मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

मतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस!

मतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस!

शशिकांत सावंत

१९१६ साली महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंची पहिली भेट झाली. नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे की, तेव्हा आम्हाला ते तितकेसे आधुनिक, तितकेसे प्रभावी वाटले नाहीत. त्यांची विचारसरणी थोडीशी मध्ययुगीन आहे. असच आम्हा मित्रांचं म्हणणं पडलं. शिवाय त्यांना देशातील प्रश्नापेंक्षा दक्षिण आफ्रिकेत जास्त रस होता. परंतु यानंतर झपाटयाने गोष्टी बदलत गेल्या आणि पुढे इतिहास घडला.

नेहरूचं काय, त्यांचे वडील ‘मोतीलाल नेहरू’ हेही गांधीजींच्या निकट आले. आणि नंतर पाचच वर्षात ऐश्वर्यात जगणारा हा युवक , केंब्रिज  हॅरो मध्ये शिकलेला हा युवकाने खादीचा स्वीकार करत चक्क स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात सहभागी झाला आणि तुरूंगातही गेला.

गांधीजी ,मोतीलाल आणि जवाहरलाल यांच्यात इतकं एक नातं तयार झालं की, कधी कधी गांधीजींना वाटायचं की, मोतीलाल आणि जवाहरलाल यांच्या नात्यात आपल्यामुळे थोडसां फरक येतोय की काय?  गांधीजी , जवाहरलाल आणि मोतीलाल नेहरू हे तिघेही इतके एकत्र असत की त्यांना ‘फादर्स अँन्ड हॉली स्पिरीट’ असं म्हटलं जात होतं.

गांधींचा प्रभाव

महात्मा गांधी हे एक ऋषितुल्य महान व्यक्तिमत्व होतं. केवळ स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे तर रोजच्या जगण्यात त्यांनी बाणवलेली तत्व अंगीकारणारे आजही लक्षावधी लोक आहेत. त्यांच्या बद्दल भरपूर लिहिले गेलंय. इतकं की भारतामधीलच नव्हे तर जगातील सर्वधिक दस्तावेजीकरण झालेले ते व्यक्तिमत्व असावं असं वेद मेहता यांनी म्हटलं आहे. त्यांच्यावर ५ वर्षे संशोधन करून मेहता यांनी ‘गांधी अँड हिज अपोस्टल्स’ हे पुस्तक लिहिलंय. गांधीजींचं इतकं चांगलं डॉक्यूमेंटेशन होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या आसपासच्या लोकांना वेळेत उमगलेलं महत्व.

गांधीजीनीही विपूल लेखन केलंय. ‘यंग इंडिया’, ‘ओपिनियन’, ’हरिजन’, यातून ते नियमित लिखान करत. शिवाय त्यांनी हजारोंनी पत्रं लिहिली. शेकडो भाषणं केली. या सर्व गोष्टींचं योग्य दस्तावेजीकरण करण्याचं श्रेय १९२० पासून त्यांचे सहायक म्हणून काम पाहणारे महादेवभाई देसाई आणि त्यांचे सहकारी प्यारेलाल यांना जातं. १९४२ साली महादेव भाईंचे निधन झाल्यावर गांधीजींच्या निधनापर्यंत ही जबाबदारी प्यारेलाल यांनी सांभाळली. यातूनच पुढे इंग्लिश आणि हिंदीमधून आणि मग मराठीतून त्यांची भाषणं,पत्रे, लेख यांचं संकलन सुरु झालं. या संकलनाच्या आधारे अनेकांनी गांधी विचाराचा परामर्श घेतला किंवा चरित्रासाठी उपयोग केला.

गांधींची नेहरूंवर माया

गांधींचं नेहरूंवर विलक्षण प्रेम होतं आणि नेहरूनीही गांधीजींच्या सहवासात आल्यावर आपली संपत्ती आणि करियरचा त्याग करून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली हा इतिहास सर्वाना माहित आहे. हे नातं केवळ पस्पर कौतुकाचं नव्हतं तर वेळप्रसंगी विरोधाचं आणि मतभेदाचंही होतं. जवळपास ७०९ पानात दोघांचेही एकमेकांबद्दलचे उद्गार किंवा त्यांच्या संदर्भातील गोष्टी संपादक आनंद हिंगोरानी यांनी संकलन केलय. ते वयाच्या बाविसाव्या वर्षी गांधीजींच्या प्रभावाखाली आले. लाहोर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनापासून त्यांनी गांधीजींचे शिष्यत्व पत्करले आणि १९३० पासून ते साबरमती आश्रमात राहू लागले.

पुस्तकात मुखपृष्ठावरच गांधीजींचे हे उद्गार दिले आहेत. जवाहर हा खरेच माणसांमधला हिरा आहे. ज्या मातीत तो जन्माला आला ती भाग्यवानच ‘आणि नेहरू गांधींबद्दल काय म्हणतात हेही दिलंय, ‘गांधीजींची जी लोकशाहीची कल्पना आहे त्याचा संबंध आकडयांशी किंवा बहुमाताशी नाही. प्रतिनिधित्वाचा जो नेहमीचा अर्थ आहे त्याच्याशीही नाही. ते सांगतात की, गांधीजी लोकशाहीवादी असोत किंवा नसोत. ते या देशातल्या गरिब समूहाचं प्रतिनिधित्व करतात.

गांधींच्या फकिरीतही श्रीमंती

ते म्हणतात, ‘या छोटया चणीच्या माणसामध्ये काहीतरी पोलादाचं तत्व आहे. काहीतरी कठीण खडकासारखं त्यामुळेच कुठल्याही शारीरिक ताकदी पुढे तो झुकत नाही. मग ती ताकद कितीही मोठी असो जरी शरीर सामान्य वाटलं, किंवा त्याचे साधे कपडे आणि  उघडे शरीर तरीही त्यामध्ये एक राजेशाही थाट आहे. एखादया सम्राटासारखी ताकद आहे . त्यामुळेच त्यांच्या इच्छेखातर इतरजण पाहिजे ते करायला तयार होतात. जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक ते साधे आणि विनम्र राहतात. पण त्यांच्यामध्ये ताकद आणि अधिकार पूर्णपणे एकवटलेला आहे. आणि त्यांना याची जाणीव आहे. अनेकदा ते जे आज्ञा देतात त्या पाळणं इतरांना भागच असतं. त्यांचे शांत, बोलके डोळे समोरच्या माणसाचा वेध घेतात. त्याच्यात खोलवर शिरतात. त्यांचा आवाज स्पष्ट आणि जुनाट वाटला तरी तो तुमच्या हृदयात शिरतो. ‘

गांधीजी नेहमीच थेट आणि पत्रांच्या माध्यमातून नेहरू कुटुंबियांच्या संपर्कात असत. आपल्या लहानपणीच्या आठवणीत दंड न भरल्याने ब्रिटीशांनी कसं घरातलं फर्निचर नेलं ते इंदिराजींच्या आठवणींच्या छोटेखानी पुस्तकात आढळतं. अलाहाबादला आनंद भवन या अलिशान घरात ते राहत ते घरही मोतीलाल नेहरूंनी राष्ट्राला देऊन टाकलं तेव्हा त्यांनी देशाला खूप काही दिलंय.

लाहोर काँग्रेसमध्ये नेहरुंना अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. अर्थातच हा गांधीजींचा निर्णय होता त्यासाठी त्यांनी नेहरूंच्या मनाची कशी तयारी केली ते अनेक पत्रातून दिसते . उदा. ८ नोव्हेंबर १९२९ च्या पत्रात ते म्हणतात

प्रिय जवाहरलाल ,

तुमचे पत्र पोचले. माझी तार तुम्हाला मिळाली असेलच. तुम्ही आताच राजिनामा देता कामा नये. मुद्याविषयी युक्तिवाद करावयास मला वेळ नाही. त्याने राष्ट्रकार्यावर अनिष्ट परिणाम होईल एवढे मला कळते. मुकूटाविषयी बोलायचे तर, इतर कोणीही तो धारण करू शकणार नाहीत. तो कधीच गुलाबांचा व्हावयाचा नाही. आता तो साऱ्या काट्यांचाच असू द्या. तो घालण्यासाठी मी स्वत: चे मन वळवू शकलो असतो तर मी लखनौ येथेच तसे केले असते. इतर मुद्यांवर प्रत्यक्ष भेटल्यावर शांतपणे बोलू.

दरम्यान , परमेश्वर तुम्हाला मन:शांती देवो. एका पत्रात ते म्हणतात ‘तुम्ही मला विरोध करणारे मुद्दे काढले म्हणून माझे तुमच्यावरचे प्रेम कमी होणार नाही.’

देश स्वतंत्र झाल्यानंतर गांधीजींचा खून झाला, तेव्हा नेहरू म्हणाले आपल्या सर्वांच्या आयुष्यातून उजेड निघून गेला आहे. गांधींजींचं सर्वच काही त्यांना मान्य नव्हतं. पण जे मान्य होते त्याची कास धरून ते पुढं गेले.

वारस कोण?

१५ जानेवारी १९४२ साली गांधीजींनी वर्ध्याच्या आश्रमात आपला वारस कोण? याबद्दल भाषण केलं. ते म्हणाले, माझा वारस राजाजी नाही किंवा वल्लभभाई पण नाहीत. माझं वारस जवाहरलालचं आहे. जवाहर आणि माझ्यात मतभेद आहे असे काही जण म्हणतात पण जेव्हापासून जवाहरलाल माझ्या जाळयात फसला आहे. तेव्हापासून तो केवळ माझीच भाषा बोलतो आहे. पुढे ते सांगतात की, जवाहर हाच माझा वारस आहे. काहीवेळा तो मनात येईल ते तो बोलतो, पण मी जे काम सांगेन तेच काम तो करतो. आणि मी गेलो तरी तो माझी भाषाच बोलेल, माझेच काम करेल. किंबहुना मरताना हीच समजूत घेवून मी मरणार आहे ?

 

 

First published:

Tags: Congress, Indian freedom movement, Jawaharlal nehru, Mahatma gandhi, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, स्वातंत्र चळवळ