पंढरीची वारी,आहे माझ्या घरी

पंढरीची वारी,आहे माझ्या घरी

दिंडीत लाखो लोक का सामील होतात, आपले घर-दार, काम-धंदा सोडून ते पंढरीच्या वाटेवर का येतात, असा प्रश्न लोक विचारतात. त्यांचेही बरोबर आहे. या दिंडीच्या वाटेवर ना चांगली राहण्याची व्यवस्था, ना झोपण्याची सोय, पण तरीही लक्षावधी जनांचा प्रवाहो एका विठ्ठल नामाच्या मंत्राने प्रवाहित होऊन चालत असतो. त्याच्या चालण्याला ग्यानबा-तुकारामचा ठेका असतो. टाळ- मृदुंगातून उमटणारा जय जय रामकृष्ण हरीचा गजर असतो, त्यामुळे कोणत्याही लौकिक सुविधांची पर्वा करायला त्याच्याकडे वेळच नसतो.

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक,IBNलोकमत

पंढरपूरची  वारी  म्हणजे वारकऱ्यांच्या आयुष्यातील आनंदपर्वणीच असते. `विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी' असे उच्चरवाने गाणारा वारकरी या आनंदयात्रेत मोठ्या उत्साहाने , आनंदाने सामील होतो. वारी म्हणजे महाराष्ट्राचा कुलधर्म आहे. थोर समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी महाराष्ट्राची व्याख्या  फार समर्पक शब्दात केली आहे. त्या म्हणतात, ' ज्या प्रदेशातील लोक वारी करतात, त्याला महाराष्ट्र म्हणतात. ' एवढा वारीचा आणि पंढरीचा महाराष्ट्राशी अन्योन्य संबंध आहे. म्हणून वारीच्या निमित्ताने, लक्ष लक्ष पाऊले... सुखी संसाराची तोडूनिया गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट...

पंढरीचा वारकरी

वारी चुकु न दे  हरी

चंद्रभागे स्नान , तुका मागे हेची दान

पंढरीचा वारकरी

वारी चुकु न दे  हरी

भारतातील तमाम वैष्णव भक्तांच्या मनात दररोज एकदा तरी तुकाराम महाराजांच्या शब्दांतून प्रगटलेली ही प्रार्थना उमटत असते, कारण पंढरीची वारी, मग ती आषाढीची असो वा कार्तिकीची, या दोन वाऱ्या म्हणजे वारकऱ्यांचा मोक्षमार्ग. ज्ञानोबा - तुकारामचा जयघोष करीत कोणीही या आनंदयात्रेत सहभागी होऊ शकतो, नाचू शकतो, गाऊ शकतो.   साक्षात माऊली ज्ञानेश्वर महाराज, भक्तराज नामदेव महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, सोपानकाका, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, संत जनाबाई, संत सावता माळी,निळोबाराय, संत चोखोबा अशा अभंगरूपाने अजरामर झालेल्या संतांच्या सान्निध्यात तब्बल पंधरवडा चालण्याचे भाग्य या काळात लाभते.

दिंडीत लाखो लोक का सामील होतात, आपले घर-दार, काम-धंदा सोडून ते पंढरीच्या वाटेवर का येतात, असा प्रश्न लोक विचारतात. त्यांचेही बरोबर आहे. या दिंडीच्या वाटेवर ना चांगली राहण्याची व्यवस्था, ना झोपण्याची सोय, पण तरीही लक्षावधी जनांचा प्रवाहो एका विठ्ठल नामाच्या मंत्राने प्रवाहित होऊन चालत असतो. त्याच्या चालण्याला ग्यानबा-तुकारामचा ठेका असतो. टाळ- मृदुंगातून उमटणारा  जय जय रामकृष्ण हरीचा गजर असतो, त्यामुळे कोणत्याही लौकिक सुविधांची पर्वा करायला त्याच्याकडे वेळच नसतो. वारकऱ्याचे सारे लक्ष विठ्ठलनामात गुंतलेले असते आणि नामातून, भजनातून, कीर्तनातून  मिळणारा आनंद फक्त त्याच्यापुरता नसतो, तर तो अवघ्या आसमंतात साठलेला असतो.

दिंडी जसजशी पुढे सरकते तसा  सगळीकडे उसळतो विठ्ठल नामाचा नाद-गंध. पावसाच्या शिडकाव्याने सारा परिसर आधीच अभिमंत्रित झालेला , त्यावर एक वर्ख चढवा तद्वत  नामाच्या कल्लोळाने  चराचरावर  एक प्रकारचा हळवा ओलावा पसरलेला असतो. रस्त्यावरील माती ज्याच्यासाठी अबीर-गुलाल त्या वारकऱ्याचा अवघा देह पदोपदी  नाचत-गात बोलत असतो. दिंडी ही अशी बेभानपणे अनुभवायची असते, आत्मभान जागवत जगायची असते. वारीत सगळ्याचा विसर पडतो, दिंडीतील प्रत्येक पावलागणिक  तुमचे पद, प्रतिष्ठा , परिवार सगळे काही मागे पडत असते, कारण वारकऱ्यांची नजर पंढरीच्या पांडुरंगाकडे लागलेली असते, कानात संतांच्या अभंगवाणीचा गजर घुमत असतो.

मला वारी ही अशी दिसत आली.  अर्थात , जसे जीवनात नको ते लोक भेटतात, तसे या लाखोंच्या आनंदयात्रेतही दिसतात, मानवी स्वभाव, त्याला कोण काय करणार? पण आपण त्यांच्याकडे लक्ष न देता, विठ्ठलाच्या ओढीने चालत राहावे. वारकऱ्यांना विठ्ठल कसा वाटतो किंवा दिसतो हे संत भानुदास महाराज फार सुंदरपणे सांगतात,

आणिका दैवता नेघे माझे चित्त ।

गोड गाता गीत विठोबाचें ॥ ३ ॥

भ्रमर मकरंदा मधाशी ती माशी ।

तैसें या देवासी मन माझे ॥

जगद्गुरू तुकोबांच्या शब्दांत सांगायचे तर, चराचरात विठ्ठल पाहणारा,  जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा। असे मानणारा खरा वारकरी असतो. हा वारकरी साधासुधा दिसत असतो. वेश बावळा आणि अंतरी नाना कळा असणारा हा मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे असे म्हणत प्रतिकूल परिस्थितीत वारकरी  धारकरी होऊ शकतो, हे महाराष्ट्राने अनेकदा अनुभवलेले आहे. म्हणून स्वत:ला दास मानणारा हा वैष्णववीर, प्रपंचासह परमार्थाच्या वाटेवर येणाऱ्या संकटांवर मोठ्या धैर्याने आणि  धीराने मात करतो. यासाठी त्याला उपयुक्त ठरते त्याची परमेश्वरावरील अगाढ श्रद्धा, जेथे जातो तेथे। तू माझा सांगाती। चालविसी हाती। धरोनिया अशी भावना उराशी बाळगून वारकरी आयुष्याची वारी चालत असतो. या वाटेवर ज्यांची पावले अढळ राहतात त्यांना मोक्षपंढरी हमखास दिसते. सावळ्या परब्रह्माचे दर्शन घडते.

तसे पाहायला गेल्यास वारकऱ्यांचा धर्म अगदी वेगळा आहे. तेथे कर्मकांडाला स्थान नाही. संतांच्या म्हणण्यानुसार जो चांगला वागतो, जगतो तोच वारकरी. मग त्याच्या गळ्यात माळ असो नसो. कारण कपाळी अबीर, चंदन लावल्याने किंवा गळ्यात तुळशीमाळ घातल्याने वैष्णवांच्या मेळ्यात सामील होता येत नाही. तेथे कापरासाख्या निर्मळ मनाची गरज असते. पण जसे जत्रेत हौशे, नवशे आणि गवशे येतात, तसे सर्वप्रकारचे लोक जीवनाच्या वारीतही घुसणारच. मग अशांबद्दल जागरूक राहणे ही आपली जबाबदारी आहे. संतांनी तर अशा लोकांबद्दल विपुल लिखाण केले आहे. जगत्गुरू तुकाराम महाराजांनी तर खट्याळ विनोदाचा आधार घेऊन पंढरीच्या वारीला निघालेल्या एका सासूबाईंची गोष्टच अभंगातून सांगितली आहे.

महाराज  लिहितात -

आवा चालली पंढरपुरा। वेसीपासुनी आली घरा।

मुले लेकरे घर दार। माझे येथेचि पंढरपूर।

तुका म्हणे ऐसे जन। गोवियले माये करून।

संसारात अडकलेल्या गृहिणीची, सासूची मन:स्थिती विरक्तीची वाट पाहून कशी सैरभैर होते, ते तुकोबांनी अभंगात मांडले आहे. प्रपंच करून परमार्थ साधावा हेच आयुष्याचे सार आहे, असे संतसनकादिक सांगत असताना आम्ही प्रपंच हेच जीवनाचे इतिकर्तव्य मानतो, स्वतःसाठीच जगतो आणि तुकोबांनी वर्णिलेल्या सासूप्रमाणे फसतो. ही सासू पंढरीच्या वारीला जायला निघते. पण तिचे मन मात्र घरातच. आपली पिशवी भरताना ती सुनेला एक ना अनेक सूचना करत असते. पोरी, मोजकेच खा, उधळपट्टी करू नको. मी घरी येईपर्यंत लिंपण घातलेल्या गोवऱ्यांचा ढीग फोडू नको. भिक्षुक घरी आला तर त्याला, सासू पंढरपूरला गेली असे सांगून वाटेला लाव.

या सूचना करताना सासूचे चित्त घराबाहेर पडायलाच तयार नाही. आपण पंढरीला गेल्यावर सून घर सांभाळू शकणार नाही, अशी खात्री झाल्यामुळे तिची वेसीपासुनी आली घरा अशी स्थिती झाली. सामान्य माणूस असाच मोहजालात अडकलेला असतो. तो जेव्हा या सगळ्यापेक्षा वेगळा होतो, स्वार्थाकडून परमार्थ मार्गावर पाऊल टाकतो, तेव्हा त्याचे जीवन अंतर्बाह्य बदलायला लागते , संसारातील व्यस्त मन संतविचारांनी मौन होऊ लागते, मोक्षपंढरीचा आत्मविठ्ठल त्याला खुणावू लागतो, त्याच्या जीवनातील आनंद दुणावू लागतो.

संसार पसारा। विषयांचा मारा।

दु:खांचा भारा। माझ्या डोई॥

पाच पाच चवी। क्षणोक्षणी नवी।

का कोण पुरवी। प्यास ध्यास॥

तहान महान। जीव पिऊ लागे।

रक्ताचेही धागे। फिके फिके॥

आता विठू तारी। पुरी होवो वारी।

पाहु दे पंढरी। डोळा गळा॥

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2017 04:49 PM IST

ताज्या बातम्या