पराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता !

पार्टी विथ डिंफरन्स आणि नैतिकतेचा दावा करणाऱ्या भाजपनं कर्नाटकात सत्तेसाठी जे हापापलेपण दाखवलं ते टाळता आल असतं तर भाजपची शोभा झाली नसती. त्यामुळेच कर्नाटकातला पराभव अटळ होता पण तो 'अटल' सारखा नव्हता हेही तितकचं खरं.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 19, 2018 09:09 PM IST

पराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता !

सचिन साळवे,प्रतिनिधी

"जर आम्ही देशभक्त नसतो, निस्वार्थपणे राजकारणात स्वत:चं स्थान निर्माण नाही केलं, या मागे ४० वर्षांची साधना आहे हा काही अचानक आणि चमात्कारीक जनादेश नाहीये, आमचा पक्ष ३६५ दिवस चालणारा पक्ष आहे,हा काही निवडणुकी पुरता नाही.

आम्ही जनादेशाचा आदर करतो, त्यांचा सन्मान करतो, मला नाही माहिती तुम्ही कसं सरकार स्थापन करणार आणि ते कसे चालेल, पण एक आश्वासन देतो आम्ही विरोधी बाकावर बसू आणि तुम्हाला पूर्ण सहकार्य करू...जोपर्यंत आम्ही जो निश्चय केला ते ध्येय गाठल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अध्यक्ष महोदय मी माझा राजीनामा द्यायला चाललोय"

ही वाक्य आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची....

Loading...

देशात 1996च्या लोकसभा निवडणुकीत राम मंदिराच्या मुद्दयावर भाजपने सर्वाधिक 161 जागा जिंकल्या होत्या. परंपरेने भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला. यासाठी राज्यपालांनी १४ दिवसांची मुदत दिली पण पुरसे संख्याबळ नसल्यामुळे अटलबिहारी वाजपेयींनी लोकसभेत सत्तेला लाथ मारून राजीनामा दिला. फक्त १३ दिवस वाजपेयींचं सरकार होतं पण आज ते १३ दिवसांचं सरकार भारताच्या इतिहासात अभिमानाने सांगितलं जातं. आज कर्नाटकात भाजपचा झालेला पराभव अटळ होता पण तो 'अटल' सारखा नव्हता. सत्ता,पैसा, ताकदीच्या बळावर आपण काहीही करू शकतो या मस्तावालपणाचा हा पराभव होता.  भाजपने १०४ जागा जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मागील निवडणुकीत ४० वरून १०४ जागा हा भाजपसाठी मोठा विजय होता. पण बहुमताने हुलकावणी दिली. आधीच काँग्रेसमुक्त भारताचे अभियान हाती घेतलेल्यामुळे कर्नाटकात मागे हटणे हे नेतृत्वाला मान्य नव्हते. म्हणूनच काही झाले तरी बहुमत सिद्ध करणारच अशी भीमगर्जना भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांनी केला. विशेष म्हणजे हेच येडियुरप्पा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सापडले होते.

मग सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती राज्यपाल वजुभाई वाला यांनी. वजुभाई वाला कोण तर संघाचे स्वयंसेवक आणि गुजरातचे माजी प्रदेशाध्यक्ष, याच वजुभाईंनी नरेंद्र मोदींसाठी आपल्याच मतदारसंघातून जागा सोडली होती. याचंच फलीत म्हणून सत्तेत आल्यावर कर्नाटकात राज्यपालांची खुर्ची मिळाली. राज्यपाल तसे संवैधानिक दर्जा प्राप्त व्यक्ती, त्यांच्या निर्णयापुढे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनीही कधी माघार घ्यावी लागते.

पण इथं मात्र याचा आपल्याच पक्षाला वाचवण्यासाठी पुरेपुर वापर केला गेला. जे मणिपुर,गोव्यात घडलं तसं इथं राज्यपालांनी घडू दिलं नाही. येडियुरप्पांना पहिली संधी देत दुसऱ्याच दिवशी शपथविधीही उरकला. सत्ता स्थापनेसाठी १५ दिवसांची मुदत देऊ केली.

येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर काँग्रेस आणि जेडीएसच्या गोटात एकच धडक भरली. साम,दाम,दंड वापरून हे आमदार फोडतील याची पूर्ण कल्पना बहुदा काँग्रेस जेडीएसच्या नेत्यांना आली होती. मग आमदार फुटू नये म्हणून एका हॉटेलमधून, दुसऱ्या हॉटेलमध्ये कुठे बस तर कुठे विमानाने लपवत काँग्रेस जेडीएसला कसरत करावी लागली. तर भाजपकडून आमदार फोडण्याचे सर्व प्रयत्न केले गेले. पण कोर्टाच्या दणक्यामुळं भाजपच्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं. काही आमदारांना १५ ते १०० कोटीची आमिष दिली गेल्याचेही आरोप झाले. एवढंच काय तर दोन आमदारांचं अपहरण करण्याचेही आरोप झाले आणि आमदारांशी संपर्क होत नसल्यामुळं त्यांच्या कुटूंबियांवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला.

पण न्यायदैवात ही डोळ्यावर पट्टी बांधून हे सगळं पाहत नव्हती तरी तिच्या तराजूत न्याय बरोबर झाला. सर्वोच्च न्यायालयात पहाटेपर्यंत सुनावणीनंतर दुसऱ्या दिवशी भाजपचा डाव हाणून पाडण्यात आला.

भाजपला २४ तासाच्या आत बहुमत सिद्ध करण्याची गरज होती. सोंग घेऊन ढोंग फार काळ करता येत नाही हे तितकच खरं आहे. अखेरपर्यंत बहुमत सिद्ध होत नाही म्हणून बहुमत चाचणीच्या आधीच येडियुरप्पांना शस्त्र खाली ठेवावे लागले.विशेष म्हणजे येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन विधानसभेत प्रवेश करत असताना ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाच्या पायऱ्यांच्या पाया पडल्या होत्या. त्याच स्टाईलने प्रवेश करताना विधानभवनाच्या पाय पडल्यात. आणि ज्या प्रकारे अटलबिहारी वाजपेयींनी बहुमत चाचणी आधी राजीनामा दिला त्याचीच री ओढत आपला राजीनामा दिला.

बरं, फक्त बहुमतासाठी भाजपनेच फोडाफोडीचं राजकारण केलं का तर नाही. काँग्रेसनेही अशीच खेळी केली. पार देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत आमिष दाखवली आणि दिलीही. विधानसभेचे निकाल म्हणजे कर्नाटकच्या जनतेनं सर्वच पक्षांना शिक्षा दिलेली शिक्षा आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढं आला मात्र त्याला बहुमत दिलं नाही. जेडीएसला ताकद दिली मात्र आपल्या मर्यादा दाखवून दिल्या. तर काँग्रेसला त्याची जागा दाखवून दिली. त्यामुळं काँग्रेस आणि जेडीएसला एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

पार्टी विथ डिंफरन्स आणि नैतिकतेचा दावा करणाऱ्या भाजपनं कर्नाटकात सत्तेसाठी जे हापापलेपण दाखवलं ते टाळता आल असतं तर भाजपची शोभा झाली नसती. त्यामुळेच कर्नाटकातला पराभव अटळ होता पण तो 'अटल' सारखा नव्हता हेही तितकचं खरं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2018 09:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...