भाजपमधील अराजक !

'काँग्रेस मुक्त भारत' ही निवडणुकीच्या तोंडावर घोषणा देणाऱ्या भाजपने 'काँग्रेस युक्त भाजप' हा सोयीचा मार्ग पत्करलाय का ?, असा संशय यावा अशा घडामोडी गेल्या तीन वर्षात पाहायला मिळताहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना 'साले' म्हणून शिवी देणे असो किंवा कर्जमाफी दिली तरी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी आहे का ?, असा अत्यंत असभ्य प्रश्न विचारणे, आश्चर्यकारक नाही.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 11, 2017 05:31 PM IST

भाजपमधील अराजक !

- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झाला आहे, या पक्षाची ध्येयधोरणे, नीतिमूल्ये आणि कार्यपद्धती या सगळ्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तात्विक बैठक आहे. अर्थात राजकीय विचारसरणी म्हणून तुम्ही या तात्विक बैठकीला काही वर्षांपूर्वी  विरोध करत असाल, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सात्विक वर्तनाबाबत त्यांच्या विरोधकांनासुद्धा आदर होता. १९२५ मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी ३ वेळा संघटना बंदीचा अनुभव घेतलाय.

महात्मा गांधी यांचे मारेकरी म्हणून लोकांच्या टोमण्यांचा सामना केलाय. देशात धर्माच्या नावावर फूट पडणारी विचारसरणी ही टीका सहन केलीय. पण तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींबद्दल लोकांच्या मनात कधीच अनादर नव्हता. लोक उघडपणे त्यांना कधी शिव्या देताना दिसत नव्हते. पण काळ कोणतीच गोष्ट फार काळ टिकू देत नाही असे म्हणतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय आघाडी सांभाळणाऱ्या भाजपने मात्र संघाची ही "सात्विक" प्रतिमा पुसण्याचा जणू चंगच बांधलाय. महाराष्ट्रातील भाजपच्या अर्धा डझन मंत्र्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यावर राजीनामा देण्याची आलेली वेळ, ही बदलत्या भाजपाची वर्ष-दोन वर्षातील वाटचाल होती. पण तेथेच थांबतील ते भाजप नेते कसले.

राज्यातील शेतकरी एकाहून अधिक संकटाशी झुंजत असताना, त्याच्या अवस्थेची खिल्ली उडवून, त्याला शिव्या देऊन स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जुना स्वयंसेवक म्हणवणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या 'स्वप्रतिमा भंजना'च्या उपक्रमात एकदम पुढे,अग्रेसर असलेले पाहायला मिळतात. 'काँग्रेस मुक्त भारत' ही निवडणुकीच्या तोंडावर घोषणा देणाऱ्या भाजपने 'काँग्रेस युक्त भाजप' हा सोयीचा मार्ग पत्करलाय का ?, असा संशय यावा अशा घडामोडी गेल्या तीन वर्षात पाहायला मिळताहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना 'साले' म्हणून शिवी देणे असो किंवा कर्जमाफी दिली तरी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी आहे का ?, असा अत्यंत असभ्य प्रश्न विचारणे,  आश्चर्यकारक नाही. त्यांच्या या वादग्रस्त विधानांमुळे सध्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने असंतोषाचा वणवा पेटलाय, लोक वाट्टेल ते बोलताहेत, तसे आजवर संघ किंवा भाजप बद्दल कधीच बोलले गेले नसावे. सोशल मीडिया, या नवमाध्यमाचा आधार घेऊन भाजपने ३ वर्षांपूर्वी देशात आणि राज्यात सत्ता मिळवली होती, आता त्याच सोशल मीडियावर दानवे आणि भाजपाची अत्यंत हीन पातळीवर नाचक्की होताना दिसतेय. विशेष म्हणजे, तात्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपच्या एकही नेत्याने रावसाहेबांच्या 'दानवी' वक्तव्याबद्दल कोणतेच मत दिलेले नाही.

सगळेच राजकीय पक्ष, ज्यात भाजपसोबत सत्तेत असणारी शिवसेना सुद्धा दानवेंच्या वादग्रस्त विधानाबाबत बोलताहेत, त्याचा निषेध करताहेत, पण भाजप गोटामध्ये अजूनही शांतता आहे. काय कारण असेल यामागे...जे दानवे मराठा मूकमोर्चाच्या मालिकांच्या काळात मुख्यमंत्र्यांची खुर्ची खेचण्याच्या प्रयत्नात होते, तेच दानवे स्वतःच्या तोंडाने अडचणीत आल्याने त्यांचे स्वपक्षातील विरोधक आनंदी झालेले दिसताहेत. त्यामुळे माफी मागून नामानिराळे होऊ पाहणाऱ्या दानवे यांची नजीकच्या काळात उचलबांगडी झाली तर आश्चर्य वाटायला नको.

Loading...

वर्षानुवर्षे सात्विकता, नीतिमूल्ये इत्यादी इत्यादी शब्दात स्वतःची प्रतिमा रंगवणाऱ्या भाजपचा आता रंग बदलत चालला आहे. त्यांच्यातील या बदलांना संघ परिवाराचाही विरोध दिसत नाही. त्यामुळे जे आपल्याला एकनाथ खडसे प्रकरणात पाहायला मिळाले, त्याची पुनरावृत्ती दानवे प्रकरणी पाहायला मिळणारच.

सत्ता सुंदरीच्या लोभाने, आकर्षणाने भाजमध्ये सुरू झालेले अराजक ,सत्ता असेपर्यंत सुरूच राहील. याबद्दल शंका नाही. याआधी वर्षानुवर्षे ज्या गुर्मीत, मस्तीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वागायचे, बोलायचे, अगदी तसेच भाजपमध्ये सुरू झालेले आहे. ३ वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये काँग्रेसी संस्कृतीचे 'इन कमिंग' सुरू झाले होते. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्या 'भरती' ला प्रचंड उधाण आलेले दिसले. सर्व पक्षातील सर्वप्रकारचे कार्यकर्ते संघ शाखा ते भाजप कार्यालय असा 'लघु प्रवास' करून, जुन्या भाजप कार्यकर्त्यांना मागे सारून सत्तेच्या पदांवर बसले. अगदी आपापल्या राष्ट्रवादी किंवा काँग्रेसी सावल्या सोबत घेऊन.  त्या ' आयात' केलेल्या नव्या ताकदीच्या बळावर भाजप राज्यातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून उभा राहिला ही वस्तुस्थिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत रावसाहेबसुद्धा त्या 'पक्ष भरतीत' पुढे होते. मात्र पक्षाच्या विजयाचे श्रेय जेवढे मुख्यमंत्र्यांना लाभले, तेवढे प्रदेशाध्यक्ष दानवेंना मिळाले नाही. त्यामुळे दानवे मध्यंतरी खूप अस्वस्थ होते. पण त्यांची ती अस्वस्थता अशी वेगळ्या पद्धतीने बाहेर पडेल असे वाटले नव्हते. तसे पाहायला गेल्यास शेतकरी वर्गाबद्दल बहुतांश राजकीय नेत्यांची अशीच उपेक्षेची भावना आहे. 'मुकी बिचारी कुणीही हाका' या न्यायाने आमचे शासन, प्रशासनही शेतीकडे पाहते, त्यामुळे कधी कांदा, तर कधी कापूस, कधी तूर तर कधी ऊस, कधी दुष्काळ तर कधी अति पाऊस शेतकऱ्याला रडवतो. परिणामी शेतकरी जिवंतपणे मरणयातना भोगतो तर कधी आत्महत्या करून स्वतःची सुटका करून घेतो, ही आजची भीषण परिस्थिती आहे. त्यात बदल करू शकणाऱ्या नेतृत्वाकडून जर शेतकऱ्यावर असा "इमोशनल अत्याचार" झाला तर, नवी पिढी ज्या गतीने शेतीपासून तुटत आहे, ती गती अधिक वेगवान होईल.

जर शेतीच लागली नाही, धान्य पिकले नाही तर आम्ही काय खाणार, हा साधा प्रश्न आमचे विद्वान राजकारणी विसरलेले दिसताहेत. त्यात,महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे, निम्म्याहून अधिक लोक जर शहरात असतील, तर शहरी पक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे अशा शिवसेना आणि भाजपकडून आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काही दीर्घकालीन उपाययोजना आखल्या जातील अशी आशा कशी करावी?

गेल्या काही महिन्यांमध्ये विरोधी पक्षांनी काढलेली 'संघर्ष यात्रा' गाजली, त्याला उत्तर म्हणून सरकार पक्षातर्फे 'संवाद यात्रा ' सुरू झाली, पण ज्याच्या प्रश्नासाठी या यात्रा निघताहेत तो शेतकरी या यात्रांमध्ये का सामील होत नाही ?, याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. आज शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भाषा करणाऱ्या विरोधकांनी आणि संवादासाठी तयार झालेल्या सरकारने, आयबीएन लोकमत सोबत शेतकरी "सन्मान यात्रे" मध्ये सामील व्हावे. त्यात आम्हाला भेटणारे शेतकरी सांगताहेत, त्यांना ना कर्जमाफी हवी, ना अन्य काही सरकारी मदत, त्यांना हवा आहे, शेतात पिकणाऱ्या पिकाला योग्य भाव...

भाजपने सत्तेत येण्यापूर्वी खूप आश्वासने दिली होती. ती पूर्ण केली असती तर अवघा शेतकरी समाज, जाती-पातीचे मोर्चे, राजकारण सोडून त्यांच्या मागे गेला असता. पण तसे करण्याऐवजी भाजप प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांची अत्यंत वाईट शब्दात खिल्ली उडवतात या वर्तनाला उद्दामपणा नाही तर काय म्हणावे. आणि जेव्हा या माजोरड्यावृत्तीं विरोधात लोक उघडपणे बोलू लागले तेव्हा जशी अजितदादांनी माफी मागितली होती, तशी रावसाहेबांनी पण तोंडदेखली माफी मागितली आहे, पण त्या शाब्दिक खेळाने  शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीसमोरील आव्हाने आणि शेतीकडे पाहण्याची आमच्या नेत्यांची मानसिकता यामध्ये काहीच फरक पडणार नाही. 'पाणी आड्यामध्ये नसेल, तर पोहऱ्यात कुठून येणार', अशी खेड्यातील म्हण आहे, शेती प्रश्नांविषयी मनात चांगली जाण नसेल ,तर आमच्या नेत्यांच्या मनात शेतकऱ्यांविषयी कणव, आस्था कशी निर्माण होणार?

Follows us on : @MaheshMhatre

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2017 05:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...