कि. मी. प्रवास करीत गोमुख- गंगोत्रीहून ती सागरापर्यंत जाते. या जलप्रवासात गंगा प्रदूषित करण्याची एकही संधी आम्ही सोडलेली दिसत नाही. कानपूरपासून गंगेत विविध उद्योगांतील रसायनयुक्त पाणी, सांडपाणी, मल-मूत्र, कचरा अशा नको त्या गोष्टी अर्पण होत जातात. परिणामी गंगाजल तीर्थ घेण्यासाठी हातावर घेतले तरी हाताला खाज सुटते, अशी अनेक ठिकाणची स्थिती झाली आहे, मग गंगाजल प्राशन करण्याची गोष्टच दूर. तरीही ज्या गावांना, खेड्या-पाड्यांना जलशुद्धीकरणाची सोय नाही, तेथे गंगेचे पाणी पिणे म्हणजे जलजन्य रोगांना निमंत्रण देणे, हे समीकरण बनले आहे.

१९७० मध्ये एका सरकारी संशोधनात असे सिद्ध झाले होते की, प्रदूषणाने गंगेच्या ६०० कि. मी. प्रवाहक्षेत्रातील जैवविविधता संपुष्टात आणली होती. सध्याच्या स्थितीत हे प्रमाण कितीतरी पट वाढले आहे. जसजशी गंगेच्या ओटीपोटातील जैवसंपदा नष्ट होत आहे, किनाऱ्यावरील वृक्षतोडीने, भूस्खलनाने तिची गती मंद होत आहे, तसतशी गंगा मृत्युपंथाला लागण्याची भीती वाढत आहे. याकडे शासकीय पातळीवरून पाहिले जात आहे. पण प्रत्यक्ष कृतिकार्यक्रमाची जोवर सुरुवात होणार नाही , तोवर गंगा शुद्ध होणार नाही, सशक्त आणि वाहती राहणार नाही.

नगाधिराज हिमालयाच्या कुशीत गंगोत्री येथे गंगेचा उगम आहे. उगमापासून सागर संगमापर्यंतचा २५२५ किलोमीटरचा गंगेचा प्रवास हा आज जागतिक संशोधनाचा आणि चिंतेचा विषय बनलाय. कितीही प्रदूषित असली तरी भारतातील एकूण पाण्यापैकी सुमारे २५ टक्के पाणी गंगेच्या पात्रातून मिळते. तिच्या दोन्ही किनाऱ्यांवर वसलेल्या ३० मोठ्या शहरांतील, ऐंशी गावांतील आणि असंख्य खेड्या-पाड्यांतील सुमारे ५० कोटींहून अधिक लोकांचा गंगा जीवनाधार आहे, पण स्वत:ला गंगापूजक म्हणवणाऱ्या दांभिक भारतीयांनी आपल्या प्रदूषित हातांनी हा आधार तोडण्याचा एककलमी कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलाय. तो वेळीच रोखला नाही, तर कालांतराने गंगासुद्धा सरस्वतीप्रमाणे लुप्त होईल, पृथ्वीवरून गुप्त होईल.

उगमापाशी अत्यंत शुद्ध, स्वच्छ आणि खळाळती गंगा ऋषिकेशपर्यंत, पहिल्या १४२ मैलांच्या प्रवासापर्यंत खूप सुंदर दिसते. तिचे नितळ, आरस्पानी रूप, तिच्या भारदस्त प्रवाहाचा जबरदस्त ओघ आणि तिच्या कुशीत फुललेले मानवी जीवनाचे मळे, सारे काही विलक्षण, मनाला वेड लावणारे. त्यामुळेच असेल कदाचित अनेक पिढ्यांपूर्वी गंगेच्या खोऱ्यात येऊन स्थिरावलेल्या लोकांनी तिला मय्या, आई हाक मारायला सुरुवात केली असावी. उगमापासून गंगा आपल्याला विविध रूपांत भेटते. शिवाच्या सान्निध्यात रुद्रावतार धारण करणारी म्हणून रुद्र गंगा, विपुल खनिजांचा जीवनोपयोगी खुराक आपल्या पिलापाखरांसाठी पोटात साठविणारी कृष्णगंगा किंवा नीलगंगा म्हणून ती ओळखली जाते. ऋषिकेशपर्यंत तिच्या शुभ्रधवल रंगाला माणसांची नजर लागलेली नसते म्हणून ती धवलगंगा असते. प्रयागच्या त्रिवेणी संगमापर्यंत गंगेची ही शुभ्रता काही प्रमाणात टिकते. कारण प्रयागच्या त्रिवेणी संगमांवर जेव्हा ती यमुनेला भेटते त्या वेळी कृष्णप्रिया कालिंदी यमुनेच्या सावळ्या रंगापेक्षा गंगारूप वेगळे असते. तुम्हाला सहज नजर टाकताच गंगा आणि यमुनेच्या पाण्यातील फरक लक्षात येतो. गुप्त झालेली सरस्वतीही या संगमात सहभागी झालेली आहे, असा लोकांमध्ये समज आणि भाविकांमध्ये श्रद्धा आहे.

आपल्या पूर्वजांनी चुकीच्या पद्धतीने सरस्वतीचे पाणी अडवण्याचा आणि फिरवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या जीवनसलिला सरस्वतीचा प्राणरस आटून गेला, हे सर्वश्रुत आहे. अन्यथा कर्पूरगौर शिवप्रिया गंगेच्या पांढऱ्याशुभ्र, कन्हय्यासखी यमुनेच्या नीलकृष्ण रंगाबरोबर तुषार हार धवला सरस्वतीही भेटली असती. असो, आता जे हातातून गेले आहे, त्याबद्दल अश्रू ढाळण्यापेक्षा जे आहे ते टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

(क्रमशः )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close