विठ्ठल आवडी प्रेमभाव !

विठ्ठल आवडी प्रेमभाव !

पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. भक्तांच्या भेटीसाठी युगे अठ्ठावीस विटेवर उभा असणारा हा देव म्हणजे मराठी माणसाचा प्रेमसखाच. त्याचा 'प्रेमभाव' लोकविलक्षण, त्याची छबी मनमोहक, त्याचे रूप, सौंदर्य, लावण्य सगळ्या संतमंडळींना वेड लावणारे.

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक,IBNलोकमत

पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. भक्तांच्या भेटीसाठी युगे अठ्ठावीस विटेवर उभा असणारा हा देव म्हणजे मराठी माणसाचा प्रेमसखाच. त्याचा 'प्रेमभाव' लोकविलक्षण, त्याची छबी मनमोहक,  त्याचे रूप, सौंदर्य, लावण्य सगळ्या संतमंडळींना वेड लावणारे. जगात असा एकही देव नसेल जो त्याच्या भक्तांना उरा-उरी भेटतो, पाय पडू देतो, अगदी न थकता, न कंटाळता. ज्याला भेटण्यासाठी आठशे वर्षांपासून लोक दिंड्या काढून येतात, पायी चालत येतात. वारीत पंधरा-वीस दिवस चालणाऱ्या वारकऱ्याला विठ्ठल मंदिराचा कळसही मोक्षदायी वाटतो.

'तीर्थ विठ्ठल- क्षेत्र विठ्ठल - देव विठ्ठल' असा भाव असणारा भक्त ज्या देवाला लाभलाय तो देवही तसाच आहे, साधा-भोळा . त्याला कोणी नवस करीत नाही, त्याला कोणता बडिवार नाही, दक्षिणा - प्रदक्षिणेचा उपचार नाही.  त्याचे मंदिर जेथे आहे, ते भक्त भाविकांसाठी माहेर आहे, विठोबा जगासाठी देव असेल, पण भक्तासाठी , " बाप आणि माई माझी विठ्ठल-रखुमाई " असा अनुपम्य स्नेहबंध देव-भक्तांमध्ये आहे. बरं हा त्याचा जीवघेणा चांगुलपणा तिथेच थांबत नाही, मोक्षमार्गीचा एखादा वाटाड्या गुरुशोधात फिरत असेल तर याचा कनवाळूपणा उफाळून यावा  आणि भक्ताच्या तोंडून सहज शब्द उमटावे '" माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव , आपणच देव होई गुरु."

विठ्ठलाच्या या प्रेमभावामुळे दररोजच्या जगण्यात, वारीत,  पंढरपुरात कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी दर्शनासाठी दिवसेंदिवस रांगेत उभा राहणारा वारकरी आपल्या विठुरायाच्या नामस्मरणात सगळ्या भवतापाला विसरण्याचा प्रयत्न करीत असतो.  कारण " नेघो नामाविण काही, विठ्ठल कृष्ण लवलाही " असे म्हणत विटेवर उभ्या असणाऱ्या विठोबाच्या  पायावर डोके ठेवले की जे समाधान लाभते त्याला तोड नाही .

परम विठ्ठलभक्त  नामदेव महाराज त्याचे एका ओळीत वर्णन करतात,

नामा ह्मणे मज विठ्ठल सांपडला ।

ह्मणोनी कळिकाळां पाड नाही  ।

असा हा विठ्ठल आणि भूवैकुंठ पंढरपूर आषाढी एकादशीच्या भक्त महोत्सवासाठी सज्ज झाले आहेत. संत ज्ञानेश्वर , तुकारामादि  विविध संतांच्या दिंड्यांची मांदियाळी लक्षावधी वैष्णव भक्तांच्या मेळ्यासह पंढरपूरच्या वेशीजवळ पोहचली आहे. विठ्ठल भेटीची ही भक्तांच्या मनात दाटलेली असोशी अवघ्या वातावरणात पसरलेली दिसते, वारकऱ्यांनी गजबजलेले रानोमाळ,  ढगाळ आभाळ आणि टाळ-मृदंुगाचा कल्लोळ, हे फक्त कल्पनेने डोळ्यासमोर आणले तरी आपण मनाने पंढरपुरात जातो.

बालपणापासून आपली ओळख करून देणारा विठ्ठल कालानुरूप कळत, आकळत आणि पुढे, पुढे तर जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या नकळत   साकळत जातो . लहानपणी बाळ जेव्हा आनंदाने टाळ्या वाजवत असतं , तेव्हा घरातील आजी-आजोबा विठ्ठल-विठ्ठल म्हणत ताल धरतात. आपल्या मनावर झालेला तो पहिला विठ्ठलस्पर्श असतो, काहीही कळण्याचे वय नसताना बाळ विठ्ठल-विठ्ठल हा शब्द ऐकून आनंदाने टाळ्या वाजवीत डोलते, ती अवस्था खरेतर बहुतांश मंडळींची अखेरपर्यंत असते, पण विठ्ठलछंद आयुष्याच्या वेगवेगळ्या पायरीवर वेगवेगळे अनुभव देत जातो . जगतगुरु तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर ...

 विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडी उच्चरा ।।

विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ।।

विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ।।

विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ।।

विठ्ठल हा असा तुम्हा-आम्हाला जसा भुलवतो, वेध लावतो, तसा तो विद्वान , अभ्यासकांनाही वेड लावतो, डॉ. रा.चिं. ढेरे यांनी 'श्रीविठ्ठल : एक महासमन्वय' हा गंथ म्हणजे विठ्ठलाच्या सर्वव्यापी अस्तित्वाचा चिकित्सक अंगाने घेतलेला वेध आजही नव्या पिढीला मार्गदर्शक आहे . तसे पहिले तर प्रसिद्ध संशोधक-लेखिका दुर्गाबाई भागवत असतील, खंडोबा ते विठोबा या परिघात सामावलेल्या मराठी श्रद्धा संकल्पनांचा सांगोपांग वेध घेणारे जर्मन संशोधक गुंथर सोन्थायमर असतील या आणि अशा अनेक अभ्यासकांनी  त्यांच्या सखोल संशोधनाद्वारे विठ्ठलभक्तीची सुरुवात अशी झाली याचे सखोल संशोधनाअंती सुरेख चित्रण केलेले आहे. दुर्गाबाईंच्या  मते,  विठ्ठल हा वारकरी पंथाच्या आधी महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्र या दक्षिण भारतातील गाई-मेंढ्या पाळणाऱ्या गोपजनांचा लोकदेव आहे. या लोकदेवाचे सांस्कृतीकरणाद्वारे उन्नयन झाले आणि तो भगवान विष्णूंच्या श्रीकृष्ण अवताराच्या विठ्ठलरूपात लोकांसमोर प्रस्थापित  झाला.  सोन्थायमर यांनी  धनगरी लोककथा व लोकगीत यांचा आधार घेत बिरोबाच्या जोडीचा विठोबा असा तर्कसुसंगत युक्तिवाद केला .

काही संशोधकांच्या मते  तर विठ्ठल  म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून वेदकालीन गोपजनांच्या 'पूषन' या देवतेचे आधुनिक काळात उन्नत  झालेले दैवतरूप आहे .  आज जी मूर्ती पंढरपुरात आहे , तिच्या संदर्भातही अनेक कथा-दंतकथा आहेत. माढा,सोलापूर येथील विठोबा खरा की पंढरपूर येथील विठोबा खरा यावर इतिहास संशोधकांचे वाद झाले आहेत. पण कोणताही निष्कर्ष पुढे आला नाही. मात्र महाराष्ट्रावर अनेकदा इस्लामी आक्रमण झाल्याने ती मंदिरातून हलवावी लागली होती, याचे ऐतिहासिक उल्लेख सापडतात, प्रख्यात इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांनी त्यासंदर्भात लिहिलेले आहे.  पण आज मंदिरात असणारी मूर्ती किती वर्षांची आहे, यासंदर्भात अजून सविस्तर संशोधन झालेले नाही.  नामदेव-ज्ञानेश्वरांपासून तुकाराम , बहिणाई यांच्यापर्यंत अनेक संतांनी  ज्या श्रीमूर्तीचे लोभस वर्णन केले आहे , ती मूर्ती  वालुकामय पत्थराची (सँडस्टोन) आहे.

प्रसिद्ध इतिहाससंशोधक प्रा.  खरे यांनी या मूर्तीचे सविस्तर विश्लेषण केले आहे, ते म्हणतात, ‘‘डोक्यावर पारशी कडा असलेली टोपी आहे. त्याला साध्या नमुन्याचा मुकुट म्हणतात. डोक्यावरच छोटा फुगवटा शिवलिंगासारखा दिसतो. पाठीवरच्या कंगोऱ्याला शिंक्याची दोरी म्हणतात. चेहरा मुळातच उभट आहे. गालाची ठेवण थोडीशी फुगीर आहे. कानामध्ये मत्स्याकृती कुंडले आहेत. ती आकाराने मोठी असल्याने खांद्यावरच्या भागास चिकटली आहेत. गळ्यात कौस्तुभ मण्याचे हार, छातीवर एक छोटा खळगा आणि वर्तुळ खण्ड असून त्याला अनुक्रमे श्रीवत्सलांछन आणि श्रीनिकेतन नावे देतात. कोपराचे वर दंडावर आणि मनगटावर दुहेरी असे आंगचेच बाजुबंद आणि मणिबंध आहेत. डाव्या हातात कमलनाल असून हात उताणा अंगठा खाली येईल असा ठेवला आहे. कमरेला तिहेरी मेखला, त्याची टोके स्पष्टपणे खाली आली आहेत. उजवा हात कमरेवर आहे. पायाखाली चौकोनी दगड आहे. लोक त्यालाच वीट मानतात."

विठ्ठलाचे प्राचीन रूप चिकित्सक नजरेने शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केलाय, पण  डॉ. रा.चिं. ढेरे यांनी केलेले काम अपूर्व आहे. आज त्यांची पहिली पुण्यतिथी आहे, म्हणून याठिकाणी  डॉ. ढेरे यांना विठ्ठलछंद कसा जडला होता हे त्यांच्याच  शब्दांमध्ये  जाणून घेऊ या,  अण्णा लिहितात   - ''खरे तर श्रीविठ्ठल हा कळू लागल्याच्या वयापासून माझ्या प्रेमाचा, कुतूहलाचा अन् ओढीचा विषय. ज्या गावात अन् घरात माझे लहानपण गेले, ते गाव अन् घर श्रीविठ्ठलाच्या भक्तीने भारलेले होते.'' आपल्या 'विठो पालवित आहे' या प्रकरणात पांडुरंगाचे मराठी मनाशी जडलेले नाते ते मोठ्या प्रेमाने सांगतात,  ''गेली आठ शतके लक्षावधी मराठी मनावर प्रेमाने अधिराज्य गाजवणारा पंढरपूरचा श्रीविठ्ठल जसा भक्त-भाविकांना पालवतो आहे, तसाच तो शोधक-अभ्यासकांनाही पालवतो आहे. ज्ञानदेवांनी त्याला विश्वसौंदर्यातून अनुभवले आहे, नामदेवांनी त्याला प्रेमरूप मानले, तर तुकोबांनी त्याला रंजल्यागांजल्या जिवांचा सखा-सोयरा म्हणून स्वीकारले. साऱ्या भारतीय धर्मदृष्टीला कर्मठतेतून मुक्त करून तिला जीवनसन्मुख रसिकता प्रदान करणारा लोकसखा कृष्णच विठ्ठलरूपाने पंढरपुरात नांदतो आहे, अशी सकल संतांची धारणा आहे.''

कोणी काहीही म्हटले तरी आजही पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे, तर ज्ञानोबा-तुकाराम, हा मऱ्हाटी समाजाचा श्वास-उच्छवास आहे. म्हणूनच सध्याच्या दिल्या-घेतल्याच्या जमान्यात ‘कशाच्या तरी मोबदल्यात’ भक्ताला पावणाऱ्या देव-देवतांचे, स्वयंघोषित संत-महंतांचे स्तोम वाढत असताना ‘तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी’ असे थेट सांगणाऱ्या रोखठोक वारकरी तत्त्वज्ञानाची नव्याने मांडणी करण्याची गरज आहे.

गेल्या आठशे वर्षापासून मराठी मनाची जडणघडण करणाऱ्या वारकरी संत-विचारांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. कोणीही वारकरी तत्त्वज्ञानाची "निवृत्तिमार्गी" म्हणून हेटाळणी करो, आमच्या वारकना कोणीही "टाळकुटे " म्हणो , आम्हाला त्याची पर्वा नाही. आजही अवघे जग नव्या विज्ञान - तत्रंज्ञानाच्या शोधांनी , संपर्क माध्यमांच्या साधनांनी सुसज्ज होत असताना , मानवी जीवन जगण्याचे वारकरी संतांचे तत्वज्ञान मोलाचे थाट आहे. दीडशे वर्षांपूर्वी  न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ‘राइज ऑफ द मराठा पॉवर’ (मराठी सत्तेचा उत्कर्ष) या ग्रंथामध्ये वारकरी संप्रदायाच्या योगदानाबद्दल फार चांगले लिहिले आहे, ‘‘ज्ञानेश्वर- तुकारामादी साधुसंतांनी पंढरपुरी वाळवंटात भक्तीचा झेंडा रोवून चहूंकडे या नीती-आचारप्रधान भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केला आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य अधिक सोपे झाले.’’

न्या. रानडे यांच्या या मताला पुष्टी देताना थोर विचारवंत, ह.भ.प. शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर म्हणतात, ‘न्या. रानड्यांची न्यायबुद्धी सोने तोलायच्या तराजूप्रमाणे अतिशय काटेकोर होती, त्यामुळे त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सर्वंकष योगदानाबद्दल दिलेल्या अभिप्रायाचे मोल फार मोठे आहे. त्यांच्या या अभिप्रायाचा आशय असा की, वारकरी साधुसंतांनी जे भक्तिप्रधान तत्त्वज्ञान पेरले, त्यामुळे पताका-गंध टिकून राहिले. मुसलमानी आक्रमणाचे चपेटे वाजत असता, त्यांच्या वलीमुर्शदांच्या आरोळ्यांनी आकाश कोंदून गेले असतानाही संतांनी हे महत्कार्य केले. हे ध्यानी घेतले, म्हणजे त्यांच्या कार्याचे मोठेपण लक्षात येते.’

एकूणच काय तर जातिभेदाने ग्रस्त आणि रूढी-अंधश्रद्धांनी त्रस्त झालेल्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकासह अनेक राज्यांतील वैष्णवजनांना वारकरी संतांनी जगण्याचा मार्ग दाखवला. धर्माभोवती जमलेले कर्मकांडाचे अवडंबर कोणताही ‘क्रांतिकारक’ आव न आणता आमच्या संतमंडळींनी दूर केले आणि सामाजिक-राजकीय संकटांनी घेरलेल्या त्या आठशे वर्षापूर्वीच्या काळात संत नामदेवराय मोठ्या विश्वासाने म्हणाले,

नाचू कीर्तनाचे रंगी।

 ज्ञानदीप लावू जगी।।

आज आपल्या समाजात  हाच आत्मविश्वास जागविण्यासाठी मोठे विचारमंथन होण्याची गरज आहे. अज्ञानाच्या अंधाराला दूर करण्यासाठी ज्ञानदीप जळत राहावा असा विचार करणाऱ्या वारकऱ्यांची, " बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल , करावा विठ्ठल, जीवेभावे" अशी मनोभावे नवी मांडणी झाली पाहिजे, तरच समाज टिकेल. राष्ट्र विकसित होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2017 04:46 PM IST

ताज्या बातम्या