'बिच्चारे' अडवाणी ?

मंगळवारी लालकृष्ण अडवाणी संसदेबाहेर एकटेच का पडले ? त्यांना वेळेत का गाडी मिळाली नाही? त्यावेळी नेमकं काय घडलं ? याबाबतचा हा वृत्तांत...

  • Share this:
कौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली लालकृष्ण अडवणींना मोदींनी राष्ट्रपती न केल्याने अनेकांना हळहळ वाटली. स्वाभाविक आहे, ज्या व्यक्तिमुळे भाजपाला आज हे सोन्याचे दिवस आले त्यांना राष्ट्रपती करायला हवे होते ही भावना सर्व स्तरात व्यक्त झाली. अडवणींच्या राजकीय जीवनाचा कसा अस्त झाला यावर माध्यमं आणि समाज माध्यमात सहानूभूतीपूर्व अशी चर्चा सुद्धा सुरू आहे. पण बुधवारी अडवणींविषयी आलेली एक बातमी मात्र प्रत्यक्षदर्शी या नात्याने मला अवाक करणारी वाटली. "संसद परिसरात वृद्ध आडवाणी एकटे गाडी शोधत फिरत होते आणि एकाही भाजपा नेत्याने त्यांची साधी दखल सुद्धा घेतली नाही' अशी ही बातमी होती. पण एक प्रत्यक्षदर्शी या नात्याने ही बातमी मला अन्याय करणारी वाटली म्हणून याची दूसरी बाजू सुद्धा समोर येणे गरजेचे आहे. मंगळवारी संसदेच्या आवारात नेमके काय झाले ? मंगळवारी सकाळी अकरा वाजता व्यंकया नायडू यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अडवणी यांच्यासह एनडीएचे सर्व प्रमुख नेते एकत्र आले होते, अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदी, अडवाणींसोबतच बाहेर आले, मोदी पंतप्रधानांसाठी राखीव असलेल्या संसदेच्या 5 नंबरच्या गेटमधून आपल्या गाडीत बसले. नेहमी अडवणी संसदेच्या 6 नंबरच्या गेट मधून बाहेर जातात, पंतप्रधान कार्यालयालगतच्या या दरवाज्याचा वापर फक्त अडवाणी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह करतात. इतर कुणाही खासदार किंवा मंत्र्यांचे वाहन या परिसरात आणण्यास मनाई आहे. पत्रकारांना सुद्धा या गेट जवळ जाता येत नाही. पण मंगळवारी अडवाणी 6 क्रमांकाच्या दरवाजातून बाहेर न पडता 4 नंबरच्या गेटमधून बाहेर पडले. संसदेच्या सुरक्षारक्षकांनी लगेच वॉकी टॉकीवरुन याबाबत अडवणींच्या सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. पण त्यावेळी अडवणींचा गाड्यांचा ताफा आणि त्यांचे सुरक्षारक्षक हे संसदेबाहेर असलेल्या विजय चौकात उभे होते (संसदेच्या आवारात कुठल्याही नेत्याच्या सुरक्षारक्षकांना अथवा ताफ्यातील गाड्यांना प्रवेश नसतो, फक्त नेता बसला आहे त्याच गाडीला गेटच्या आत प्रवेश मिळतो पण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याशिवाय आडवाणी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग हे या नियमाला अपवाद आहेत) पण नेमके त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांच्या गाड्यांचा ताफा संसदेबाहेर निघत असल्याने अडवणींच्या गाड्यांचा ताफा हा विजय चौकातच थांबवण्यात आला होता. पंतप्रधानांच्या सुरक्षा प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असलेल्या मार्गावर इतर कोणत्याही वाहनांना प्रवेशबंदी असते. त्यामुळे साहजिकच अडवाणींना दरवाज्यात थांबावे लागले, (याच 4 नंबर गेटसमोर मीडियासाठी तात्पुरता वातानुकूलित तंबूवजा कक्ष उभारण्यात आला आहे. याच 4 नंबर गेटमधून मंत्री ये-जा करत असल्याने फोटो आणि बाईट घेण्यासाठी बहुतांश पत्रकार आणि कॅमेरामन देखील याच गेटबाहेर उभे असतात) बऱ्याच वर्षांनी अडवाणी या 4 नंबर गेटने संसदेबाहेर पडल्याने पत्रकार मंडळीही आश्चर्यचकीत झाली म्हणूनच सगळे फोटोग्राफर्स अडवणींचा फोटो घ्यायला धावले. फोटो घेऊन झाल्यावर अडवणींच्या गाडीला यायला उशीर होतो आहे आणि बाहेरही प्रचंड गर्मी आहे म्हणून फोटोग्राफर्सनीच अडवणींना पत्रकारांसाठीच्या वातानुकूलित कक्षात येऊन बसण्याची विनंती केली. अडवाणी देखील पायरी उतरून तंबूत येऊन बसले, हीच संधी साधून काही पत्रकारांनी अडवाणींसोबत सेल्फीही घेतले. दरम्यानच्या काळातच अडवणींच्या गाड्यांचा ताफा आला आणि आडवाणी त्यात बसून रवाना झाले. हा सगळा प्रकार साधारणतः 10 मिनीटाच्या कालावधीत घडला. अडवाणी एकटेच का बाहेर पडले ? संसदेत दिवसभर नेत्यांची ये-जा होत असते अशावेळी त्यांच्यासोबत फक्त स्वीय सहायक असतात. काल अडवाणींसोबत नेमके त्यांचे स्वीय सहायक दीपक चोपडे हे देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे बुधवारी ते एकटेच संसदेबाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. इतर नेत्याचंं बोलायचं झालं तर अगदी पंतप्रधानाना सोडायला सुद्धा रोज कुणी दरवाज्यात जात नाही. फक्त मायावती, मुलायम सिंह आणि राहुल गांधी यांच्यामागे सहसा त्यांच्या पक्षातील नेते दरवाज्यापर्यंत सोडायला जातात. मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी मात्र, संसदेत जाताना आणि येताना एकट्याच असतात. त्यामुळे जेव्हा एखादा नेता संसदेच्या गेटबाहेर येतो त्यावेळी गेटवरच्या सुरक्षा रक्षकांकडून संबंधीत नेत्याच्या ड्रायव्हरसाठी गाडी घेण्यासाठी माईकवरून रितसर अनाऊसमेंट होते. मगच तो नेता आपल्या गाडीत बसून संसदेबाहेर रवाना होतो.
First published: